दिव्यातील दंगेखोरांसाठी शोधमोहीम
By Admin | Published: January 5, 2015 07:27 AM2015-01-05T07:27:44+5:302015-01-05T07:27:44+5:30
दिवा स्थानकातील प्रवाशांच्या उद्रेकाबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत असून, रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि शहर पोलिसांनी प्रवासी आणि घटनेस मुख्य कारणीभूत असलेल्या समाजकंटकांची धरपकड सुरू
सुशांत मोरे, मुंबई
दिवा स्थानकातील प्रवाशांच्या उद्रेकाबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत असून, रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि शहर पोलिसांनी प्रवासी आणि घटनेस मुख्य कारणीभूत असलेल्या समाजकंटकांची धरपकड सुरू केली आहे. मात्र त्यातून आतापर्यंत ठोस काही हाती आलेले नाही. त्यामुळे आता रेल्वे पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सची मदत घेण्याचा निर्णय झाला आहे.
हे टास्क फोर्स डोंबिवली ते ठाणेदरम्यान लोकलमधून प्रवास करून समाजकंटकांची धरपकड करणार आहे. ही विशेष मोहीम सोमवारपासून (५ जानेवारी) सुरू केली जाणार आहे. शुक्रवारी सकाळी लोकलवर त्याचा मोठा परिणाम झाला. मात्र रेल्वेसेवा सुरळीत होत असतानाच संताप अनावर झालेल्या प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको केला. त्यानंतर या रेल रोकोने उग्र रूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड सुरू झाली. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तब्बल १७ हजार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
डोंबिवली आणि दिवा स्थानकात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने रेल्वे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असून, आतापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. आता रेल्वे पोलिसांनी त्यांच्या क्राइम ब्रँचमधील स्पेशल टास्क फोर्सची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.