काम पाहूनच उमेदवारी
By admin | Published: July 18, 2014 02:41 AM2014-07-18T02:41:29+5:302014-07-18T02:41:29+5:30
भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी (परफॉर्मन्स) पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
औरंगाबाद : भाजपाच्या विद्यमान आमदारांची कामगिरी (परफॉर्मन्स) पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. पक्षाला ‘अच्छे दिन’ येताच इच्छुकांची उमेदवारी मागण्यासाठी भरती आल्यामुळे ती स्पर्धा रोखण्यासाठी पक्षाने (केआरए) ‘की रिझल्ट एरिया’चे निकष लावून परफॉर्मन्स तपासणीचा निर्णय घेतला आहे, असे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपाच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी औरंगाबाद येथे पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आ.फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. महायुती अभेद्य राहणार आहे. महायुतीमध्ये आता कोणताही नवीन पक्ष येणार नाही. १५ ते २० आॅगस्टदरम्यान भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर होईल, असे आ. फडणवीस म्हणाले.
धर्माच्या नावावर आरक्षण नको
मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणावर भाजपाने का आक्षेप घेतला आहे, यावर आ.फडणवीस म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर ते आरक्षण दिले आहे. धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही. आरक्षणाला विरोध नसून शासनाने जी प्रक्रिया राबविली, त्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला विनंती
महायुतीच्या बाबतीत किंवा एकमेकांच्या पक्षाबाबत उलटसुलट वक्तव्ये करू नयेत. आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांनाही तसेच सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे बोलतील तेच अधिकृत मानले जाईल, असे आ.फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारचे निर्णय बदलू
निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घाई घाईने जे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे ते सर्व निर्णय महायुतीचे सरकार येताच बदलून टाकू. विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी सरकार हे निर्णय घेत असल्याचा आरोप आ.फडणवीस यांनी केला. (प्रतिनिधी)