दुय्यम मिश्र खत पुन्हा माथी
By admin | Published: October 25, 2016 02:06 AM2016-10-25T02:06:33+5:302016-10-25T02:06:33+5:30
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून
- राजेश निस्ताने, यवतमाळ
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून कारखान्यांच्या वतीने मध्यस्थी केली जात आहे.
महाराष्ट्राचा अपवाद वगळता, देशात कुठेच दुय्यम मिश्र खत विक्रीला परवानगी नाही. ही परवानगी केंद्राच्या अधिकारात येते, परंतु २०११ मध्ये राज्यात चार डझनांवर कारखान्यांना परवानगी देण्यात आली होती. या परवानगीसाठी तत्कालीन कृषी मंत्रालयातून खास पुण्यात ‘झेंडे’ रोवले गेले होते. राज्य शासनाने अधिसूचना काढून दुय्यम मिश्र खताची १०-५-१० ही ग्रेड मंजूर केली. आता या कारखान्यांचे परवाने नूतनीकरण करून देण्याची तयारी कृषी आयुक्तालयात सुरू
झाली आहे. या नूतनीकरणासाठी खुद्द कृषी मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. सर्व कारखानदारांच्या वतीने सहकार मंत्रालयातून कृषी मंत्रालयाकडे ‘मध्यस्थी’ केली
जात आहे. कारण त्यांना आपल्याही एका कारखान्याच्या परवान्याचे ‘मंगल’ करून घ्यायचे आहे.
मुळात या कारखान्यांना २०११ मध्ये देण्यात आलेला परवानाच चुकीचा व नियमबाह्य असल्याचे सांगितले
जाते. कारण केंद्र शासनाला मिश्र खत हा प्रकारच मान्य नाही. महाराष्ट्रात तर त्याही पुढे जाऊन दुय्यम दर्जाच्या मिश्र खत कारखान्यांना परवानगी देण्यात
आली आहे. या परवानगीमुळे अशिक्षित, गोरगरीब शेतकऱ्यांची स्वस्त खताच्या नावाखाली सर्रास लूट केली जात आहे.
- अवघे ५० ते ६० रुपये उत्पादन खर्च असलेल्या या दुय्यम खताच्या प्रती बॅगची किंमत ३०० ते ४०० रुपये आकारली जाते. अनेक कृषी केंद्रचालक मनमानी पद्धतीने या खताची विक्री करतात. दुय्यम मिश्र खत कारखान्यांना परवाने देतानाच मोठी ‘उलाढाल’ झाली होती. त्याची पुनरावृत्ती करून, या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची तयारी सुरू आहे.
- या खताचे विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्र कारखाने आहेत. हे खत जणू मातीच्या स्वरूपात राहते. त्यातील घटक एकजीव होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘रिझल्ट’ मिळत नाही. दर्जेदार खताची बॅग १२०० रुपयांपर्यंत मिळते. त्यावर कृषी केंद्र विक्रेत्याला ‘मार्जिन’ कमी राहते. म्हणून जादा मार्जिनच्या ३०० ते ४०० रुपयांत मिळणाऱ्या खताची शिफारस केली जाते. अनेकदा महागड्या खताच्या एका पोत्यात मिश्र खताचे दोन पोती मिसळून शेतकरी वापरतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे खत त्यांच्या माथी मारले जाते.