सपाची दुसरी यादी जाहीर
By admin | Published: January 16, 2017 02:27 AM2017-01-16T02:27:58+5:302017-01-16T02:27:58+5:30
हक्काच्या मुस्लीम व्होट बँकेवर ‘एमआयएम’मुळे आव्हान निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पार्टीसाठी अस्तित्वाची परीक्षा ठरणार आहे.
मुंबई : हक्काच्या मुस्लीम व्होट बँकेवर ‘एमआयएम’मुळे आव्हान निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पार्टीसाठी अस्तित्वाची परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात पक्षाने आघाडी घेतली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी रविवारी पाच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये दोन नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे सपाने जाहीर केले. गेल्या आठवड्यात सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासह २४ उमेदवारांची यादी पक्षाने जाहीर केली होती. रविवारी विद्यमान नगरसेविका आयेशा शेख (वार्ड क्रमांक १३७), नगरसेवक अशरफ आजमी (१६५) यांच्यासह संगीता पाटील (६४), शायरा खान (१३४), शाहीन चौधरी (१३५) यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दोन विद्यमान नगरसेवकांसह पाचही जणांची निवड पक्षकार्य, भागातील संपर्क या निकषांवर करण्यात आल्याचे अबू आझमी यांनी सांगितले. उर्वरित उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)