उपवन तलावाची सुरक्षा वाढणार
By admin | Published: August 4, 2015 01:20 AM2015-08-04T01:20:39+5:302015-08-04T01:51:23+5:30
उपवन तलावात रविवारी दोन तरु णांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता ठाणे महापालिका प्रशासन जागे झाले आहे. भविष्यात अशा घटना घडू नये
ठाणे : उपवन तलावात रविवारी दोन तरु णांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आता ठाणे महापालिका प्रशासन जागे झाले आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी उपवन तलावाला संरक्षक जाळी बसविण्यात यावी तसेच तलावातील पाण्याच्या खोल पातळीबाबत तलावासमोर सूचनाफलक लावून सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी सोमवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाला दिले. तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले जातील, असे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तर, दुसरीकडे या तलावाची निगा, देखभाल करणाऱ्या शिवाई ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचा करार रद्द करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
उपवन तलावात झालेल्या दुर्घटनेनंतर महापौर मोरे, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी यांनी पालिका आयुक्तांसमवेत तलावाची पाहणी केली. यावेळी सरनाईक व पालिकेचा अधिकारीवर्ग उपस्थित होता. येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलावाला संरक्षक जाळी बसविणे, लॅण्डस्केपिंग करणे तसेच तलावाच्या खोल पातळीबाबत सूचनाफलक लावून सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात यावी, अशा सूचना महापौरांनी केल्या. उपवन तलावासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी निधी मंजूर केला असून सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी सरनाईक यांनी केली.