राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेत होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:28 PM2019-02-17T19:28:27+5:302019-02-17T19:29:50+5:30
दुरुस्ती व नुतनीकरणासाठी ९.४२ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर
- जमीर काझी
मुंबई : राज्यातील विविध कारागृहातील संरक्षक भिंती, बॅरेक आता सुरक्षिततेच्या दृष्टिने आणखी मजबूत होणार आहेत. खराब व नादुरुस्त कठड्याची दुरुस्ती व नुतनीकरण करण्यासाठी तब्बल ९.४२ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्याद्वारे विविध लहान-मोठ्या १७ तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने (पीडब्ल्यूडी) पाच महिन्यापूर्वी हा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला होता. त्याला मंजुरी देताना याबाबतचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या एका जनहित याचिकेत राज्यातील कारागृहातील दुरावस्थेबद्दल सरकारला फटकारले होते. त्यानंतर सरकारकडून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार विविध कामाची पूर्तता करण्यात येत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानंतर कारागृहातील परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी विशेष महानिरीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार एकुण २७ कारागृहात बांधकाम/ दुरुस्ती/नुतनीकरण करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यापैकी अत्यावश्यक असणाºया व मंजुरी मिळालेल्या १७ ठिकाणी तातडीने पीडब्ल्यूडीकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भायखळा कारागृहात रंगकाम गळती प्रतीबंधक उपाययोजना करण्यासाठी ३० लाख तर बॅरेक क्रमांक ३व ४ व त्या शेजारी नवीन बॅरेक बांधण्यासाठी ४० लाख खर्चात बांधण्यात येणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बॅरेक बांधणे व येरवड्यातील ३९ बॅरकेच्या दुरुस्तीसाठी सुमारे ९८ लाख खर्च अपेक्षित आहे. येरवड्यातील महिला कारागृहात १०० कैदी क्षमतेचे स्वतंत्र बॅरेक बांधले जाणार असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील विविध बॅरेक बांधण्यासाठी एकुण ४ कोटीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता.
महाराष्ट्रात एकुण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ,ब, क व ड या चार स्तरावर ४५ असे एकुण ५४ कारागृह आहेत. त्याची अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी असलीतरी प्रत्यक्षात ३१ हजार २१८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २१ हजार ८३३ पुरुष तर १३८५ महिला कैदी आहेत.
जेलमधील बंदी क्षमता- २३९४२
प्रत्यक्ष बंदीची संख्या- ३१२१८