रक्षणकर्ते पोलीसच सापडले असुरक्षिततेच्या गर्तेत

By admin | Published: May 29, 2017 06:01 AM2017-05-29T06:01:38+5:302017-05-29T06:01:38+5:30

पोलीस म्हटले की, प्रत्येकाला त्याचा धाक वाटतो. गुन्हेगारांना सरळ करण्यासाठी तो आपला खाक्या दाखवतो. बऱ्याच वेळा खाकी वर्दीतील माणुसकीचेही दर्शन घडते. कायदा

The security forces caught the insecurity | रक्षणकर्ते पोलीसच सापडले असुरक्षिततेच्या गर्तेत

रक्षणकर्ते पोलीसच सापडले असुरक्षिततेच्या गर्तेत

Next

- सदानंद नाईक, उल्हासनगर -

पोलीस म्हटले की, प्रत्येकाला त्याचा धाक वाटतो. गुन्हेगारांना सरळ करण्यासाठी तो आपला खाक्या दाखवतो. बऱ्याच वेळा खाकी वर्दीतील माणुसकीचेही दर्शन घडते. कायदा आणि सुव्यवस्थेची राखण करणारा पोलीस जेव्हा धोकादायक इमारतींमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो आणि ती विदारक परिस्थिती मांडूनही सरकारला याचे काहीच वाटत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. लोकप्रतिनिधींभोवती सुरक्षेचे कडे करणारा हा पोलीस किती असुरक्षित आहे, याची त्या नेत्यांनाच कल्पना नसावी, ही अत्यंत संतापजनक बाब उघड झाली उल्हासनगरात.

सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहावा, यासाठी पोलीस डोळ्यांत तेल घालून लक्ष देत असतो. तो ऊन, पाऊस, थंडी यांची कसलीही तमा न बाळगता आपले कर्तव्य पार पाडत असतो. तो स्वत:च्या घरगुती कार्यक्रमात कधीच सहभागी न होता बंदोबस्तामध्ये व्यस्त असतो. आपण सण साजरे करतो. मात्र, त्याच वेळी पोलीस आपल्या सुरक्षिततेसाठी जागता पाहरा देत असतो. ज्या वेळेस हा पोलीस थकूनभागून घरी जातो, तेव्हा तिथेही तो सुरक्षित नसतो. कारण, बहुतांश पोलिसांच्या वसाहती या धोकादायक झाल्या आहेत. चार घटका विश्रांती घ्यावी, असे ठरवले तरी ती घेता येत नाही. कारण, कधी छप्पर कोसळेल, याचा नेम नाही. केवळ पोलीसच नाही, तर त्याचे संपूर्ण कुटुंब जीव धोक्यात घालून प्रत्येक दिवस ढकलत असते. मृत्यूशी गाठ कधीही पडेल, याची धास्ती सतत या कुटुंबात असते. उल्हासनगरमधील पोलीस वसाहती पाहिल्या, तर याची प्रचीती येते.
उल्हासनगर पोलीस परिमंडळामध्ये एकूण आठ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी उल्हासनगर, विठ्ठलवाडी, हिललाइन व मध्यवर्ती अशी चार पोलीस ठाणी शहरात आहेत. तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बैठ्या चाळींच्या वसाहती बांधल्या आहेत, तर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इमारती चार मजल्यांच्या आहेत. यात २७९ कुटुंबे राहण्याची व्यवस्था आहे. या इमारतींची वेळीच दुरुस्ती व पुनर्बांधणी न झाल्याने त्या धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. आजही ३९ कुटुंबे जीव मुठीत घेऊन बैठ्या चाळींच्या वसाहतीत राहत आहेत. तसेच पोलीस वसाहतीच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमणे झाली असून सरकारसह महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही.
उल्हासनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांसाठी मराठी शाळेजवळ बैठ्या चाळींची वसाहत आहे. यामध्ये एकेकाळी ५८ कुटुंबे गुण्यागोविंदाने राहत होती. आज नाइलाजास्तव धोकादायक झालेल्या बैठ्या खोल्यांत १९ कुटुंबे अनेक समस्यांचा सामना करत राहत आहेत. तर, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशेजारीच बैठ्या चाळींच्या वसाहती असून तब्बल १७२ कुटुंबांची व्यवस्था आहे. यामध्ये दोन आणि चार मजली इमारतींचा समावेश आहे. या इमारती सात वर्षांपूर्वी रिकाम्या करून धोकादायक म्हणून जाहीर केल्या.
बैठ्या चाळींच्या बहुतांश खोल्या बंद ठेवल्या आहेत. अशा दुरवस्था झालेल्या बैठ्या खोल्यांत १४ कुटुंबे नाइलाजास्तव राहत आहेत. पूर्वी पोलिसांसह त्यांची मुले सामाजिक उपक्रम राबवायची. पोलीस लाइनचा गणपती प्रसिद्ध असून सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जायचे. मात्र, वसाहत धोकादायक म्हणून जाहीर केल्यावर येथील पोलिसांनी कुटुंबासह सुरक्षितस्थळी जाणे पसंत केले. त्यामुळे मोठ्या उत्साहाने होणाऱ्या विविध उपक्रमांना खीळ बसली आहे. पोलिसांची संख्या विचारात घेऊन तेथे अद्ययावत व्यायामशाळा बांधली. मात्र, तेथे कुणीही फिरकत नाही, हे वास्तव आहे.
अशीच परिस्थिती हिललाइन पोलीस ठाण्याच्या पोलीस वसाहतीची झाली आहे. येथील बैठ्या चाळींत ४९ खोल्या आहेत. त्या धोकादायक म्हणून जाहीर केल्यावर १९ कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. जे कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करतात, त्यांच्या डोक्यावरच सुरक्षित छप्पर नसल्याचे उघड झाले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशेजारील साडेचार एकरच्या भूखंडांवर वसाहतीसाठीचा प्रस्ताव सरकारदरबारी पाठवल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली.
सरकारच्या दुर्लक्षतेमुळे पोलिसांना हक्काच्या वसाहतीऐवजी भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. तीच परिस्थिती पोलीस अधिकाऱ्यांची झाली आहे. सरकारी क्वॉर्टर्स अथवा बंगले नसल्याने त्यांना कल्याण, ठाणे, डोंबिवली येथे भाड्याने राहावे लागत आहे. यापूर्वी पोलीस उपायुक्तांना राहण्यासाठी एमआयडीसीचा अंबरनाथ फॉरेस्ट नाक्याजवळील बंगला भाड्याने घेतला होता. मात्र, त्याची दुरवस्था झाल्याने तेथे कुणीही राहण्यास तयार नाही. तत्कालीन पोलीस उपायुक्त धांडे यांच्यासह अनेक पोलीस उपायुक्त यापूर्वी येथे राहिले आहेत.

