बियाण्यांचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!

By admin | Published: June 10, 2016 02:08 AM2016-06-10T02:08:06+5:302016-06-10T02:08:06+5:30

शेतक-यांवर पुन्हा आर्थिक संकट; मृग नक्षत्रातील पाऊस मात्र दिलासादायक!

Seed rate increased by 45 percent! | बियाण्यांचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!

बियाण्यांचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला
वळवाच्या पावसानंतर मृग नक्षत्रातील मॉन्सूनपूर्व पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांनी याहीवर्षी सोयाबीन, कापूस पेरणीवर भर दिला आहे. पण, खासगी आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) दर ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढल्याने दुष्काळात आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांसमोर संकट उभे ठाकले आहे.
मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिताला सामोरे जावे लागले. उत्पादन आणि उत्पन्नही घटल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना सवलती देण्यात येतात, बियाण्यांवर अनुदान दिले जाते; ते तर मिळालेच नाही, उलट महाबीज बियाण्यांचे दर ५ ते ३५ टक्के वाढल्याने शेतकर्‍यांवर संकटच कोसळले आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मागील वर्षी ६२ रुपये किलो होते, ते यावर्षी ६८ रुपये किलो झाले आहे. तूर, मूग, उडिदाचे बियाणे ३५ टक्क्यांनी वाढले आहे. खासगी बाजारात तर हे दर अव्वाच्या सव्वा झाले असून, ३५ ते ४५ टक्के अतिरिक्त दराने शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करावे लागत आहे.
बाजारात आजमितीस कडधान्य, तेलवर्गीय धान्य तसेच डाळवर्गीय धान्याचे भाव वाढलेले आहेत. त्याचाच अप्रत्यक्ष परिणाम बियाणे दरावर होत असल्याची सबब महाबीजतर्फे मांडण्यात येत आहे. प्रत्यक्षात महाबीजचे दर निश्‍चित झाल्याशिवाय खासगी कंपन्या त्यांचे दर निश्‍चित करीत नाहीत. महाबीजचे दर घोषित झाल्यानंतर खासगी बाजारातील दर वाढले आहेत. राज्यात २0 लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज आहे. महाबीजने केवळ चार ते साडेचार क्विंटल बियाण्यांची तजवीज केलेली आहे. उर्वरित १६ लाख क्विंटल बियाणे शेतकर्‍यांना बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहेत. महाबीजने तूर, मूग, उडीद बियाण्यांच्या दरात ३५ टक्क्याच्यावर वाढ केली आहे. खासगी बाजारात हे दर ४५ टक्क्यांपर्यंंत वाढले आहेत. या परिस्थितीत दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांनी दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रोत्साहन राशी!
शेतकर्‍यांच्या शेतावर महाबीजतर्फे बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. त्यामुळे बीजोत्पादक शेतकर्‍यांकडून बियाणे खरेदी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संबंधित धान्याचे दर विचारात घेऊन, त्यावर शेतकर्‍यांना किमान २0 ते २५ टक्क्यापर्यंत प्रोत्साहन राशी देण्यात येत असल्याचे महाबीजकडन स्पष्ट करण्यात येत आहे.

Web Title: Seed rate increased by 45 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.