मासेमारीवर अनिश्चिततेचे सावट, कोरोनामुळे यंदाचा हंगामही गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:49 AM2020-08-02T01:49:11+5:302020-08-02T01:49:45+5:30
मुंबई शहर व उपनगरांत होणाºया मासेमारीचा विचार केल्यास येथे साधारण चार हजार ५०० बोटी आहेत. त्यात ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट पर्सीन व इतर लहानमोठ्या मच्छीमार बोटींचा समावेश आहे
नारळी पौर्णिमेनंतरचा मासेमारीचा हंगाम, मच्छीमारांना दोन पैसे मिळवून देतो. परंतु, गेल्या वर्षी ‘न भूतो न भविष्यति’ अशा नैसर्गिक आपत्तींना मच्छीमारांना तोंड द्यावे लागले. दहा महिने चालणारी मासेमारी जेमतेम पाच महिने झाली. आता १ आॅगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात करायची, तर कोरोनाचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. त्याचा परिणाम देशांतर्गत व परदेशांत निर्यात होणाऱ्या मासळीच्या किमतीवर होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई शहर व उपनगरांत होणाºया मासेमारीचा विचार केल्यास येथे साधारण चार हजार ५०० बोटी आहेत. त्यात ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट पर्सीन व इतर लहानमोठ्या मच्छीमार बोटींचा समावेश आहे. येथे येणारा खलाशी बहुतेक गुजरात, उत्तर प्रदेश व इतर जिल्ह्यांतून येतो. त्यांनी आरोग्याबाबत घ्यायच्या खबरदारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या सूचना पाळाव्या लागतील. मुंबईतील ससून डॉक व भाऊचा धक्का ही सर्वात मोठी मासळी लँडिंग सेंटर आहेत. साधारण ३०००च्या आसपास बोटींची नोंद या दोन ठिकाणांहून होते. जास्तीत जास्त गिºहाईक आल्यास मासळीला जास्त भाव मिळतो, हा अनुभव आहे. परंतु, कोरोनाच्या संकटात गिºहाइकांच्या संख्येवर निर्बंध लादले जाऊ शकतात, अशी भीती आहे.
मासेमारी सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी व मत्स्य व्यवसाय खाते यांनी दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, तर मासेमारी व्यवसाय होऊच शकत नाही, अशी भावना मच्छीमारांची आहे. मासळी निर्यातीचा विचार केल्यास, भारतातून जास्तीत जास्त मासळी चीनमध्ये निर्यात केली जाते. परंतु, काही दिवसांपासून भारताच्या सीमेवरील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे चीनने पाकिस्तान व बांगलादेश यांना करसवलत देऊन झुकते माप दिले आहे. त्यामुळे भारतीय मासळीला पाकिस्तान व बांगलादेश यांच्या स्पर्धेला तोंड देणे जड जाईल. परिणामी, निर्यातयोग्य मासळीचे भाव गडगडतील, ही भीती मच्छीमारांना आहे.
दुसरीकडे मुंबईतील मासळी बाजार अजून बंद आहेत. मुंबईची जीवनवाहिनी ट्रेन, सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज मंडई काही दिवसांपूर्वी सुरू केली होती. परंतु, तेथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने पुन्हा बंद करण्यात आली. अशीच परिस्थिती मुंबईच्या इतर मासळी मंडयांत उद्भवल्यास मासळीच्या विक्रीवर परिणाम होईल. अशा नैसर्गिक संकटात, डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीमुळे मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत जास्त संख्येने असलेल्या ट्रॉलर बोटींचा विचार केल्यास, साधारण एका फिशिंग ट्रीपसाठी (१० ते १५ दिवस) एका बोटीला २००० ते २५०० लीटर डिझेल लागते. लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत, चार महिन्यांत साधारण १८ ते २० रुपये डिझेल भाववाढ झाली, म्हणजे प्रत्येक ट्रीपसाठी मच्छीमारांना ३५ ते ५० हजार रुपये जादा मोजावे लागतील. याचा आर्थिक मेळ कसा बसवायचा, ही चिंता त्यांना भेडसावत आहे. डिझेल विक्रीकर परतावा मिळण्यात होणारी दिरंगाई, त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे व व्यवसाय कसा टिकवून ठेवावा, या विवंचनेत सध्या मच्छीमार समाज आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणीने गुजरात राज्यातील मच्छीमारांनी १ सप्टेंबरपासून मच्छीमारी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडेच मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांनी १५ आॅगस्टपासून मासेमारीला जाण्याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईतील मच्छीमार १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात करण्याच्या निर्णयाबाबत अजून संभ्रमात आहेत.
नियोजित वेळेत मासेमारी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एमपीईडीए, वाणिज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मासळी निर्यातीत असलेल्या कंपनीबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेतले, मच्छीमारांना भांडवलाची चणचण भासू नये म्हणून किसानकार्ड तत्सम योजना राबवून थकित परतावे दिले, तरच मच्छीमारीसंदर्भातील अडचणी काही अंशी दूर होतील.
गेल्या वर्षी एकापाठोपाठ एक वादळे आली आणि संपूर्ण मासेमारी हंगामावर पाणी फिरले. यातून कसेबसे सावरायचे तर यंदा कोरोनाचे संकट उभे ठाकले. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, लॉकडाऊन, त्यासंदर्भातील नियमांचे पालन आणि मासळी निर्यातीवर होणारे परिणाम अशा अनेक समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार गुरफटत चालले आहेत. आर्थिक अडचणींचे ढग आणि मत्स्य व्यवसायातील अनिश्चिततेच्या सावटात त्यांच्या उदरनिर्वाहाची बोट हेलकावे खाऊ लागली आहे.
(लेखक राष्टÑवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या मच्छीमार सेलचे अध्यक्ष आहेत. )