लोणावळ्यात लायन्स पॉइंटच्या दरीला रेलिंगचे सुरक्षा कठडे
By admin | Published: June 14, 2017 07:33 AM2017-06-14T07:33:19+5:302017-06-14T07:33:19+5:30
लोणावळा शहरातील पर्यटनाचे ठिकाण व आकर्षण बिंदू असलेल्या लायन्स पॉइंटला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरीच्या तोंडावर सर्वदूर लोखंडी रेलिंगचे सुरक्षा
Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 14 - लोणावळा शहरातील पर्यटनाचे ठिकाण व आकर्षण बिंदू असलेल्या लायन्स पॉइंटला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरीच्या तोंडावर सर्वदूर लोखंडी रेलिंगचे सुरक्षा कठडे लावण्यात आले असल्याची माहिती वन निरीक्षक वैभव बाबर यांनी दिली.
लायन्स पॉइंट, मोराडी शिखर, शिवलिंग पॉइंट ते टायगरस लिप हा सर्व परिसर म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन आहे. आयएनएस शिवाजी जवळील घाट चढून एअर फोर्समार्गे जसे आपण अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतो. तसे आपल्याला या परिसरातील निर्सगरम्य, डोंगर दर्यांमधून ऊन्हाळ्यात सुध्दा दिसणारी धुक्याची चादर, कोकण परिसराचे विहंगम दृष्य मनाला प्रसन्न करते. लायन्स पॉइंटचा हा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असून तो हातवण व कुरवंडे गावांच्या सीमेवर असल्याने त्याचा हवा तसा विकास झालेला नाही. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून देखील शहरापासून दूर असलेला हा भाग पर्यटन विकासापासून कायम वंचित राहिला होता. मागील काही वर्षापासून हे ठिकाण नाईट लाईफचे ठिकाण बनले होते. पुणे व मुंबईकर तरुण तरुणी व हाय प्रोफाईल मंडळींची रात्र जागविण्यासाठी या ठिकाणी वाढलेली वर्दळ व सोबत मद्य व अंमली पदार्थांचा वापर यामुळे लायन्स पॉइंट म्हणजे मद्यपींचा अड्डा अशी या ठिकाणाची ओळख होऊ लागली होती. लायन्स पॉइंटची नाईट लाईफ व येथे होणारी अंमली पदार्थांची होणारी विक्री हा विषय लोकमतने अनेक वेळा लावून धरला होता. पोलीस प्रशासनाने देखिल या ठिकाणी वारंवार रात्री अपरात्री धाडी ठाकत कारवाई केली, अनेकांवर गुन्हे दाखल झाले.
वन विभागाने सुद्धा गैरप्रकार रोखण्यासाठी लायन्स पॉइंट परिसराला दगडाची सुरक्षा भिंत बांधत लोखंडी गेट बसविले. तसेच सायंकाळी सातनंतर पॉइंट पर्यटकांसाठी बंद केला.
मात्र, स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता वन विभागाने काही दुकाने देखिल बनवून ती स्थानिकांना दिली आहेत. पॉइंट परिसराची देखभाल व दुरुस्ती कामाकरिता संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात पाँईटवर पर्यटकांच्या सुविधेकरिता फिरते शौचालय लावण्यात येणार आहे. भिमाशंकरच्या धर्तीवर पॉइंटवर लाकडी पँगोड उभारण्यात आला आहे. याठिकाणी बसून विश्रांतीसोबत निर्सगाचा आनंद देखिल पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता संपुर्ण पॉइंटला दरीच्या बाजूने लोखंडी रेलिंग करण्यात आलेले आहे. तसेच भविष्यात लायन्स पॉइंटवर नवनवीन सुविधा उपलब्ध करुन येथिल पर्यटन वाढीसाठी वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पर्यटकांनो हुल्लडबाजीला आवर घाला !
लायन्स पॉइंटच्या दरीला सर्वदूर लोखंडी रेलिंग लावून हा पॉइंट वन विभागाने संरक्षित केला आहे. मात्र तरी देखिल काही हुल्लडबाज पर्यटक रेलिंगच्या वरुन दरीच्या तोंडावर जाऊन सेल्फी काढताना दिसतात. तेव्हा पर्यटकांनो हुल्लडबाजीला आवर घाला असे म्हणावेच लागते. लायन्स पॉइंटच्या दरीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेकरिता रेलिंग करण्यात आले. पर्यटकांनी देखिल याचे भान ठेवत सुरक्षित पर्यटनांचा आनंद घ्यावा अशी माफक अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.