दौंडला दुसऱ्यांदा गळती
By admin | Published: June 10, 2016 01:12 AM2016-06-10T01:12:26+5:302016-06-10T01:12:26+5:30
येथील रोटरी सर्कलजवळ नगर परिषदेच्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
दौंड : येथील रोटरी सर्कलजवळ नगर परिषदेच्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानक जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी थेट राज्य राखीव पोलीस बल गटाच्या स्टेट बँकेजवळ गेले होेते.
दरम्यान या पाणीगळतीचा परिणाम शहरातील काही भागात पाणीपुरवठ्यावर झाला होता. त्यानंतर नगर परिषदेने जलवाहिनीची डागडुजी केल्यानंतर गुरुवार, (दि.९) रोजी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली. त्यामुळे तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.
>नियोजनशून्य कारभार
दरम्यान शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीस मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी शहरासाठी विशेष बाब म्हणून खडकवासला धरणातून नागरिकांसाठी पिण्याचे पाणी कालव्याद्वारे सोडले. परंतु हे पाणी नागरिकांना पुरवठा करीत असताना नगर परिषदेने कुठल्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही.
प्रशासनावर
कारवाई करावी
दौंड शहरातील जलवाहिनीला गळती लागल्याने गेले तीन दिवस लाखो लिटर पाणी वाया गेलेले आहे.
तेव्हा या घटनेला जबाबदार असलेल्या नगर परिषद प्रशासनाला तातडीने सूचना देऊन वेळप्रसंगी प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दौंड शुगरचे ज्येष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.