दुसरी नोटीस दिली, जिप्सम बंद होणार?
By admin | Published: January 17, 2017 03:42 AM2017-01-17T03:42:47+5:302017-01-17T03:42:47+5:30
नारे गावातील जिप्सम कंपनीने केलेला खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला असून उत्पादन बंद का करू नये
वाडा : या तालुक्यातील नारे गावातील जिप्सम कंपनीने केलेला खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला असून उत्पादन बंद का करू नये, अशी दुसरी नोटीस बजावली आहे. तिचे उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जे हे उत्तर समाधानकारक नसेल तर कंपनीतील उत्पादन बंद केले जाऊ शकते.
कंपनीकडून होणाऱ्या प्रदूषणाविषयी ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मंडळाने पाहणी करून कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिचा केलेला खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमान्य केला असून तिला दुसरी नोटीस बजावली आहे.
वाडा तालुक्यातील नारे ग्रामपंचायत हद्दीत सेंट गोबेन (जिप्सम) ही जिप्सम शीट्स व पावडर बनविणारी कंपनी असून या कंपनीमुळे पाणी, हवा व जमिनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विरोधात ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्र ार केली होती. तिची दखल घेऊन मंडळाने दि. ३० डिसेंबर २०१६ रोजी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत कंपनीची प्रत्यक्ष पाहणी केली असता कंपनी जलप्रदूषण , हवा प्रदूषण, धोकादायक वस्तूंची विल्हेवाट लावणे या कायद्यांतील तरतूदींचे उल्लंघन करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. ३ जानेवारी रोजी कंपनीला नोटीस बजावून ४८ तासांत खुलासा देण्याचे आदेश दिले होते. याविषयी कंपनी व्यवस्थापनाने ७ जानेवारी रोजी दिलेल्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी पुन्हा दि. १० जानेवारी रोजी पाहणी केली असता कंपनी प्रदूषण विषयक नियमांचा भंग करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा एकदा कंपनीला सात दिवसांची नोटीस बजावून कंपनीचा परवाना रद्द करणे, कंपनीचे उत्पादन थांबविणे व कंपनीचा वीज व पाणी पुरवठा थांबविण्याचे आदेश देण्याचा इशारा दिला आहे.यामुळे कंपनीचे धाबे दणाणले आहेत. (वार्ताहर)
आम्हाला आमचे गाव प्रदुषण मुक्त करायचे आहे. जिप्सममुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभिर बनला आहे. वारंवार तक्रारी , आंदोलने करुनही महसूल प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत आहेत. - सुधीर पाटील, उपसरपंच, नारे ग्रामपंचायत