भुसेंना बच्छाव, कांदेंना धात्रक पर्याय; बंडानंतर शिवसेनेकडून उमेदवारांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 08:23 AM2022-07-07T08:23:28+5:302022-07-07T08:23:47+5:30
इच्छुकांशी संपर्क, बच्छाव यांचा मालेगाव तालुक्यातील सर्वच खेड्यांमध्ये जनसंपर्क असून, बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात यापूर्वीच केली आहे.
नाशिक : बंडखोर आमदार दादा भुसे व सुहास कांदे यांना आगामी निवडणुकीत पर्याय शोधण्याचा आदेश देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोघा बंडखोर आमदारांचे परतीचे दाेर कायमस्वरुपी कापल्याचे मानले जात असून, पक्ष प्रमुखांच्या हुकूमाचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ सेना नेत्यांनी मालेगाव व नांदगाव मतदारसंघासाठी पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दादा भुसे यांना बंडू काका बच्छाव यांचा तर सुहास कांदे यांना मनमाडचे धात्रक हे पर्याय होऊ शकतात असा अंदाज सेनेकडून बांधण्यात येत आहे. याशिवाय अन्य नावांचीही चाचपणी केली जात आहे.
राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जोमाने पक्ष बांधणीला प्राधान्य देत जिल्हा प्रमुख, शहरप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नांदगाव व मालेगाव विधानसभा मतदार संघासाठी पर्यायी उमेदवाराचा शोध घेण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. राज्यातील शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली तर खुद्द ठाकरे यांनीही मध्यावधी निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप अडीच वर्षांचा कार्यकाळ बाकी असल्याचे मानले जात असले तरी, संभाव्य निवडणूका लक्षात घेता सेनेने पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मालेगाव मतदारसंघातून पर्याय शोधण्याचे काम सुरू झाले असून, दादा भुसे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक बंडू काका बच्छाव यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सेनेच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून चाचपणीही केली आहे; मात्र बच्छाव यांनी तूर्त ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका मांडली असून, पुढे काय काय होते त्यानंतर निर्णय घेऊ असा शब्द त्यांनी सेनेच्या नेत्यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.
बच्छाव यांचा मालेगाव तालुक्यातील सर्वच खेड्यांमध्ये जनसंपर्क असून, बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात यापूर्वीच केली आहे. शिवाय भुसे यांच्या राजकीय विरोधकांचे बच्छाव यांच्याशी चांंगलेच सख्य असल्याने त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. बच्छाव यांनी शेवटच्या क्षणी नकार दिला तर हिरे कुटुंबीयांचाही पर्याय सेनेने खुला ठेवला आहे. नांदगाव मतदारसंघातही शिवसेनेने शोध मोहीम सुरू केली आहे. आमदार सुहास कांदे यांनी काही वर्षातच या मतदारसंघावर आपली चांगली पकड निर्माण केल्याने नांदगाव शहरातून त्यांना पर्याय उपलब्ध होणे काहीसे अवघड असल्याचे मानून मनमाड शहरातून उमेदवार देता येईल काय याचीही चाचपणी केली जात आहे. त्यासाठी माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांचे पुत्र व मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचे नाव पुढे आले आहे. या शिवाय माजी आमदार संजय पवार यांना देखील गळ घातली जाऊ शकते. सध्या पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, परंतु राजकारणात काहीही होऊ शकते यावर शिवसेना विश्वास ठेवून आहे.
सध्यातरी ‘वेट ॲण्ड वॉच’ करू. मालेगाव तालुक्यातील जनता सर्व छक्के पंजे जाणून असून, आपण हिंदुत्व विचारसरणीचे आहोत, यापूर्वी खुनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे भविष्यातील वाटचालीबाबत तूर्त काही सांगता येणार नाही; मात्र बारा बलुतेदार संघटना व जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांशी संपर्क कायम आहे. - बंडू काका बच्छाव