थ्री-जी सेवेत गडचिरोली जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी
By admin | Published: November 4, 2015 02:23 AM2015-11-04T02:23:44+5:302015-11-04T02:23:44+5:30
बीएसएनएलच्या वतीने जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळांवर थ्री-जी सेवा लावण्यात आली असून प्रत्येक तालुकास्थळ थ्री-जी सेवेने जोडण्यात आलेला पुण्यानंतर गडचिरोली
- दिगांबर जवादे, गडचिरोली
बीएसएनएलच्या वतीने जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळांवर थ्री-जी सेवा लावण्यात आली असून प्रत्येक तालुकास्थळ थ्री-जी सेवेने जोडण्यात आलेला पुण्यानंतर गडचिरोली हा राज्यात दुसरा जिल्हा ठरला आहे.
प्रत्येक युवक व नागरिकांच्या हातामध्ये स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलच्या साहाय्याने फेसबुक व व्हॉट्सअॅपचा वापर करणे अगदी सामान्य बाब झाली आहे. या सर्वांचा वापर चांगल्या पद्धतीने होण्यासाठी इंटरनेटची स्पिड असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेट स्पिडसाठी थ्री-जी सेवा असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन बीएसएनएलसह सर्वच खासगी दूरसंचार कंपन्यांनी थ्री-जीची यंत्रणा बसविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मात्र बीएसएनएलची थ्री-जी सेवा राज्यातील बहुतांश तालुकास्थळांपर्यंतही पोहोचलेली नाही. मागास व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यावर बीएसएनएलने विशेष मर्जी दाखविली आहे. प्रगत असलेल्या अनेक तालुकास्थळांवर व मोठ्या शहरांमध्ये थ्री-जी यंत्रणा लावण्यात आली नसली, तरी गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळे थ्री-जी यंत्रणेने जोडण्यात आली आहेत. बीएसएनएलने सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळांवर थ्री-जी यंत्रणा लावली होती. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तालुकास्थळांवर थ्री-जी यंत्रणा लावण्याचे काम सुरू केले. दोन महिन्यांपूर्वी सर्वच तालुकास्थळे थ्री-जी यंत्रणेने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकही बीएसएनएलला विशेष पसंती देत असल्याचे दिसून येते.