मन्मथच्या आत्महत्येमागील गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:45 AM2017-07-20T02:45:19+5:302017-07-20T02:45:19+5:30
आयएएस अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथच्या आत्महत्येमागील गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणी त्याच्या मित्रांचे, तसेच अन्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयएएस अधिकारी मनीषा आणि मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मन्मथच्या आत्महत्येमागील गूढ अद्याप कायम आहे. या प्रकरणी त्याच्या मित्रांचे, तसेच अन्य संबंधितांचे जबाब नोंदविण्यास मलबार हिल पोलिसांनी सुरुवात केली आहे.
मलबार हिल येथील दरिया महल या २० मजली इमारतीच्या गच्चीवरून पडून मन्मथचा मंगळवारी मृत्यू
झाला. याच इमारतीच्या २० व्या मजल्यावर त्याचा मित्र वशिष्ट अग्रवाल राहतो. दोघेही शाळेपासूनचे मित्र आहेत.
मंगळवारी सकाळी वशिष्टकडेच जातो, असे सांगून त्याने घर सोडले होते. सकाळी ६.५०च्या सुमारास इमारतीत प्रवेश केल्यानंतर, त्याने वशिष्टच्या घरी न जाता थेट गच्चीकडे जाणारा जिना गाठल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर, सव्वा सातच्या सुमारास तो इमारतीवरून खाली पडला.
घटनास्थळावरून मन्मथचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचे संशयास्पद मजकूर अथवा अन्य माहिती आढळून आलेले नाही. घटनास्थळावरील परिस्थितीमुळे प्राथमिक तपासात त्याने आत्महत्याच केल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली, तर दुसरीकडे तो अपघात असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्या दिशेनेही आमचा तपास सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.