अडचणींकडे ‘चॅलेंज’म्हणून बघा

By admin | Published: August 11, 2014 12:57 AM2014-08-11T00:57:06+5:302014-08-11T00:57:06+5:30

श्यामच्या आईसारखे झालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. वर्धा येथे असताना गांधी, विनोबांच्या विचारांचा सहवास. मेडिकलच्या पदवीनंतर बैरागडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

See the challenges as 'Challenge' | अडचणींकडे ‘चॅलेंज’म्हणून बघा

अडचणींकडे ‘चॅलेंज’म्हणून बघा

Next

कोल्हे दाम्पत्याच्या भावना : बैरागडमधील आठवणींना प्रगट मुलाखतीतून उजाळा
नागपूर : श्यामच्या आईसारखे झालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. वर्धा येथे असताना गांधी, विनोबांच्या विचारांचा सहवास. मेडिकलच्या पदवीनंतर बैरागडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. असंख्य अडचणीतून मार्ग काढत कार्य सुरू ठेवले. परिस्थितीशी दोन हात करून अडचणींकडे ‘चॅलेंज’ म्हणून बघितले की यश नक्कीच तुमच्या पदरात पडते, अशा शब्दात मेळघाटच्या बैरागडमध्ये २९ वर्षांपासूून अविरत सेवा देणाऱ्या डॉ. स्मिता आणि रवींद्र कोल्हे यांनी आपल्या भावना मांडल्या.
प्रयास-सेवांकुर अमरावती, मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट आणि स्व. अच्युतराव महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘आम्ही बिघडलो! तुम्ही बी घडाना’ कार्यक्रमात डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांची मृणालिनी चितळे व अविनाश सावजी यांनी द ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात प्रगट मुलाखत घेतली.
डॉ. कोल्हे म्हणाले, मेळघाटातील बैरागड येथे काम करण्याचा निर्णय घेऊन ३ हजार ५०० रुपये घेऊन तेथे गेलो. मित्र, नातेवाईक, स्थानिकांनी मदत केली. तापी धरणामुळे तेथील पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला. धरणाबाबत प्रशासनाने आदिवासींना इंग्रजीत नोटीस पाठविली. त्याची कॅसेट तयार करून गावोगाव ऐकविली आणि शासनाशी लढा दिला. लढ्याला यश येऊन धरणाचा निर्णय रद्द झाला.
पत्नी डॉ. स्मितावर प्राणघातक हल्ला झाला. कुपोषणाच्या प्रश्नावर शासनाशी खडाजंगी केली. तेथील अंधश्रद्धा दूर करून मंत्रांनी नव्हे तर वैद्यकीय उपचारामुळे आजार दूर होतात हे ठासून सांगितले. मेळघाटात तरुणांची गरज आहे. तेथील लोक शिक्षित झाल्यास त्यांचे सर्व प्रश्न सुटतील.
डॉ. स्मिता कोल्हे यांनी आपल्या लग्नाबाबत मजेशीर माहिती देऊन उपस्थितांना हास्यसागरात बुडविले. त्या म्हणाल्या, रविंद्र कोल्हे यांनी लग्नासाठी अटी घातल्या. दररोज ४० किलोमीटर चालावे लागेल, दुसऱ्यासाठी भिक मागावी लागेल, ४०० रुपयात घर चालवावे लागेल, या त्या अटी होत्या.
त्यांच्या अटींना मान्य करून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा निर्णय घेतला आणि आजपर्यंत वाटचाल सुरू आहे. व्यासपीठावर उपस्थित डॉ. गिरीश गांधी, डॉ. विलास डांगरे, अविनाश सावजी, निखील मुंडले, नरेश सब्जीवाले, बाबासाहेब वरणगावकर, पंकज महाजन यांच्या हस्ते मृणालिनी चितळे लिखित ‘मेळघाटावरील मोहर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: See the challenges as 'Challenge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.