भूमाफियांच्या घशात भूखंड जाण्याची भीती
शहरात अनेक ठिकाणी पोलीस वसाहतींसाठी राखीव भूखंड आहेत. त्यापैकी कॅम्प नं-३ येथील राधास्वामी सत्संग या शेजारील भूखंड व गोलमैदान येथील भूखंडावर अतिक्रमण झाले. तर, हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशनगर व स्वामी शांतिप्रकाश आश्रमाशेजारील भूखंड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. वेळीच भूखंडाला संरक्षण कुंपण न बांधल्यास भूमाफियांच्या घशात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उपायुक्त भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३, तर उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ असे एकूण ७ भूखंड आहेत. त्यांचा विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हरातील तीन पोलीस वसाहती आणि गृहसंकुलांसाठी सात भूखंड पोलिसांकडे आहेत. त्यापैकी दोन भूखंड भूमाफियांच्या घशात गेले असून पोलीस प्रशासन काहीही करू शकले नाही. कॅम्प नं.-५ येथील स्वामी शांतिप्रकाश आश्रमाशेजारील भूखंडावर जीन्स कारखाने व भूमाफियांनी अतिक्रमण सुरू केले आहे. त्या भूखंडाभोवती संरक्षण भिंत बांधून त्यावर नामफलक लावण्याची गरज आहे. तसाच प्रकार गणेशनगर येथील भूखंडाबाबत आहे. या भूखंडावर राज्य व केंद्र सरकारची मालकी असून ती मालकी पोलीस विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी विभागाने केली आहे.
कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची निवासस्थाने पोलीस ठाण्याजवळ हवी. त्यांना गरजेच्या वेळी त्वरित बोलवता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे, विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ व मध्यवर्तीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी दिली. शहरातील पोलीस वसाहती धोकादायक झाल्याने अनेक पोलिसांवर भाड्याने राहण्याची वेळ आली आहे. त्यांना वेळेवर घरे मिळत नसल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मूलभूत सुविधाही भाड्याच्या घरात मिळत नसल्याच्या प्रतिक्रिया पोलीस विशेषत: त्यांच्या पत्नींनी दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांची अवस्थाही तशीच
पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस उपायुक्तांसह सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, इतर अधिकारी यांना घरे उपलब्ध नाहीत. नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम घर भाड्याने मिळेल का, याची चिंता सतावते. आपण २४ तासच काय, त्याहून अधिक काळ घराबाहेर राहणार असल्याने कुटुंब सुरक्षित कसे राहील, यादृष्टीने अधिकाऱ्यांना परिसर पाहावा लागतो. घर मिळाले तरी मूलभूत सुविधा मिळतीलच, असे नाही. बहुतांश अधिकारी कल्याण, डोंबिवली, ठाणे व मुंबई येथे राहणेच पसंत करतात. पोलीस उपायुक्तांनी एमआयडीसीचा अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यावर बंगला भाड्याने घेतला होता. मात्र, त्याची वाताहत झाल्याने इच्छा असूनही शहरात त्यांना राहता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

मध्यवर्ती ठाणे आरोग्य विभागाच्या बराकीत

१शहरातील उल्हासनगर व मध्यवर्ती पोलीस ठाणे ६० ते ७० वर्षे जुन्या बॅरेकमध्ये थाटले आहे. मध्यवर्ती पोलीस ठाणे मध्यवर्ती रुग्णालयाच्या मालकीच्या जुन्या बॅरेकमध्ये असून त्यांना कधीही जागा रिकामी करण्याची नोटीस येऊ शकते. कॅम्प नं.-३ येथील राधास्वामी सत्संग व गोलमैदान परिसरात पोलीस ठाणे व वसाहतींसाठी आरक्षित भूखंड होता. त्यावर, धनदांडगे बिल्डर व भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. ते भूखंड ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही पावले म्हणा किंवा हालचाल केली नसल्याचे उघड झाले.

२मध्यवर्ती रुग्णालयाचा विस्तार झाला, तर भविष्यात मध्यवर्ती पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याची वेळ पोलीस प्रशासनावर येण्याची शक्यता आहे. तसेच उल्हासनगर पोलीस ठाण्याची बॅरेकची जर्जर इमारत नव्याने बांधण्याची गरज आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरुस्ती दरवर्षी बांधकाम विभागाकडून केली जाते. दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होऊनही पोलीस ठाण्याची गळती काही थांबत नाही. अशा दुरवस्था, कोंदट वातावरणात पोलिसांना काम करावे लागते. पोलीस ठाण्यातील वातावरणच कामासाठी पोषक नसल्याने त्यांच्या मानसिकतेत बदल होतो. त्यामुळे येथील कर्मचारी, अधिकारी खाष्ट वाटू लागतात. त्यामागे हेही कारण आहे. पोलीस ठाण्यासारखीच घरची परिस्थितीही फारशी वेगळी नसल्याने ते त्रासून गेले आहेत.

दुरुस्तीवरील कोट्यवधी गेले कुठे?
शहरातील पोलीस ठाणी व पोलीस वसाहतीची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होते. दुरुस्तीनंतर पोलीस ठाण्याला गळती लागली आहे. तर, पोलीस वसाहतीची दुरुस्ती कागदावर दाखवल्याचे उघड झाले आहे. दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी गिळंकृत करणाऱ्या कंत्राटदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व दलालांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याची विनंती धोकादायक व गळक्या घरांत राहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. पोलीस वसाहतीमधील काही चाळींचे पत्रे नवीन टाकले आहेत. मात्र, एका वर्षात ते उभे फाटल्याने पोलिसांवर दुसऱ्या चाळीत राहण्याची वेळ आली आहे.

