नाशिकमधल्या पर्यायी शाही मार्गावर शिक्कामोर्तब
By admin | Published: January 9, 2015 01:20 AM2015-01-09T01:20:55+5:302015-01-09T01:20:55+5:30
गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी दुर्घटनेस कारणीभूत झालेल्या अरुंद शाही मिरवणूक मार्गात बदल करण्यास साधू-महंतांनी सहमती दर्शवित नव्या पर्यायी मार्गावर शिक्कामोर्तब केले.
नाशिक : गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी दुर्घटनेस कारणीभूत झालेल्या अरुंद शाही मिरवणूक मार्गात बदल करण्यास साधू-महंतांनी सहमती दर्शवित नव्या पर्यायी मार्गावर शिक्कामोर्तब केले. परतीच्या अरुंद मार्गाचा विचार करता, त्यातही बदल करण्यास साधु-महंतांनी अनुकूलता दर्शविल्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या प्रारंभीच पर्यायी शाही मिरवणूक मार्गाला पसंती व साधुग्रामसाठी जागा अधिग्रहीत करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रशासनाने शाही मिरवणूक मार्गात काही बदल करून औरंगाबादरोडने मिरवणूक काट्यामारुती चौकात व तेथून गणेशवाडी मार्गे पुढे नेण्याचा प्रस्ताव सादर केला असता, त्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला.
या बैठकीत मंजूर कण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करता, काट्यामारुती चौकापासून आता गणेशवाडी मार्गे गाडगेमहाराज पुलाखालून शाही मिरवणूक सरदार चौकातून रामकुंडाकडे रवाना होईल. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सरदार चौकालगतच्या अरुंद जागेत चेंगराचेंगरी होऊन ३२ भाविकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी रुंदीकरणाला विरोध दर्शविल्याने महापालिकेनेही याबाबत आस्तेकदम भूमिका घेतली.