‘त्या’ चाळीस जणांसाठी वेगळी योजना आणता येते का बघा...

By अतुल कुलकर्णी | Published: February 26, 2023 07:24 AM2023-02-26T07:24:05+5:302023-02-26T08:17:20+5:30

आपल्या विधिमंडळाला चांगल्या-वाईट गोष्टींचा मोठा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, त्यावेळी सभागृहात तोडफोड झाली होती.

See if you can come up with a different plan for 'those' forty people of shinde faction | ‘त्या’ चाळीस जणांसाठी वेगळी योजना आणता येते का बघा...

‘त्या’ चाळीस जणांसाठी वेगळी योजना आणता येते का बघा...

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

नेते हो, 
नमस्कार.
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी शुभेच्छा. वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यांच्या पोतडीतून काय योजना निघतील हे कळेलच. ते त्यांचं काम चोखपणे करतील. आपणही आपलं काम चोखपणे केलं पाहिजे. नेहमीप्रमाणे याही अधिवेशनात एकमेकांविरुद्ध जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू द्या. महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे. खरे-खोटे माहिती नाही; पण कोणी एकमेकांविरुद्ध काही बोलले नाही तर त्याची बातमीच होत नाही. मात्र, आपण गोंधळ घातला, की नक्की बातम्या येतील, याची आम्हाला खात्री आहे. 

आपल्या विधिमंडळाला चांगल्या-वाईट गोष्टींचा मोठा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, त्यावेळी सभागृहात तोडफोड झाली होती. नवाब मलिक, बशीर पटेल, सोहेल लोखंडवाला हे तिघे समाजवादी पक्षाचे सदस्य होते. श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करावी म्हणून त्यांनी सभागृहात सरकारची प्रेतयात्रा काढली होती. नागपूरच्या अधिवेशनात अण्णा डांगे, बबनराव ढाकणे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर सभागृहात गदारोळ झाल्याने ४३ आमदार एकाच झटक्यात निलंबित केले होते. नव्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देताना सभागृहात अध्यक्षांसमोरील माईक हिसकावून घेऊन अंगावर धावून जाण्याची परंपरा आपल्यालाच आहे. कधीकाळी जांबूवंतराव धोटे यांनी पेपरवेट भिरकावून दिल्याची घटना विधिमंडळाच्या इतिहासात घडली आहे. सभागृहात बसून सत्ताधारी सदस्यांना जेरीस आणायचे असते. प्रश्न विचारून भंडावून सोडायचे असते. असं विधिमंडळाच्या पुस्तकात लिहिलं असेल. काही जाणकारही तसंच सांगतील. मात्र, विधिमंडळाच्या बाहेर पायऱ्यांवर... मधल्या पोर्चमध्ये... समांतर अधिवेशन भरवल्याचे आपण पाहिले आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी तर सभागृह बंद पडल्यानंतर बंद सभागृहात अधिवेशन भरवले. रात्री उशिरा त्यांना बाहेर काढताना सत्ताधारी सदस्यांना नाकीनऊ आले. तो इतिहास एकदा वाचून घ्या.

या विधिमंडळात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले, असे दाखले तुम्हाला काही जण देतीलही. वि. स. पागे यांनी रोजगार हमीचे धोरण याच सभागृहात पहिल्यांदा मांडले जे पुढे देशाने स्वीकारले. महिलांना निवडणुकीत आरक्षण दिले पाहिजे हा निर्णय रात्री दोन वाजेपर्यंत सभागृहाने चर्चा करून मंजूर केला होता. डान्सबार बंदीचा निर्णय याच सभागृहाने घेतला. ज्यामुळे देशोधडीला लागणाऱ्या हजारो तरुणांना वाचवले. सहकारी संस्थांचा ऐतिहासिक कायदा देशात पहिल्यांदा याच विधिमंडळात झाला होता. अशा निर्णयांची यादी तुम्हाला अनेक जण देतील; पण त्याकडे लक्ष देऊ नका. कारण आज कोणालाही असे काही निर्णय झाले होते, हे आठवत नाही. त्यांना फक्त सभागृहात झालेला गोंधळ, गदारोळ, हाणामारीच आठवते. त्यामुळे आपण त्याकडेच लक्ष द्या. ते जास्त महत्त्वाचं आहे. ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’, ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. आता ‘मारावे आणि फोटोरूपी उरावे’ अशी नवी म्हण रूढ होत आहे. त्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. 

या आधीच्या अधिवेशनात आपण गाजराच्या माळा घालून आलो होतो... म्याऊ म्याऊ असे आवाज काढले होते... खोके... बोके... गद्दार... असे शब्द संसदीय कारभारात रूढ केले होते. आता त्यापुढे जाऊन आपल्याला आणखी काही जहाल शब्द समाजात रुजवावे लागतील. त्यासाठी मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात आपल्यालाच भर घालावी लागेल. शिव्यांची लाखोली हा शब्द आता कामाचा नाही. त्यामुळे थेट भिडणारे आणि आरपार जाणारे शब्द शोधून काढा. काही जुन्या शब्दांना नव्याने धार लावा. शेवटी आपल्याला चर्चेत राहायचे आहे, हे विसरू नका. चर्चेत राहण्यासाठी गोंधळ, गदारोळ याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी केलं पाहिजे. विधान भवन परिसरात चित्रविचित्र पोशाखात येण्यापेक्षा काय वेगळं करता येतं ते पाहा. वाटल्यास रणवीरसिंहसोबत बोलून घ्या. मध्यंतरी तो खूप गाजला होता. तो काही टिप्स देऊ शकेल. 
जाता जाता : आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढी टीका करता येईल तेवढी करा. कसलीही सहानुभूती निर्माण होणार नाही. काळजी करू नका. शेवटी त्यांच्यावर टीका केली तरच आपलं अस्तित्व दिसेल. त्यामुळे चला, कामाला लागा. हे अधिवेशन गोंधळ, गदारोळ, शब्दांचे टोकदार बाण यासाठी कायम लक्षात राहिले पाहिजे. शक्य झाल्यास चाळीस आमदारांसाठी वेगळी व्हीव्हीआयपी व्यवस्था करा. कारण ते आहेत म्हणून सरकार आहे. त्यांना जिवापाड जपा... त्यांच्यासाठी एखादी योजना आणा... जास्तीत जास्त निधी त्यांना द्या... त्यांचे लाड, कोडकौतुक करा... कारण ते खूश तर बाकी सगळे खूश... हे विसरू नका. तुम्हाला अधिवेशनासाठी खूप खूप शुभेच्छा..!
    - तुमचाच, बाबूराव

Web Title: See if you can come up with a different plan for 'those' forty people of shinde faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.