दृश्यम चित्रपट पाहून सावकाराचा केला खून
By admin | Published: January 7, 2017 12:57 AM2017-01-07T00:57:37+5:302017-01-07T00:57:37+5:30
पैशावर जास्त व्याज मागून पैशासाठी तगादा लावत असल्याच्या कारणावरून सावकाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली
पिंपरी : पैशावर जास्त व्याज मागून पैशासाठी तगादा लावत असल्याच्या कारणावरून सावकाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तीन महिने मृतदेह एका गोदामामध्ये पुरून ठेवला होता. यातील आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली असून ‘दृश्यम’ चित्रपट पाहून हा गुन्हा केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
श्रीराम शिवाजी वाळेकर (वय २७, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मेहबूब समिदउल्ला मणियार (वय २६) याला अटक करण्यात आली असून, त्याचे वडील समिदुल्ला अकबरअली मणियार (वय ५४) यांना ताब्यात घेतले आहे.
सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके म्हणाले, श्रीराम वाळेकर बेपत्ता असल्याबाबतची तक्रार २७ सप्टेंबरला त्यांचे वडील शिवाजी पाळेकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार तपास सुरु होता. दरम्यान, श्रीराम वाळेकर हे व्याजाने पैसे देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. व्याजाने पैसे घेणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून सखोल तपास केला असता समिदुल्ला मणियार यांनी श्रीराम वाळेकर यांच्याकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेत. या पैशावरून श्रीराम यांचे मेहबुब आणि समिदुल्ला यांच्यासोबत वाद होत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस नाईक किरण खेडकर यांनी श्रीराम वाळेकर आणि संशयितांचे फोन क्रमांकाबाबतची तांत्रिक माहिती घेतली असता, त्यांचे एकमेकांशी बोलणे होऊन ते कुदळवाडी, मोशी भागात एकत्रित आल्याचे निष्पन्न झाले. मणियारबाबत संशय बळावल्याने तपास करीत असताना मेहबुब मणियार याने, वडील आणि श्रीराम यांच्यात वादविवाद होत असल्याचे पोलिसांना सांगितले.
दरम्यान, श्रीराम हे पैशावर जास्त व्याज मागून पैशासाठी तगादा लावत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कारणावरुन श्रीराम यांच्याबद्दल मनात राग धरून मेहबूब व
समिदुल्ला यांनी कुदळवाडी येथील गोदामामध्ये श्रीराम यांना बोलावून घेतले. त्यानंतर श्रीराम यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या जागेत मृतदेह पुरण्यात आला. मोठा खड्डा खोदून प्लॅस्टिक बॅगमध्ये मृतदेह गुंडाळून खड्ड्यात ठेवण्यात आला. त्यानंतर त्यावर माती, कचरा टाकून मृतदेह पुरण्यात आल्याची माहितीही आरोपींनी दिली. (प्रतिनिधी)
अशी सुचली कल्पना
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरण्याची कल्पना ‘दृष्यम्’ चित्रपटातून सुचल्याची कबुली आरोपींनी दिली. हा गुन्हा करण्याअगोदर
५ वेळा चित्रपट पाहिल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
>तीन महिन्यांपूर्वीच प्लॅन
या गुन्ह्याचा कट गेल्या तीन महिन्यांपासून शिजत होता. यासाठी आरोपींनी तीन महिन्यांपूर्वीच चार गुंठ्यांची जागा भाड्याने घेतली होती. या जागेतच खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला.