दिल्लीत शिवसेनेच्या १० खासदारांची सिक्रेट बैठक? ज्यांच्या घरी झाली, ते कृपाल तुमाने आहेत कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 05:05 PM2022-07-09T17:05:19+5:302022-07-09T17:05:48+5:30
कृपाल तुमाने यांनी काही दिवसांपूर्वी बाकीचे खासदार कुठेही गेले तरी मी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते.
शिवसेनेचे बंडखोर गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असतानाच शिवसेनेच्या १० खासदारांची सिक्रेट बैठक झाल्याच्या चर्चांना उत आला आहे. यावर ज्यांच्या घरी ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे, ते खासदार कृपाल तुमाने यांनी खुलासा केला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदेंनी दिल्लीतून दिले 'हवे' ते उत्तर...
कृपाल तुमाने यांनी काही दिवसांपूर्वी बाकीचे खासदार कुठेही गेले तरी मी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हा शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. आता तुमाने यांच्याच घरी बैठक झाल्याची चर्चा रंगल्याने चर्चांना उधान आले होते.
यावर तुमाने यांनी स्पष्टीकरण देताना मी गेले सहा दिवस नागपूरमध्येच आहे. मग दिल्लीत बैठक कशी घेणार? असा सवाल केला. तसेच शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी सहा खासदार हे पंढरपूरला गेले आहेत. मुंबईतच तीन खासदार आहेत. तर इतरांना मी फोन करून विचारले तेव्हा ते त्यांच्या गावी असल्याचे म्हणाले. यामुळे आमची कोणतीही बैठक झाली नसल्याचे तुमाने यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या दोन खासदारांनी राष्ट्रपती पदाचे भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिले होते. यानंतर शिवसेना खासदार बंड करतील म्हणून ठाकरेंनी लोकसभेतील गटनेत्याचे पद काढून घेतले होते. यावर आता १० खासदारांची बैठक झाल्याचे बोलले जात होते.