तीन साखर कारखान्यांवर जप्ती
By Admin | Published: January 29, 2017 01:07 AM2017-01-29T01:07:40+5:302017-01-29T01:07:40+5:30
सांगोल्याचा सांगोला सहकारी, अकलूजचा शंकर सहकारी व अक्कलकोटचा स्वामी समर्थ या तीन सहकारी साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने
सोलापूर: सांगोल्याचा सांगोला सहकारी, अकलूजचा शंकर सहकारी व अक्कलकोटचा स्वामी समर्थ या तीन सहकारी साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे़ या कारखान्यांचा रितसर ताबा देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारीही केल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीमध्ये असलेल्या सर्वच सहकारी संस्थांची मालमत्ता विक्री करून, वसुली करण्याचा निर्धार त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़
हे तिन्ही साखर कारखाने राज्य बँकेचे थकबाकीदार आहेत. सांगोला कारखान्याकडे राज्य बँकेचे ३६ कोटी, शंकरकडे ३९ कोटी व स्वामी समर्थकडे सुमारे ८ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल होत नसल्याने, बँकेने मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. बाळे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला कागद कारखान्याकडे १७ कोटी इतकी थकबाकी असून, जागेवर काहीच शिल्लक ठेवले नाही. शिवाय रिकाम्या जागेवर अतिक्रमणही केले आहे. रिकाम्या जागेची विक्री करून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय शारदा सहकारी सूतगिरणीकडे १९ कोटी, नान्नज येथील शरद सहकारी सूतगिरणीकडे १० कोटी, वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याकडे ३२ कोटी ६१ लाख इतकी थकबाकी आहे़ या वसुलीसाठी जप्तीची कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
राज्य बँकेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
या तीनही कारखान्यांच्या जप्तीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाने दाद दिली नाही. यामुळे जप्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर कार्यवाही करावी व मालमत्ता ताब्यात द्यावी, यासाठी राज्य बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेतली नाही, तर न्यायालयात दाद मागणार आहोत, असे राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.