सबनीस यांना दिलेली सुरक्षा केवळ दिखाव्यापुरतीच?
By admin | Published: January 9, 2016 01:30 AM2016-01-09T01:30:14+5:302016-01-09T01:30:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या वादळ
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या वादळ उठल्याने आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी आल्याने त्यांना पोलीस सुरक्षा पुरवली आहे. मात्र, ही सुरक्षा केवळ दिखाऊ ठरत असून, सबनीसांच्या घरी कोणी कधीही येऊ -जाऊ शकत असल्याचे चित्र आहे. दोन हवालदार त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले असले, तरी ते घरापासून दूर बसत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. सबनीसांना येत असलेल्या धमक्यांमुळे त्यांनी पोलीस आयुक्तांकडे सुरक्षा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर तत्काळ निर्णय घेत दि. ४ जानेवारीपासून त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यिात आली. त्यासाठी त्यांच्याबरोबर २४ तास एक हवालदार नेमण्यात आला. दि. ७ जानेवारीपासून आणखी एका हवालदाराची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. सबनीस सध्या बाहेर जात नसल्याने सुरक्षेसाठी असलेले पोलीस हवालादार त्यांच्या घराबाहेर बसत आहेत. सदाशिव पेठेतील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर त्यांचे घर आहे. घराबाहेर लगेचच जिना असल्यामुळे हे दोन्ही हवालदार त्यांच्या घराच्या दरवाज्यासमोरून जाणाऱ्या जिन्यावर वरच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांच्या इमारतीच्या खाली कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.
सबनीसांच्या घराजवळच लिफ्ट असल्याने कोणीही कधीही लिफ्टच्या माध्यमातून येऊन लगेचच त्यांच्या घरात घुसू शकत असल्याचे चित्र आहे. गोंधळामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी त्यांच्या घरी येत आहेत. ते थेट त्यांच्या घरात जात असून सुरक्षेसाठी असलेले तेथील हवालदार कोणाचीही चौकशी करीत नाही किंवा हटकत नसल्याचे चित्र आहे. यावरून सबनीसांना देण्यात आलेली सुरक्षा केवळ दिखावा असल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)