इंदापुरात रंगले दुसरे गोल रिंगण
By Admin | Published: June 28, 2017 01:42 AM2017-06-28T01:42:25+5:302017-06-28T01:42:25+5:30
आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर (जि. पुणे) : आभाळाला साक्षी ठेवत मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान इंदापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई कदम हायस्कूलच्या मैदानात संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.
पांढऱ्या ढगांमध्ये काळ्या ढगांची झालेली पेरणी, हवेत बराचसा उष्मा, सभोवार भाविकांची गर्दी आणि भुईवरच्या लाल मातीत खुरांचे ठसे उमटवत वाऱ्याच्या वेगाने दौडणारे दोन कृष्णरंगी अश्व, सभोवती फडफडणाऱ्या पताका...
ग्यानबा-तुकारामाचा अखंडित उद्घोष, साथीला टाळ-चिपळ्या व मृदंगाची भक्तिभावाला साद घालणारी लय. अशा मंतरलेल्या वातावरणात हे तालुक्यातील दुसरे अश्वरिंगण रंगले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्याने प्रथमत: संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीच्या नगारखान्याचे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाले. सव्वाबारा वाजता पालखीचा रथ आला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, आदींनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखीचा रथ रिंगणातून फिरवण्यात आला. हर्षवर्धन पाटील यांनी रथाचे सारथ्य केले. पूजा झाल्यानंतर प्रत्यक्षात रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली.
सर्वप्रथम झेंडेकरी, त्यानंतर तुळशीवाल्या महिलांची दौड झाली. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्वरिंगणाचा सोहळा झाला. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात आणण्यात आली. तेथे पालखीच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटल्याचे चित्र दिसत होते.
निळोबाराय पालखी पहिल्यांदाच वारीत
हजारो भाविकांची मांदियाळी, फुलांचा वर्षाव आणि संत तुकाराम महाराज यांच्यावर संत निळोबाराय यांनी रचलेल्या अभंगाची कवने सादर केल्याने झालेले भक्तीमय वातावरण आणि फुलांचा वर्षाव व दोन्ही संतांच्या पादुका एकाच ठिकाणी आल्यावर ‘एकोबा, तुकोबा, निळोबा’ च्या रंगलेल्या जयघोषात संत तुकाराम महाराज व संत निळोबाराय यांच्या पालखीचा भेटीचा ऐतिहासिक सोहळा इंदापुरात रंगला़ संत परंपरेतील शेवटचे संत समजले जाणारे संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळयाचा इतिहासात पहिल्यांदाच वारीत समावेश झाला आहे़ जगदगुरू संत तुकाराम महाराज यांना गुरू मानून निळोबा गाथा लिहिणाऱ्या संत निळोबारायांनी श्री क्षेत्र पिंपळनेर येथे समाधी घेतली.