अल्पवयीन मुलीवर दुसऱ्यांदा बलात्कार
By admin | Published: July 11, 2015 02:13 AM2015-07-11T02:13:16+5:302015-07-11T02:13:16+5:30
जेरबंद करण्यासाठी सापळा रचलेला असताना पोलिसांसमोरच अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा
जालना : जेरबंद करण्यासाठी सापळा रचलेला असताना पोलिसांसमोरच अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उशिरा जालन्यात घडली़ याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, दोन्ही तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मित्रासह नाव्हा बायपास रस्त्यावर फिरायला गेलेल्या साडेसतरा वर्षीय मुलीवर दोन तोतया पोलिसांनी सोमवारी रात्री अत्याचार केला होता़ पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी रात्री पिडीत मुलीचा मोबाईल घटनास्थळी राहिला होता़ तो परत देण्यासाठी या नराधमांनी पिडीत मुलीच्या आईच्या मोबाईलवर संपर्क साधत दोन हजारांची खंडणी मागितली. आईने याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन गुरुवारी सापळा लावला.
मात्र, ते पोलिसांच्या हाती लागले नाही. पुन्हा त्याच रात्री दोघांनी पिडीत मुलीच्या आईशी संपर्क साधून मोबाईल घेण्यासाठी अंबड चौफुलीजवळील रेल्वे उड्डाणपूल परिसरात बोलावले. त्यामुळे पोलिसांनी त्याच रात्री पुन्हा सापळा रचला. त्यानुसार मुलीला मंठा चौफुलीहून स्कुटीवर पाठविण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मुलगी उभी असताना दोन्ही नराधमांनी तिला जवळच्या नाल्यात नेऊन अत्याचार केला. पिडीत मुलगी ओरडत आल्याने हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला, मात्र तोपर्यंत दोन्ही नराधमांनी धूम ठोकली. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आरोपींनी नियोजित ठिकाणी येण्यापूर्वीच मुलीला गाठून रेल्वे उड्डाणपुलाखाली बलात्कार केला व नंतर तिला रस्त्यावर सोडून दिले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच जालना गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्रीच रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही आरोपींना जेरबंद केल्याची माहिती नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली़ तर सापळा लावलाच नव्हता. रात्री ८.३० च्या सुमारास तिच्या नातेवाईकांनी मला माहिती दिली. त्यावरून आरोपींना पकडण्यासाठी आपण वरिष्ठांना माहिती देवून सापळा लावणार होतो.
मात्र, त्यापूर्वीच ती मुलगी घराबाहेर पडली आणि ही घटना घडली, असे स्पष्टीकरण विशेष कृृती दलाचे प्रमुख विनोद इज्जपवार यांनी दिले आहे़ (प्रतिनिधी)