पागलखाने की खोज (भाग दोन)

By Admin | Published: March 30, 2017 01:18 PM2017-03-30T13:18:28+5:302017-03-30T16:44:15+5:30

निजामाला समजले ते आपल्या का उमजू नये? मनोरुग्णालयांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

The search for the madhouse (part two) | पागलखाने की खोज (भाग दोन)

पागलखाने की खोज (भाग दोन)

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत/ महेश चेमटे

मुंबई, दि. 30 -  पुरातन वास्तूंचा नोंद शासनाकडे असणे हे उत्तम शासनकर्त्यांचे लक्षण आहे. किंबहुना शासनाच्या नोंदीमुळे इतिहास अधिक उठून दिसतो. अशी सर्वसाधारण धारणा आहे. मात्र जालन्याच्या सरकारी मनोरुग्णालयाची पालेमुळे खणून काढण्यासाठी प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ.नीरज देव यांच्यावर शासन दरबारी अनेकदा चपला झिजवण्याची वेळ आली. आता जालन्याच्या मनोरुग्णालयाप्रकरणी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर तरी राज्य सरकार या प्रकरणी गांभीर्याने पावले उचलणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. 
 
सरकारी मनोरुग्णालयाची सरकर दरबारी तपशील जाणून घेण्यासाठी आरोग्य संचालनालयापासून ते ग्रामपंचायत अशा विविध ठिकाणच्या सरकारी कार्यालयांत त्यांनी अनेकदा फेऱ्या मारल्या. माहितीच्या अधिकाराचा उपयोग करत माहिती मागवली असता इतिहासावर प्रकाश पडण्यास सुरुवात झाली.
 
सुरुवातीला आरोग्य संचालनालयाने संबंधित माहिती औरंगाबाद विभाग देईल असे म्हणत, अंग झटकले. तर औरंगाबाद विभागाने जालना विभागाकडे बोट दाखवले. विशेष म्हणजे जालना विभागाने तर असे रुग्णालय अस्तित्वातच नव्हते, असे सांगितले. हैद्राबादमधील संबंधित यंत्रणेशी पत्र व्यवहार केल्यानंतर ‘५० वर्षांवरील माहिती देणे बंधनकारक नाही’ असे उत्तर दिल्याने देव यांच्या पदरी पुन्हा निराशा आली.
 
मात्र विविध ठिकाणी पत्र व्यवहार करुन ‘त्या’ जागेला प्रत्यक्ष भेट दिल्यावर लक्षात आले, की ‘दारुल मजानिन अर्थात सरकारी मनोरुग्णालयाच्या जागेत दोन शाळा सुरु आहेत. रुग्णालयाच्या पुरुष इमारतीत ‘जनता हायस्कूल’ आणि महिला इमारतीत ‘राष्ट्रीय हिंदी विद्यालय’ सध्या सुरु आहे. १९५४-५५च्या दरम्यान ताबा मिळाल्यानंतर इमारतीची डागडुजी करण्यात आली. रुग्णालयाच्या इमारत शाळेसाठी वापरायोग्य बदल करुन तेथे अभ्यासाचे धडे शिकवण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती डॉ. देव यांनी दिली. 
 
जनता हायस्कुलचे मुख्याध्यापक जाधव आणि राष्ट्रीय विद्यालयाचे तत्कालीन उप-मुख्यध्यापक पिपरीये यांनी सांगितल्यानुसार, १९५४-५५ या कालावधीत ताबा मिळाल्यानंतर या इमारतीशी जवळून संबंध आला. दोन्ही इमारती हुबेहुब बांधण्यात आल्या आहेत. दोन्ही इमारतींत सुमारे २ किलोमीटरचे अंतर आहे.
डॉ. नीरज देव
 
