आसनव्यवस्थेचा तिढा कायम
By Admin | Published: April 7, 2017 12:44 AM2017-04-07T00:44:29+5:302017-04-07T00:44:29+5:30
महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसनव्यवस्थेचा तिढा अजूनही कायम आहे
पुणे : महापालिका सभागृहातील नगरसेवकांच्या आसनव्यवस्थेचा तिढा अजूनही कायम आहे. वाद मिटला असल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाने सुचवलेला तोडगा अमान्य असल्याची भूमिका घेतली आहे.
सभागृहात भाजपाचे संख्याबळ ९८ आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी १०, मनसेचे २ व एमआयएमचा १ असे संख्याबळ आहे. सभागृहात एकूण ४ रांगा आहेत. त्यातील दोन्ही बाजूंच्या दोन रांगांत प्रत्येकी ५२ व मधल्या दोन रांगांत प्रत्येकी ३९ अशी आसने आहेत. सर्व रांगांमधील पहिल्या आसनांची एकत्रित संख्या १४ आहे. सभागृहाच्या उजव्या बाजूला सत्ताधारी व डाव्या बाजूला विरोधक, पहिल्या रांगेत सर्व पक्षांचे गटनेते व त्यांच्या मागे त्यांचे सदस्य अशी आसनव्यवस्था असते.
सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या गटनेत्यांसाठी पहिल्या रांगेतील आसने व त्यांच्या मागे त्यांच्या पक्षाचे सदस्य अशी व्यवस्था हवी आहे. मात्र, सभागृहाच्या आसनरचनेमुळे ते शक्य नाही. भाजपाने सभागृहनेत्याबरोबरच उपमहापौर तसेच पक्षाचे ज्येष्ठ सदस्य यांच्यासाठी दोन रांगांमधील ७ जागा मागितल्या आहेत. राष्ट्रवादीलाही विरोधी पक्षनेते व त्यांच्या माजी महापौरांसाठी पहिल्या रांगेतीलच आसने हवी आहेत. शिवसेना, काँग्रेस व मनसेच्या गटनेत्यांनाही पहिल्या रांगेतीलच जागा हवी आहे. (प्रतिनिधी)
सभागृहातील डावीकडच्या दोन रांगा तुम्ही घ्या, त्यानंतरची एक रांग काँग्रेस, सेना, मनसे यांची असेल व नंतरच्या रांगेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बसतील असा पर्याय आम्ही दिला आहे. त्यांना तो मान्य नाही, त्यामुळेच त्यांनी पहिल्या तीन रांगांमध्ये त्यांच्या सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. ही मनमानी झाली व आम्ही सभागृहातच त्यांना याचे उत्तर देऊ.
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते
भाजपाची सदस्यसंख्या जास्त आहे. त्यामुळे आसनव्यवस्थेत काही बदल होणे स्वाभाविक आहे. त्यांना आम्ही निर्णय दिला आहे व तो समाधानकारक आहे. १९ एप्रिलला सभा होईल त्यामध्ये हा विषय मिटलेला, असेल अशी आशा आहे.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते
>माजी पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखा...
सध्या पदाधिकारी वगळता विरोधी व सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक पाहिजे तसे बसत आहेत. सत्ताधारी भाजपाचे गटनेते श्रीनाथ भिमाले व विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सेनेचे संजय भोसले, मनसेचे वसंत मोरे यांच्यात जागेसंबंधी आतापर्यंत तीन वेळा चर्चा झाली. मात्र, त्यात समाधानकारक तोडगा निघाली नाही. आमच्या माजी महापौर व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे असा विरोधी पक्षांचा आग्रह आहे तर सत्ताधाऱ्यांना काही अधिकार देणार की नाही असा भिमाले यांचा सवाल आहे.