संघर्ष यात्रेचा १९ पासून दुसरा टप्पा
By Admin | Published: April 7, 2017 05:58 AM2017-04-07T05:58:15+5:302017-04-07T05:58:15+5:30
विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १९ एप्रिलपासून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथून सुरु होणार
मुंबई : विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १९ एप्रिलपासून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथून सुरु होणार असून या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष नेत्यांच्या बैठक घेण्यात आली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, कुणाल पाटील, निर्मला गावित, पांडुरंग बरोरा, नरहरी झिरवळ संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. सुनील केदार यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली.