सातबारे तपासा, किती शेतकरी मंत्री आहेत हे कळेल!
By Admin | Published: June 8, 2017 06:28 AM2017-06-08T06:28:35+5:302017-06-08T06:28:35+5:30
भाजपाच्या मंत्रिमंडळात शेतकरी किती आहेत, असे निरर्थक सवाल करणाऱ्यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे सातबारे तपासून पहावेत
अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाच्या मंत्रिमंडळात शेतकरी किती आहेत, असे निरर्थक सवाल करणाऱ्यांनी भाजपाच्या मंत्र्यांचे सातबारे तपासून पहावेत, म्हणजे त्यांना खरे काय ते कळेल, असा जोरदार हल्ला कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी चढवला. भाजपा सरकारचे मंत्री शेतकरी आहेत का? असा प्रश्न शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केला होता. त्याला फुंडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
सरकार शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे व त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहे हे पाहून विरोधकांनी यात राजकारण आणणे सुरू केले आहे. वस्तुत: त्यांना शेतकऱ्यांना काही मिळूच द्यायचे नाही, असा टोलाही फुंडकर यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसला लगावला. दोन्ही काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना पुढे करून राजकारण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
खा. राजू शेट्टींचे वर्चस्व कमी करण्यासाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुढे करत मुख्यमंत्र्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. खोत यांना शेतकरी संघटनेतून काढून टाकण्यासाठी खा. शेट्टी यांच्यावर दबाव आणणे सुरू केल्याचे संघटनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेलाही या निर्णयापासून दूर ठेवले. आता संपाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, असे शेतकऱ्यांनी जाहीर केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने देऊ केलेल्या कथित पाठिंब्याची हवाच निघून गेली आहे.
>भाज्यांची आवक सुरळीत
गेल्या काही दिवसांपासून घटलेली भाज्यांची आवक सुरळीत होत आहे. पुणे, नवी मुंबईसह नाशिकच्या बाजार समितीमध्ये बुधवारी भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने भाज्यांचे भावही कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून अनेक भाज्यांनी शंभरी गाठली होती. मात्र आता तेच दर झपाट्याने कमी होत आहेत.
शेतकरी संपाबद्दल अभिनेता मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी बुधवारी या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरावे लागू नये. तशी वेळ त्यांच्यावर येणे हे दुर्दैवाचे आहे, असे यावेळी नाना पाटेकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जेवढे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तेवढा हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता नाना यांनी व्यक्त केली.
मकरंद अनासपुरे म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यायला हवे, त्यांनी शेतकऱ्यांचा फुटबॉल करू नये, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, अशी मागणी करतानाच, आम्हाला पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार नको पण शेतकऱ्यांसाठी जे करता येईल ते करा, असे भावनिक आवाहनही मकरंदने केले.