माध्यमिक शिक्षकांचा शिक्षक दिनावर बहिष्कार
By admin | Published: August 27, 2015 03:19 AM2015-08-27T03:19:46+5:302015-08-27T03:19:46+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक
मुंबई : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक शिक्षकांचाही शिक्षकदिनी गौरव करा, अशी त्यांची मागणी आहे.
यासंदर्भात शिक्षक परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकदिनी जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र या पुरस्कारांत माध्यमिक शिक्षकांची निवड केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीत माध्यमिक शिक्षकांचाही वाटा असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे. परिणामी माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्कार देऊन योग्य मोबदला देण्याची मागणी परिषदेने केली आहे. गेल्या वर्षी जि.प.ने माध्यमिक शिक्षकांचा गौरव करण्यास नकार दिला होता. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमिक शिक्षकांना सन्मानित केले होते. यावेळी असा संघर्ष होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन परिषदेने केले आहे.
शिक्षकांमध्ये रोष
प्राथमिक शिक्षकांमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. मात्र या पुरस्कारांत माध्यमिक शिक्षकांची निवड केली जात नसल्यामुळे रोष व्यक्त होत आहे.