१८९४ ते १९५३ या दरम्यान महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठरलेले हे रुग्णालय अचानक का हलवले गेले? मध्य महाराष्ट्राचा विचार केला असता ‘त्या’ दर्जाचे रुग्णालयाचे महत्त्व वारंवार जाणवत होते.
मनोरुग्ण हा विषय आजदेखील जनसामान्यात मोकळेपणाने चर्चिला जात नाही. नागरिकांमध्ये मनोरुग्ण म्हणजे थेट वेडा असा समज आहे. परिणामी मनोरुग्ण, मनोरुग्णालये आणि त्यांच्या समस्या कायम अंधारात राहिल्या आहेत. सध्या राज्यातील मनोरुग्ण ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी या ४ रुग्णालयांवर अवलंबून आहे. ब्रिटिश बनावटीची या रुग्णालयांच्या इमारती शंभरी नंतरही तग धरुन आहेत. मराठवाड्यातील मनोरुग्णांना उपचारासाठी पुणे, ठाणे येथे जावे लागते. परिणामी ही पायपीट रोखण्यासाठी आणि भौगोलिक महाराष्ट्राचा विचार केला असता आरोग्याच्या दृष्टीने मराठवाड्यात मनोरुग्णालयाची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 
 
दारुल ते ‘इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ’
जालना येथील सरकारी रुग्णालय हैद्रराबाद, इरागड येथे इन्स्टिट्यूट आॅफ मेंटल हेल्थ या नावाने सध्या कार्यरत झाले. तेलंगणा शासनाने २००६ साली आयएमएच चा विस्तार केला. राष्ट्रीय मनोरुग्ण आरोग्य कार्यक्रमांतर्गत गुन्हेगारप्रवृत्तीच्या मनोरुग्णांसाठी १५० बेडचे स्वतंत्र दालन येथे सुरु केले.
 
देशातील मनोरुग्णालयांची संख्या- ४३
महाराष्ट्रातील मनोरुग्णालयांची संख्या- ४
 
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने मानसिक आरोग्य समितीची स्थापना केली. त्या समितीच्या तांत्रिक समितीने मानसिक आरोग्य अहवाल तयार केला. महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी आरोग्याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करुन त्या प्रतिज्ञापत्रानुसार तयार केलेल्या अहवालातील सारांश, 
देशभरातील ४७ मानसिक रुग्णालयात ३६८ मानसिक रोगी मृत्यूमुखी पडतात. महाराष्ट्रासह पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असल्याचा ठपका अहवालाने ठेवला आहे. राज्यातील सरकारी मानसिक रुग्णालयात ५६९५ बेड आहेत. तर खासगी रुग्णालयातील बेडची संख्या २०६५ इतकी आणि वैद्यकिय महाविद्यालयात ४१० अशी एकूण मनोरुग्णांसाठी ८१७० बेड आहेत. राज्यातील ४८ वैद्यकिय महाविद्यालयांपैकी केवळ १५ महाविद्यालयात मानसिक विभाग कार्यरत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेच्या संचालक कार्यालयानुसार २००२ पर्यंत महाराष्ट्रात ३३ मानसशास्त्रज्ञ आहेत. प्रशिक्षित परिचारिकांची संख्या ११७ आहे.
 
राज्यातील मनोरुग्णालयांची सद्यस्थिती 
- प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे
स्थापना- १९०१ 
बेडची संख्या -१८५०
विस्तार - ७५ एकर
बांधकाम -५५ एकर
क्वार्टर्स - ५.५ एकर 
मोकळा परिसर- १४.५ एकर
अखत्यारित येणारी शहरे- मुंबई, ठाणेस रायगड, धुळे, जळगाव , नाशिक, नंदुरबार येथील मनोरु ग्णांसाठी.
 
- प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे
स्थापना - १९१५
बेडची संख्या- २४५०
विस्तार - ४२ एकर
बांधकाम- १० एकर
मोकळा परिसर- ३२ एकर 
अखत्यारित येणारी शहरे - पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, सातारा, सोलापूर,अहमदनगर. 
 
- प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर 
स्थापना - १९०४
बेडची संख्या - ९४०
विस्तार- ९९.२२ एकर
बांधकाम- ३९.७४ एकर
शासकीय निवास - १४.४६ एकर
मोकळा परिसर - २८.८० एकर
अखत्यारित येणारी शहरे- नागपूरसह संपूर्ण विदर्भ
 
- प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी
स्थापना - १८८६
बेडची संख्या- ३६५
विस्तार- १४ एकर १९ गुंठे
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली. 
 

Web Title: The search for the madhouse (part two)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.