रस्ते घोटाळा चौकशीची दुसरी फेरी मंदावली
By admin | Published: July 15, 2016 08:30 PM2016-07-15T20:30:39+5:302016-07-15T20:30:39+5:30
रस्ते दुरुस्ती चौकशीच्या पहिल्या फेरीतच मोठा घोटाळा उघड झाल्यामुळे दुसरी फेरी तात्काळ सुरु करण्यात आली़
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 -रस्ते दुरुस्ती चौकशीच्या पहिल्या फेरीतच मोठा घोटाळा उघड झाल्यामुळे दुसरी फेरी तात्काळ सुरु करण्यात आली़ मात्र अधिकाऱ्यांचे निलंबन व अटक, अभियंत्यांमध्ये रोष अशा सर्व घटनानंतर चौकशीची दुसरी फेरी थंडावली आहे़ आणखी अभियंत्यांचे निलंबन केल्यास अभियंतावर्गात असंतोष वाढून रस्ते विभागाचा कारभार ऐन पावसाळ्यात कोलमडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे़ त्यामुळे पोलिसांमार्फत सुरु असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत पालिकेची चौकशी संथगतीने सुरु आहे़
मुंबईतील ३४ रस्त्यांच्या कामांची सहा महिने चौकशी केल्यानंतर एप्रिल महिन्यांत अहवाल सादर करण्यात आला़ रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे या चौकशीतून उघड झाले होते़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांना निलंबित करण्यात आले़ तसेच आणखी २२६ रस्त्यांच्या कामाची चौकशी तात्काळ सुरु करण्यात आली़
मात्र दोन अभियंत्यांच्या अटकेमुळे अभियंतावर्गात रोष पसरला असून २० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या कृती समितीने दिला आहे़ यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहेत़ पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती तातडीने करुन घेण्याची गरज आहे़ त्यातच रस्ते विभागात मनुष्यबळ कमी असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे़ त्यामुळे चौकशी दुसऱ्या फेरी गेले महिनाभर जैसे थेच असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले़ प्रतिनिधी
चौकट
दुसऱ्या अहवालाच्या प्रतीक्षेत
* दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता एसक़ोरी यांच्या अध्यक्षतेखाली २२६ रस्त्यांची चौकशी सुरु आहे़ पहिला चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर दुसरी फेरी तात्काळ सुरु झाली़ त्यानुसार रस्त्यांची पाहणीही करण्यात आली़ मात्र अद्याप अहवाल सादर झालेला नाही़ दक्षता खात्याला याबाबत वारंवार सुचना करुनही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़
पहिल्या फेरीत ३५२ कोटींचा घोटाळा
रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने कामाच्या गुणवत्तेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे़ ही सार्वजनिक पैशांची नासाडी असून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने पहिल्या फेरीच्या अहवालातून केली होती़ सुमारे ३५२ कोटी रुपयांचा हा घोटाळा होता़
यांच्यावर झाली कारवाई
रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक, थार्डपार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक, के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकाणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे़ यापैकी आतापर्यंत तीन ठेकेदारांना अटक झाली आहे़
टप्याटप्याने होणार कारवाई
या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागणार आहे़ मात्र एकाचवेळी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई शक्य नसल्यामुळे सर्वप्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे़ त्यानंतर इतर अधिकाऱ्यांची या घोटाळ्यातील जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात येणार आहे़