पत्नी तक्रार देत असल्याचे पाहून पतीने घेतले पेटवून
By admin | Published: March 4, 2017 09:35 PM2017-03-04T21:35:17+5:302017-03-04T21:35:17+5:30
पत्नी खोटी तक्रार देत असल्याचा समज करून संतप्त झालेल्या पतीने पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेतले.
Next
ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 4 - पत्नी खोटी तक्रार देत असल्याचा समज करून संतप्त झालेल्या पतीने पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेतले. एवढ्यावरच न थांबता त्याने पेटत्या अंगाने पोलिस चौकीत जाऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आणि पत्नीने पाणी आणून आग विझविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अजय प्रियास्वामी गौडर (वय २७, सध्या रा. कर्मवीरनगर, अमर लक्ष्मीबस स्टॉप, औद्योगिक वसाहत, सातारा मूळ रा. बेळगाव) असे पेटवून घेतलेल्या पतीचे नाव आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, यामध्ये तो ४६ टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे. गौडर हा भाजी विक्रेता आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नी उमासोबत त्याचा वारंवार वाद होत होता.
शनिवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास पत्नीसोबत वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात पत्नी औद्योगिक वसाहतीमधील पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेली. तिच्यापाठोपाठ अजयही पळत गेला. पोलिस चौकीच्या बाहेर उभा राहून पत्नी काय तक्रार देत आहे, हे कान देऊन तो ऐकत होता. सुमारे पंधरा मिनिटे झाल्यानंतर त्याने पत्नी पोलिसांना काय सांगत आहे. ते सर्व ऐकले. अचानक तो पोलिस चौकीच्या आवारात लावलेल्या दुचाकीकडे पळत गेला. अगोदरच त्याने पेट्रोलची बाटली आणली होती. ती बाटली घेऊन त्याने काहीक्षणातच स्वत:च्या अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले.
त्यानंतर त्याने पळत थेट पोलिस चौकीतच प्रवेश केला. अजयच्या संपूर्ण शरीराने पेट घेतल्याचे दृष्य पोलिसांना दिसल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. टेबलाजवळ पोलिसांकडे पिण्याच्या तीन चार बाटल्या होत्या. या बाटल्या घेऊन पोलिस आणि त्याच्या पत्नीने आग विझविली. केवळ वीस ते पंचवीस सेकंदात हा प्रकार घडला. जखमी अजयला तत्काळ पोलिसांनी रिक्षामधून सिव्हिलमध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील हे स्वत: त्याचा जबाब नोंदवत होते.