सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर; मनसेचा 'त्या' चित्रपट निर्मात्याला 'खळ-खट्याक'चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 02:18 PM2023-08-13T14:18:58+5:302023-08-13T14:20:33+5:30
सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या निर्मात्याला मनसे नेते अमेय खोपकर यांनी जाहीर इशारा दिला आहे.
Seema Haider-Sachin Meena Story: प्रियकरासाठी पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने भारतात खूप प्रसिद्धी मिळवली. अलीकडेच सीमा हैदरला एका चित्रपट निर्मात्याने त्याच्या चित्रपटात अभिनयाची ऑफर दिली होती. पण, आता हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या निर्मात्याला थेट इशारा दिला आहे.
मेरठचे रहिवासी असलेले चित्रपट निर्माते अमित जानी यांनी सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेवर 'कराची टू नोएडा' या नावाने चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी सीमाला चित्रपटाची ऑफरही दिली आहे. या घोषणेनंतर अमित जानी यांना धमक्या आणि इशारे मिळत आहेत. मनसेचे सरचिटणीस आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर (Amey Khopkar) यांनी ट्विटरद्वारे इशारा दिला आहे.
पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 12, 2023
काय म्हणाले अमेय खोपकर?
"पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे, अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!" असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.
सीमा हैदरला चित्रपटाची ऑफर
अलीकडेच जानी फायरफॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी यांनी सीमा हैदरला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. ते सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवणार आहेत, ज्याचे नाव 'कराची टू नोएडा' असेल. यासोबतच उदयपूर येथील शिंपी कन्हैयालाल हत्याकांडावर बनत असलेल्या चित्रपटासाठी अमितने सीमाला रॉ एजंटची भूमिका ऑफर केली आहे. यासोबतच त्यांनी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूवरही एक चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे, ज्याचे नाव आहे 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है'.