‘त्या’ गुप्त ठिकाणाचा शोध सुरू
By Admin | Published: July 11, 2014 11:45 PM2014-07-11T23:45:38+5:302014-07-11T23:45:38+5:30
सातारा न्यायालय आवारातून चोरलेली मोटारसायकल पुण्यामध्ये आणण्यात आलेल्या संभाव्य मार्गावरील सीसी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
तपास यंत्रणा सतर्क : बॉम्ब बनविणारी व्यक्ती शहरातच?
पुणो : सातारा न्यायालय आवारातून चोरलेली मोटारसायकल पुण्यामध्ये आणण्यात आलेल्या संभाव्य मार्गावरील सीसी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी मोटारसायकलीमध्ये फेरफार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. स्फोटाच्या आदल्या दिवशीच ही मोटारसायकल शहरामध्ये दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोटारसायकलीमध्ये हा बदल नेमका कोठे करण्यात आला, त्या ठिकाणाचाही शोध सुरू आहे.
सातारा रस्त्यावरील तसेच महामार्गावरील टोलनाक्यांचे आणि पेट्रोलपंपावरील सीसी टीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस अधिका:यांच्या मते, साता:यामधून ही मोटारसायकल पुण्यात आणल्यानंतर एखाद्या गुप्त ठिकाणी ठेवण्यात आली असावी. त्याच ठिकाणी तिच्यामध्ये काही बदल करण्यात आले.
या मोटारसायकलमधील मुळातच असलेल्या 12 व्होल्टच्या बॅटरीला आणखी 9 व्होल्टच्या दोन बॅट:यांची जोड देण्यात आली होती. वायरिंग करून डिकीमधील बॉम्बला त्याने कनेक्शन देण्यात आले होते. जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटांच्या वेळी पुण्यातीलच कासारवाडी येथील एक खोली भाडय़ाने घेऊन दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार केले होते. त्यामुळे याही वेळी दहशतवाद्यांनी पुण्यातील एखाद्या ठिकाणाचा आधार घेतला आहे काय, याची चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे. अशा पद्धतीच्या बॅट:या विकणारी काही मोजकीच दुकाने आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पोलिसांचे लक्ष आहे. जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटांच्या वेळी सायकलींचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे आता सायकल खरेदीची माहिती पोलिसांना देणो बंधनकारक करण्यात आलेले असल्यामुळे दहशतवाद्यांनी थेट चोरीच्या वाहनांचा त्यामध्ये वापर करण्याची शक्कल लढवल्याचे दिसते. स्फोटांसाठी वापरण्यात आलेला बॉम्ब हा निष्णात व्यक्तीने तयार केलेला असून, ती व्यक्ती शहरामध्येच असल्याचेही पोलिसांचे म्हणणो आहे. तिचाही युद्धपातळीवर शोध सुरू आहे.