सहा फरार दहशतवाद्यांचा ‘एटीएस’कडून शोध
By admin | Published: January 23, 2015 01:33 AM2015-01-23T01:33:49+5:302015-01-23T01:33:49+5:30
खंडवा कारागृहातून २०१३ साली फरार झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमधील सहा दहशतवाद्यांचा दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे.
अकोला : खंडवा कारागृहातून २०१३ साली फरार झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमधील सहा दहशतवाद्यांचा दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे. लूटमार आणि दरोडे टाकून जमवलेल्या पैशातून ते दहशतवादी कारवाया करीत असल्याची माहिती अकोला एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.
खंडवा येथील महेबूब ऊर्फ गुड्डू ऊर्फ मलिक ऊर्फ रमेश ऊर्फ समीर ऊर्फ अफताब ऊर्फ किसन इस्माईल खान (३२), अमजद खान ऊर्फ पप्पू ऊर्फ दाऊद रमजान खान (२६), अस्लम महंमद ऊर्फ असलम खान ऊर्फ साहेब ऊर्फ बिलाल ऊर्फ संतोष अयुब खान (२८), महंमद एजाजुद्दीन ऊर्फ एजाज ऊर्फ राजा ऊर्फ रियाज ऊर्फ राहुल ऊर्फ जॉन ऊर्फ अरविंद महंमद अजीजोद्दीन (३२), जाकीर हुसैन ऊर्फ सादीक ऊर्फ सिद्धीक ऊर्फ विक्की डॉन ऊर्फ विनयकुमार बदरूल हुसैन (२७) आणि मो.सलीक अब्दुल हकीम (३२) हे दहशतवादी आॅक्टोबर २०१३ मध्ये खंडवा कारागृहातून फरार झाले होते. त्यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर शहरात भाड्याने खोली घेतली आणि तिथे बारूद व जिलेटीनचा वापर करून बॉम्ब बनवित असताना अचानक स्फोट झाला. यात गुड्डू उर्फ महेबूब हा जखमी झाला होता. पुण्यातील बॉम्बस्फोटामध्येही या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या दहशतवाद्यांचा म्होरक्या अबू फैजल याला २३ डिसेंबर रोजी एटीएसने अटक केली होती. हे दहशतवादी कुठेही दिसल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन अकोला एटीएसने केले आहे. (प्रतिनिधी)