समुद्रात बुडालेल्या "ज्या" मित्राला रात्रभर शोधलं, "तो" घरी झोपलेला सापडला
By Admin | Published: April 3, 2017 05:39 PM2017-04-03T17:39:12+5:302017-04-03T17:42:30+5:30
समुद्रात बुडाला म्हणून रात्रभर त्याचे मित्र शोध घेत होते. पण दुस-या दिवशी सकाळी तोच मित्र आपल्या घरी आरामशीर झोपलेला सापडला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - समुद्रात बुडाला म्हणून रात्रभर त्याचे मित्र शोध घेत होते. पण दुस-या दिवशी सकाळी तोच मित्र आपल्या घरी आरामशीर झोपलेला सापडला. पोलीस आणि मित्र रात्रभर जागे राहून त्याचा शोध घेत होते, आणि या महाशयांनी इथे राहत्या घरी रात्रीची झोप काढली होती. वांद्रे रेक्लमेशन गार्डनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणा-या संजय शुक्ला आणि रहीम शेखमध्ये समुद्रकिनारी बुधवारी रात्री जोरदार भांडण झालं होतं. यावेळी त्यांच्यासोबत काम करणा-या लक्ष्मण पांडेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही भांडण सुरुच राहिलं.
सर्वजण दारुच्या नशेत असल्याने त्यांना साधं उभं राहायलाही जमत नव्हतं. रहीमने दारुच्या नशेत संजयला समुद्रात ढकलून दिलं आणि स्वत:ही उडी मारली. त्यांचा जीव वाचवण्यासाठी लक्ष्मणनेही समुद्रात उडी घेतली. यावेळी संजय कसातरी प्रयत्न करत दगडाच्या सहाय्याने समुद्राबाहेर आला.
तिकडे लक्ष्मणने रहीमचा जीव वाचवला आणि संजयचा शोध सुरु केला. संजय मिळत नसल्याचं पाहून त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात मित्र बुडाल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. संजयचा शोध सुरु राहिला, पण तो काही सापडला नाही.
रात्रभर शोध सुरु होता. अखेर संजय सापडत नसल्याचं पाहून सर्च ऑपरेशन थांबण्यात आलं. दुस-या दिवशी सकाळी संजयच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी फोन केला तेव्हा कुटुंबियांनी सांगितलं की संजय तर घरी आरामात झोपला आहे.