खासगी कंपन्यांचे ७० टक्के बियाणे बाजारात
By admin | Published: May 18, 2017 02:04 AM2017-05-18T02:04:24+5:302017-05-18T02:04:24+5:30
महाबीज, एनएससी बियाणे पुरवठ्याची गती संथ
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पाऊस नेहमीपेक्षा लवकर धडकण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांना वाजवी भावात बियाणे पुरवठा करणारे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून बियाणे पुरवठ्याची गती मंदावलेली आहे. त्याचवेळी खासगी कंपन्यांनी मागणीच्या तब्बल ७० टक्के बियाण्यांचा पुरवठा बाजारात केला आहे. त्याचवेळी महामंडळाचे तूर, मूग, उडीद बियाणे तर बाजारात पोचलेच नाही. त्यामुळे पेरणी साधण्याची संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांना ऐनवेळी अधिक दराने खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७-१८ साठी शासनाकडे बियाण्यांची मागणी केली आहे. त्यानुसार बियाणे पुरवठ्याचा कालावधीही ठरला आहे. दरम्यान, पाऊस लवकरच धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची पेरणीची वेळ साधण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळण्यासाठी बाजारात मुबलक साठा असणे आवश्यक आहे. मागणीनुसार महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, खासगी कंपन्यांनी बाजारात बियाणे पुरवठ्याला सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्ये खासगी कंपन्यांनी शासनाच्या दोन्ही महामंडळांना कमालीचे मागे टाकले आहे. त्यामुळे बाजारात सध्यातरी खासगी कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार आहे.
सोयाबीन पुरवठ्यातही खासगी कंपन्या पुढे
महामंडळाचे बियाणे तुलनेने स्वस्त मिळते. मोठ्या प्रमाणात शेतकरी ते बियाणे घेतात. बाजारात सध्या खासगी कंपन्यांचे बियाणे मुबलक प्रमाणात आहे. सोयाबीन बियाण्याचा तर कंपन्यांनी बाजारात ८६ टक्के पुरवठा केला आहे. तर दोन्ही महामंडळाचा पुरवठा ५० टक्क्यांच्या आत आहे. खासगी कंपन्यांनी त्यांना मागणी केलेल्या २६९९० क्विंटलपैकी २३४५० क्विंटलचा पुरवठा केला. महामंडळांनी ४० हजार क्विंटल मागणीच्या तुलनेत १९५०० क्विंटल एवढा पुरवठा केला आहे.
खपात महामंडळाचे सोयाबीन बियाणे पुढे
वाजवी किमतीत असल्याने महामंडळाच्या बियाण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. आतापर्यंत बाजारातून विक्री झालेल्या बियाण्यांत महामंडळाचे सोयाबीन ५११५ क्विंटल, तर खासगी कंपन्यांच्या २५६० क्विंटलची नोंद झाली आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल महामंडळाच्या बियाण्यांकडेच अधिक असल्याचे दिसत आहे.
महामंडळाचे ४३ टक्केच बियाणे पोचले!
कृषी विभागाच्या मागणीप्रमाणे महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून सर्व प्रकारच्या बियाण्यांचा एकूण ४६ हजार ४० क्विंटल पुरवठा होणे आवश्यक आहे. त्या तुलनेत या दोन्ही महामंडळांकडून १५ मे अखेरपर्यंत २० हजार ६० क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे. त्यामध्ये सोयाबीनच १९५०० क्विंटल आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न पाहता इतर आवश्यक बियाण्यांचा पुरवठा अद्यापही झालेला नाही. तूर, मूग, उडिदाचे बियाणेही बाजारात आलेले नाही. त्यामुळे आधीच बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळांच्या बियाण्यांची प्रतीक्षा आहे.