जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या; उद्धव ठाकरेंना भाजपाचा खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:10 AM2023-07-27T10:10:13+5:302023-07-27T10:11:58+5:30
३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं असा आरोप भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला.
मुंबई - उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे नरेंद्र मोदींवर केलेली भाषणे तुम्हाला आठवतील अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी ५ दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण २०२४ साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे असा टोला त्यांनी लगावला.
तसेच ३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल असा इशाराही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 27, 2023
ठाकरेंचा भाजपावर घणाघात
मी माझ्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला आहे. तो म्हणजे होऊन जाऊ दे चर्चा...गावागावामध्ये वाड्या, वस्त्यांमध्ये, पाड्यावरती, पारावरती, चहाच्या टपरीवर, पानाच्या ठेल्यावर, सलूनमध्ये, एसटी स्टँड, रिक्षा स्टँड, बस डेपो कुठेही चारचौघे जमतात तिकडे एकमेकांशी चर्चा झाली पाहिजे. केंद्राच्या कोणत्या योजनेचा लाभ तुमच्या गावात किती लोकांना मिळाला. दरवेळी आश्वासनांचे एक मृगजळ दाखवले जाते आणि पाणी दाखवले जाते. ज्या गावात पाणी नाही त्या गावात तुम्हाला पाणी देऊ. लांब डांबरी रस्त्यांचे मृगजळ दाखवतात आणि तिथपर्यंत लोकांना अनवाणी चालवत नेतात असं सांगत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.