दोन देशी कट्टय़ांसह जिवंत काडतूस जप्त
By admin | Published: February 25, 2017 02:13 AM2017-02-25T02:13:52+5:302017-02-25T02:13:52+5:30
आरोपीस अटक; बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील घटना
सोनाळा (बुलडाणा),दि.२४- मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोनाळा पोलिसांनी येथील मेघा हॉटेलमध्ये छापा टाकला असता, एका व्यक्तीजवळून दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतूस जप्त करून आरोपी दिलीप मेथल्या मुझालदा यास अटक केली. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी ११ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
या बाबत माहिती अशी, की सोनाळा बस स्टॉपसमोरील हॉटेल मेघा येथे एक व्यक्ती चहा, नास्ता करण्यासाठी आला. त्याच्याजवळ दोन देशी बनावटीचे कट्टे व दोन काडतूस आसल्याची माहिती पोहेकॉ. श्याम कपले यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार सचिनसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बडगुजर, सहा.पोलीस उपनिरीक्षक गजानन सावंत, पोहेकॉ गजानन जोशी श्याम कपले, पोकॉ गजानन तायडे, निशीकांत कळसकार, भाऊसाहेब मोरे यांनी हॉटेल मेघा येथे धाव घेऊन मोठय़ा शिताफीने आरोपी दिलीप मैथल्या मुझालदा (वय २१) याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कमरपट्ट्यामध्ये दोन देशी कट्टे व पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी आरोपी दिलीप मैथल्या मुझालदा यास अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोकॉ. शाम कपले याच्या फिर्यादिवरून सोनाळा पोलीस स्टेशनला कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक यशवंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. आरोपी दिलीप मुझालदा हा संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील रहिवासी असून, त्याच्या जवळून जप्त करण्यात आलेल्या देशी कट्टय़ाची किंमत ४0 हजार रुपये असून, जिवंत काडतुसाची किंमत दोन हजार रूपये आहे.