एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?; प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 12:10 PM2023-01-12T12:10:25+5:302023-01-12T12:10:50+5:30
आम्ही युती ठरवली आहे परंतु जगजाहिर केली नाही. उद्धव ठाकरे जाहीर करण्याबाबत ठरवतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकरांनी खुलासा करत रात्री ही भेट झाल्याचं कबूल केले. पण त्याचसोबत प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो म्हणजे राजकीय चर्चा झाली असं नाही. इंदू मिलमधील स्मारकाबाबत बैठकीत चर्चा झाली. आमची आघाडी आजही ठाकरेंसोबत कायम आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो. मध्यंतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिमा नोएडात बनवली जातेय. त्यासाठी सरकारकडून एक टीम पाठवण्यात आली होती. त्या पथकानं विविध शिफारसी दिल्या. त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत चर्चा झाली. बऱ्याच गोष्टी चर्चेत झाल्या. आगामी निवडणुका शिवसेना ठाकरेंसोबत लढवायच्या यात कुठेही बदल झाला नाही. ज्या पक्षासोबत भाजपा त्यांच्यासोबत वंचित बहुजन जात नाही. भाजपासोबत वैचारिक लढाई आहे. भाजपाच्या मित्रपक्षासोबतही कधीच समझौता नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आम्हाला ज्यांच्यासोबत त्यांच्यासोबत चर्चा होते. जाहीर कधी करायचं हे ठाकरेंवर आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटी राजकीयच आहेत असं नाही. शिंदे गटाने भाजपाची साथ सोडली तर पुढचा विचार होऊ शकतो. ३५ वर्ष आम्ही राजकारणात आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आमचा खिमा झाला. माझी ताकद मला माहित्येय. आम्ही आजही ठाकरेसोबत जायला तयार आहोत. फायनल कधी करायचे हे त्यांच्यावर आहे असं सांगत युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे दिला आहे.
दरम्यान, आम्ही युती ठरवली आहे परंतु जगजाहिर केली नाही. उद्धव ठाकरे जाहीर करण्याबाबत ठरवतील. काँग्रेस-राष्ट्रवादीही सोबत असावी असा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे. काँग्रेसला आणि शरद पवारांना माझ्या एवढा फारसा ओळखणारा दुसरा नेता नसेल. त्यामुळे हे तुम्हाला फसवतील असं मी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं लोकांशी खरे बोलावे. जर खोटेच बोलत राहिले तर जे जे काही चाललंय ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला.
....तर ठाकरेंकडे पर्याय राहणार नाही
शिवसेना-वंचित यांची आघाडी होणार हे स्पष्ट आहे. जागावाटप समस्या राहिली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्यासोबत आले तर भाजपाशी लढायला सोप्पं जाईल असं ठाकरेंना वाटतं. परंतु ते सोबत येणार नाहीत असं मी सांगितले आहे. निवडणुका येईपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न करत राहतील. एकदा निवडणुका जाहीर झाल्या तर ठाकरेंकडे कुठला पर्याय राहणार नाही असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांना माझी मदत हवी
मी १५ दिवसांपासून उद्धव ठाकरेंना भेटलो नाही. माझा महिनाभराचा प्रवास पाहिला तर मी महाराष्ट्रात नाही. आमची टीम आणि सेनेची टीम आहे ते एकमेकांशी बोलतायेत. एकनाथ शिंदे हेसुद्धा जुने शिवसैनिक आहेत. त्यामुळे पँथर आणि शिवसेनेचे नाते इतरांपेक्षा त्यांना अधिक माहिती आहे. माझ्या मुख्यमंत्री कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेविषयी कुठलाही वाद नकोय. माझ्यावर कुठलाही आरोप घ्यायचा नाही असं शिंदेंनी मला राजगडावर आल्यावरच सांगितले होते. तुम्ही आमच्यासोबत येणार नाही हे माहिती आहे. परंतु या गोष्टीत मला तुमची मदत हवी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होते असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.