हक्काचे घर मिळण्याची मागणी
शहरात धोकादायक पोलीस वसाहतीच्या जागांवर नव्याने पोलिसांसाठी गृहसंकुल उभारावे. मात्र, इतर आरक्षित भूखंडांवर पोलीस प्रशासनाने पोलिसांना मालकी हक्काचे कायमस्वरूपी घर देण्याची मागणी होत आहे. कॅम्प नं.-५ येथे स्वामी शांतिप्रकाश आश्रमाशेजारी ५ ते ७ एकराचा, तर गणेशनगर येथे ३ एकराचा भूखंड पडून आहे. त्या ठिकाणी पोलिसांना गृहसंकुल बांधण्याची मागणी होत आहे. हे सगळे मान्य असले, तरी त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे.

सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत
उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस वसाहतीमधील सार्वजनिक स्वच्छतागृहे धोकादायक झाली आहेत. त्यामुळे त्यांना रात्रीअपरात्री पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर रांगा लावण्याची वेळ आली आहे. स्वच्छतागृहाची दुरुस्ती स्वत:च्या पैशांतून करावी लागत आहे. वसाहतीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने पोलीस कुटुंबीय जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तर, हिललाइन पोलीस वसाहतीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. पण, नाइलाजास्तव नागरिक त्याचा वापर करत आहेत.

आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा
वसाहतीला आठवड्यातून फक्त दोन दिवस, तोही अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे महिला व लहान मुलांवर महापालिकेच्या सार्वजनिक नळांवरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. वसाहतीत इतकी पाणीटंचाई असतानाही पोलीस प्रशासनाने साधी बोअरवेलची सुविधा दिली नसल्याबद्दल येथील महिलांनी खंत व्यक्त केली. काही पोलिसांची कुटुंबे वडील, आजोबा पोलीस दलात असल्यापासून वसाहतीत राहत आहेत. मात्र, वर्षानुवर्षे काहीही बदल झालेला नाही, असे त्यांनी खेदाने सांगितले. साफसफाई, पाणीटंचाई, धोकादायक घरे अशा समस्यांचा पाढाच महिलांनी वाचला. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम जे पोलीस करतात, ते अशा घरांत राहत असतील, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.

दुरुस्तीसाठी हात पसरावे लागतात
हिललाइन, विठ्ठलवाडी व उल्हासनगर पोलीस वसाहतींमध्ये जिल्ह्यातून पोलीस कुटुंबे राहण्यासाठी येतात. त्यांना ठाणे जिल्हा कार्यालयातून घरांचे वाटप केले जाते. मात्र, दिलेले घरे चांगल्या स्थितीत आहेत का, हे बघितले जात नाही. पोलीस कुटुंब प्रत्यक्ष राहण्यासाठी आल्यावर दिलेले घर धोकादायक असल्याचे समजते. कुटुंबाचा जीव सुरक्षित राहावा, म्हणून मिळालेल्या घराऐवजी चांगल्या स्थितीतील भाड्याच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पोलीस विभाग लक्ष देत नसून दुरुस्तीसाठी सार्वजनिक विभागाकडे हात पसरावे लागत असल्याची खंत अनेक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घरात जुन्या रेकॉर्डचा ढीग
पोलीस वसाहतीमधील ८० टक्के घरे रिकामी असून त्यांना धोकादायक म्हणून जाहीर केले आहे. वर्षानुवर्षे घरे रिकामी असल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. तसेच काही बंद घरांत जुन्या रेकॉर्डच्या ढिगासह मोटारसायकलचा खच पडला आहे. तर, काही घरांमध्ये किमती सागाचे लाकूड पडून आहे. घराचे दरवाजे व खिडक्या तुटल्याने त्यातील जुने रेकॉर्ड, मोटारसायकली व सागाच्या लाकडाची चोरी होण्याची भीती वसाहतीमधील पोलीस व्यक्त करीत आहेत. मात्र, याचे सोयरसुतक पोलीस प्रशासनाला नाही.

Web Title: The security forces caught the insecurity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.