रामझुल्याचा दुसरा टप्पा दीड वर्षात
By admin | Published: January 20, 2015 01:16 AM2015-01-20T01:16:46+5:302015-01-20T01:16:46+5:30
रामझुला उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. या कामाला तातडीने सुरुवात करून ते दीड वर्षात पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्र्यांचे निर्देश : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
नागपूर : रामझुला उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासनाकडून आवश्यक मदत दिली जाईल. या कामाला तातडीने सुरुवात करून ते दीड वर्षात पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले.
रविभवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी रामझुला टप्पा -२ पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. महापौर पवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध’क्षक अभियंता आर.पी.खोडकुंभे, विदर्भ टॅक्स पेअर असोसिएशनचे तेजिंदरसिंह रेणू , अॅबकॉन्स इन्फ्रा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
रामझुला टप्पा-१ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु रेल्वे स्टेशनजवळील चौकात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम करताना पुढील २० वर्षातील रहदारीचा विचार करावा. यासाठी श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स ते मेयो हॉस्पिटल चौकादरम्यान हा पूल उभारण्यात यावा. यावरील खर्च व आराखडा ३० जानेवारीपर्यंत तयार करा.
कंत्राटदाराने निर्धारित कालावधीत काम पूर्ण केले नाही तर निविदेच्या २० टक्के रक्कम गोठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
अपघाताला आळा बसावा
रेल्वे स्टेशनजवळील चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. हा चौक विकसित करून पुढील २० वर्षात या मार्गावरील वाहतुकीचा विचार व्हावा, अपघाताला आळा बसेल, असा आराखडा तयार करण्याची सूचना महापौर प्रवीण दटके यांनी केली.