‘लोकमत आॅनलाइन’वर पहा पुरुषोत्तमचा कल्ला
By Admin | Published: July 25, 2016 01:59 AM2016-07-25T01:59:30+5:302016-07-25T01:59:30+5:30
पुण्यासह महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची धामधूम महाविद्यालयांमध्ये सुरू झाली आहे.
पुणे : पुण्यासह महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची धामधूम महाविद्यालयांमध्ये सुरू झाली आहे. त्याच्या तालमीही सुरू झाल्या आहेत. ‘सांस्कृतिक आणि कलाक्षेत्राच्या वर्तुळातील सृजनशील अभिव्यक्ती आणि कलागुणांना अढळ जागा मिळवून देणारं हक्काचं व्यासपीठ’ असा या स्पर्धेचा नावलौकिक आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने असंख्य कलाकारांना मोठे केले़ कलाक्षेत्रातील पहिले पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेची धामधूम सोमवारपासून ‘लोकमत आॅनलाईन’च्या माध्यमातून सर्वांना पाहता येणार आहे़
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला महाविद्यालयीन जगतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्र कलोपासक संस्थेनं लावलेल्या स्पर्धेच्या या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असून, पुण्याबाहेरही स्पर्धेची बीजं रोवली आहेत. प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर अशा विविधतेने बहरलेल्या रंगभूमीवर पाऊल टाकण्याचं बाळकडू कलाकारांना मिळतं, ते याच स्पर्धेतून. याच ‘पुरूषोत्तम’नं रंगभूमीला प्रतिभावान कलाकारांची एक उत्तुंग अशी यशस्वी मालिका दिली. त्यामध्ये प्रकर्षानं नाव घेता येतील, अशी मंडळी म्हणजे डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, योगेश सोमण, संजय पवार, प्रवीण तरडे, सुबोध भावे, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे. यासारखी अनेक नावं आहेत.
महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूर-देसाई आणि सदस्य अमृता पटवर्धन यांनी लोकमत कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत या स्पर्धेचा घेतलेला आढावा आपण पाहू शकता़ त्याचबरोबर बृहनमहाराष्ट्र फर्ग्युसन महाविद्यालय, कावेरी महाविद्यालय, स़ प़ महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय अशा महाविद्यालयामध्ये यंदा पुरुषोत्तमसाठी कशी तयारी सुरु आहे़ काही महाविद्यालयांच्या संघांची संहिता ठरली असून, अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून कलाकारांची निवड करण्यात आली आहे़, अशा सर्व बित्तमबातमी आपल्याला लोकमत आॅनलाईनवर पहायला मिळणार आहे़