दुस-या, चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी
By admin | Published: February 24, 2015 04:35 AM2015-02-24T04:35:40+5:302015-02-24T04:35:40+5:30
देशभरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह काही प्रमुख खासगी व नागरी सहकारी बँका यापुढे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार असून, इतर शनिवारी पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत.
मुंबई : देशभरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह काही प्रमुख खासगी व नागरी सहकारी बँका यापुढे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार असून, इतर शनिवारी पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत. ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (आयबीए) ही बँकांची संघटना आणि बँकांमधील आठ लाखांहून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ देशव्यापी संघटना यांच्यात सोमवारी मुंबईत वेतनवाढीचा नवा करार झाला त्यात हा निर्णय झाला.
या करारानुसार बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी १५ टक्के वाढ होईल. वाढीव वेतन १ नोव्हेंबर २०१२पासूनच्या पूर्वलक्षी परिणामाने लागू होईल. याचा बँकांवर वर्षाला ४,७२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. या वेतनवाढीचा किती हिस्सा अधिकारीवर्गाला व किती कर्मचाऱ्यांना द्यायचा हे ३१ मार्च २०१२ अखेरच्या प्रशासन खर्चाची विगतवारी करून स्वतंत्रपणे ठरविण्यात येईल, असे वाटाघाटींच्या अधिकृत इतिवृत्तामध्ये नमूद केले गेले आहे.
बैठकीत झालेल्या उभयपक्षी सहमतीनुसार नोव्हेंबर २०११पर्यंतचा ४,४४० अंशांचा (६०.१५ टक्के) महागाईभत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून व त्यावर ३१ मार्च २०१२पर्यंतच्या काळासाठीचा दोन टक्के ‘लोड फॅक्टर’ जमा करून नंतर नव्या वेतनश्रेणींची आखणी केली जाईल. यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वेतनवाढीखेरीज आणखी ५९७ कोटी रुपयांचा लाभ होईल.
सदस्य बँका आणि त्यांच्या कर्मचारी संघटना यांच्यात प्रलंबित असलेल्या ज्या इतर बाबींवर या वाटाघाटींमध्ये चर्चा झाली त्या त्यांच्या पातळीवर उभयतांचे समाधान होईल अशा रितीने सोडविल्या जातील.
तसेच दोन्ही पक्षांनी उभयतांना सोईस्कर
अशा दिवशी पुन्हा भेटून पुढील ९० दिवसांत विविध विषयांसंबंधीचा सविस्तर समझोता
तयार करावा, असेही ‘आयबीए’च्या कफ परेड येथील कार्यालयात झालेल्या वाटाघाटींमध्ये ठरले. आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन, आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशनसह नऊ संघटनांच्या प्रतिनिधींनी या वाटाघाटींमध्ये भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)