दुसऱ्या क्रमांकाकरिता भाजपा, राष्ट्रवादीत चुरस
By admin | Published: February 13, 2017 12:39 AM2017-02-13T00:39:03+5:302017-02-13T00:39:03+5:30
शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता ठाणे शहराने दिली असून, येथील पक्षाचे संघटनात्मक जाळे अन्य पक्षांपेक्षा मजबूत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाडाव झाला, तर...
संदीप प्रधान / ठाणे
शिवसेनेला सर्वप्रथम सत्ता ठाणे शहराने दिली असून, येथील पक्षाचे संघटनात्मक जाळे अन्य पक्षांपेक्षा मजबूत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाडाव झाला, तर तो केवळ चमत्कार असेल. मात्र, नेतृत्व नरेंद्र मोदींचे असले, तरीही चमत्कार हे वरचेवर होत नसल्याने, येथे दुसऱ्या क्रमांकाकरिता भाजपाची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर स्पर्धा आहे.
ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांमधील १३१ जागांकरिता ठाणेकर मतदान करणार असले, तरी सध्या निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याचे वातावरण शहरात कुठेही दिसत नाही. झेंडे लावण्यापासून प्रचारफेऱ्यांपर्यंत सर्वच प्रचारावर असलेली बंधने, नोटाबंदीचा फटका, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांमध्ये असलेला संभ्रम, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा उमेदवारांच्या पाठीमागे लागलेला ससेमिरा अशा नानाविध कारणांमुळे ही निवडणूक कधी झाली, तेच मतदारांना उमगणार नाही, असे चित्र आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, ‘मातोश्री’ने आपले सर्व लक्ष मुंबईतील जीवनमरणाच्या लढाईवर केंद्रित केले आहे. त्यामुळे ठाण्याचा गड राखण्याकरिता शिवसेनेची मदार शिंदे यांच्या खांद्यावर आहे. भाजपामध्ये सामूहिक नेतृत्व आहे. मात्र, मुख्य जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खा. कपिल पाटील यांच्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा जितेंद्र आव्हाड हेच आहेत. भाजपाची टक्कर शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर असल्याने वेगवेगळ््या पक्षातील नामचीन गुंड गोळा करून, या पक्षाने आपल्या बेंडकुळ््या फुगवल्या आहेत. यामुळे संघ-भाजपाची जुनी मंडळी दुखावली आहेत. भाजपाच्या नाकाला शेंबूड लागलेला दिसत असताना, शिवसेनेने कसे २० ते २२ गुंड रिंगणात उतरवले आहेत, हे उच्चरवात सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न पक्षाने केला. अर्थात, सर्व पक्षातील सर्व गुंडांनी त्याचे वॉर्ड मनगटशाही व लक्ष्मीदर्शनाने बांधलेले असल्याने तेच पुन:पुन्हा निवडून येणार असल्यानेच भाजपासह सर्व पक्षांनी हा निलाजरा उद्योग केला आहे.
ठाणे शहरातील सर्वात जटिल प्रश्न वाहतूककोंडीचा आहे. जुन्या ठाण्यातील अरुंद रस्ते ओलांडल्याखेरीज घोडबंदरपर्यंत विस्तारलेल्या ठाण्यातील टॉवर्सपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे रस्त्यांवर कायम वाहतूककोंडी असते. जुन्या इमारती, पाणीटंचाई, कचरा विल्हेवाट वगैरे हे सर्व प्रश्न मुंबई इतकेच ठाण्यात डोकेदुखी ठरलेले आहेत.
महापालिकेच्या एकूण जागा १३१ असल्या, तरीही कुठलाच पक्ष तेवढ्या जागांवर उमेदवार देऊ शकलेला नाही. शिवसेना ११९, भाजपा १२०, राष्ट्रवादी काँग्रेस ८५, काँग्रेस ५३ तर मनसे ९९ जागा लढवत असून, एकूण २५ छोटे-मोठे पक्ष रिंगणात असले, तरी लढती चौरंगी होणार आहेत. दोन्ही काँग्रेसने मुंब्रा परिसरातील १५ तर ठाण्यातील चार जागांवर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार हा प्रचाराचा मुद्दा केला आहे, तर भाजपाने गुंडांना दिलेले अभय यावर शिवसेनेच्या प्रचाराचा भर आहे.
मागील महापालिकेत शिवसेना ५६, भाजपा ८, राष्ट्रवादी काँग्रेस ३४, काँग्रेस १५, मनसे ७ आणि अपक्ष ७ असे चित्र होते. या वेळी शिवसेनेच्या जागा वाढून ६० ते ६२ पर्यंत जाऊ शकतात. मात्र, स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकरिता ६६ जागांची मॅजिक फिगर गाठणे त्यांना शक्य होईल किंवा कसे याबाबत साशंकता आहे. भाजपाच्या जागांमध्ये वाढ होऊन हा पक्ष ३० ते ३२ जागांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसून त्यांचे संख्याबळ घटू शकते. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कळवा-मुंब्रा पट्ट्यात आपली ताकद राखतील. अन्यत्र पक्षाला फटका बसेल, अशी शक्यता आहे. काँग्रेस आणि मनसे यांना जबर फटका बसण्याची चिन्हे आहेत.