बाळासाहेबांची निवडक भाषणे - मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला छाटून टाकू,तोडून टाकू, चिरून टाकू…!?
By admin | Published: June 18, 2016 05:16 PM2016-06-18T17:16:07+5:302016-06-18T17:16:48+5:30
शिवसेना आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे यानिमित्ताने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काही निवडक भाषणे
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 19 - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…
हल्ली मी कुठे बाहेर जात नाही. कारण बाहेर जाऊन काही उपयोग नाही. आज सकाळची वर्तमानपत्रं मी उघडली आणि अनेक पत्रांतून मला सूचना देण्यात आल्या मी कशावर बोलणार आहे, काय आहे आणि काय नाही. कुतूहल निर्माण केलं गेलं, तुम्हीच केलं, मी नाही केलं. त्यापेक्षा तुम्हाला काही सूचना कराव्या लागतात की, बाळासाहेब त्या विषयावर बोलायचं आाणि त्याप्रमाणे एक मसुदा तयार करा. म्हणजे निवांतपणे मला बोलता येईल. कोणाचं काही राहिलं नाही ना, कोणाचं काही सोडलं नाही ना या चिंतेत मला नका ठेवू! आमच्या थोबाडातून जे बाहेर पडेल ते. आणि तुम्हाला जे आवडेल ते. विषय भरपूर आहेत हो, किती… किती… किती… मला सगळ्यात आश्चर्य वाटतं की एक सामान्य माणूस ज्याचा अणू महाग झालेला आहे. तो अणुकराराबद्दल बोलतो. अणुकरार येतोय आपलं कसं होणार? अरे काय कसं होणार? तुला समजलं तरी आहे का अणु करार काय आहे ते? कशात काही पत्ता नाही! तो विषय आपला नसतो. आयुष्यात त्याचा काही आपल्याला उपयोग नाही नंतर झालाच तर. ऊर्जा ऊर्जा ऊर्जा… आता निवडणुका आल्यात तोंडावर हळूहळू राजकीय निवेदनं येतायत बाहेर. त्यात पवारसाहेब बोलले आमचे भुजबळांचे दोस्त! लवकरच आम्ही शेतकऱ्यांना वीज माफ करू. लवकर म्हणजे किती लवकर. सुशीलकुमार शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असंच सांगितलं. की आम्ही शेतकऱ्यांना वीज माफ करणार, झाली नाही आणि काही नाही आणि काही नाही. काळोख तिथेच, शेतकरी तिथेच आणि आम्ही इथेच. निवडणुका झाल्या. इलेक्ट्रिसिटीचा पत्ता नाही! मग आमच्या पत्रकार बंधूंनी विचारलं की, म्हणे तुम्ही असं बोललात की वीज आम्ही माफ करू त्याचं काय झालं? (मिश्कीलपणे हसत हसत) तसं म्हणे निवडणुकीच्या तोंडावर बोलावं लागतं! च्यायला हे एकदा तोंडावर बोलतात आणि दुसरं कशावर बोलतात हे मला माहीत नाही. का तुम्ही लोकांना फसवता. देता येत नसेल तर नाही म्हणून सांगा आणि मोकळं व्हा ना. आता पवारसाहेबांची पाळी, त्यांनी सांगितलं आम्ही वीज माफ करणार, कठीण आहे. ते चिंदबरम कुठे परदेशात गेले होते. परदेशाचे दौरे तुम्ही बोलू नका अजिबात बोलू नका. पुंजकेच्या पुंजके चाललेत आता अणु कराराच्या विषयावरती एक शिष्टमंडळ जाणार होतं. एका तरी मंत्र्याला ट.. फ कळतं का त्या अणु कराराबद्दल. मग रद्द झालं. कारण तिकडं फिस्कटलं दिल्लीत काहीतरी. हा तर ते आमचे चिदंबरम म्हणाले, शेतमालाला मिळणारे हे जे भाव आहेत ते हास्यास्पद आहे. शेतमालाला मिळणारे भाव हास्यास्पद? कोण म्हणतं चिदंबरम. आणि बसलेत केंद्रात अर्थमंत्री? अनर्थ मंत्री! अहो तुम्ही सत्तेवरती बसला आहात. सत्ताधारी आहात. तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही. की भाव कमी मिळताहेत हे हास्यास्पद आहे लोकं तुम्हाला हसताहेत. हे सगळे ‘भिकारचोट’ बसले आहेत सत्तेवरती आमच्या नशिबाने! लाज कशी वाटत नाही यांना सांगायला बेशरमपणाने. आणखीन बरंच काही बरळलाय तो पण महत्त्वाचं हे वाक्य लक्षात घ्या. ‘शेतमालाला जो भाव मिळतोय तो हास्यास्पद आहे.’ वा रे वा… शेतकरी मंत्री आमचा महाराष्ट्राचा बरं ते नांगरताहेत नांगरताहेत नांगरताहेत आणि मागे वळून बघताहेत तर काहीच नांगरलेलं नाहीये. याचा अर्थ त्या नांगराला नुसतीच चाकं लावलेली आहेत. फाळ-बिळ काही नाही. तो नुसता आपला गाडी गाडी करतोय. हे कृषीमंत्री तब्येतीने खणखणीत झालेत. सगळ्यांच्या सुधारल्यात. काय झालेत रे बाबा बाबा… अरे सहा महिने मला द्या एखादं मंत्रीपद, ते म्हणतात ना लहान मुलं म्हणतात म्हातारी म्हणते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक आणि चल रे भोपळ्या टुणूक टुणूक… मी माझ्या मुलीकडे जाईन तुप-रोटी खाईन जाडजूड होईन. कारण तिच्या अंगावर मांसच नसतं फक्त हाडं…सगळे बेवकूफ खूष तसं हे सगळं चाललेलं आहे. मला एक जुनी आठवण येते हे अणु करारावरचं भांडण, मनमोहन सिंगचं सरकार आणि डाव्यांची त्यांच्याबरोबर पार्टनरशिप ही पार्टनरशिप आज आहे उद्या नाही, चालू आहे. मनमोहन राहतात पहिल्या मजल्यावर आणि डावे जे पक्ष आहेत ते तळमजल्याला. आणि मग भांडण लागलं की, बाहेर येतात आणि गॅलरीतून मनमोहन सिंग बाहेर येतो आणि तो सांगतो जास्त शानपणा करू नका. आम्ही सरकार मोडून टाकू किंवा पुन्हा निवडणुका घेऊ! खाली डावा त्यांना सांगतो जा ये भडव्या, तू कोणाला शिकवतो. मोडायचं तर बेशक मोड आम्ही फेरनिवडणुकीला तयार आहोत! मग ते मनमोहन सिंग आहेत ते खाली उतरतात, बघूयाच ह्याच्यात काय ताकद आहे ते. मग तो भाडेकरू म्हणतो की नाही नाही साहेब मी एवढ्यासाठी भांडतोय की, आपण एकाच चाळीत राहतोय हे भांडण बिंडण कशाला करायचं… द्या असा हात मैत्रीचा आणि मग दोस्ती होते त्यांची. मग लोकांनी समजायचं तरी काय? मोडणार, तुटणार, वाकणार, फुटणार की काय. आता परत सुरू झालंय. बरं.. ते असतं ना कबुतरांचं गुटर्गु गुटर्गु गुटर्गु तसं चालतं. पण यातला नर कुठला आणि मादी कुठली माहीत नाही. एकूण कारभार इतका नासलाय. संपूर्ण सत्यानाश झालेला आहे देशाचा. या हिंदुस्थानात कोण सुखी आहे एकाने जरी हात वर करून सांगावं. पत्रकारांनीसुद्धा सांगावं की, साहेब इथला तो भाग आहे ना तो खूप छान आहे तो तुम्ही जाऊन बघा. बारामतीची शेती सुधारली. सुधारू दे. बारामतीची काळजी तुम्ही घ्यावी. आम्हाला महाराष्ट्राची काळजी आहे. महाराष्ट्राची जनता काय म्हणतेय तिला काय हवंय ती सुखी आहे का? पण तुम्ही चिडत नाही हो… एवढे फटके खावून खावून! निवडणुका आल्या काँग्रेस एके काँग्रेस गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना-भाजपाचं सरकार गेल्यानंतर पाच वर्ष त्यांनाच मिळाली. पाच वर्ष काही कारभार केला नाही आणि काही केला नाही. लावण्या बघताहेत, त्यातून एखादी पसंत आली की शिट्टी मारली, तो आबा डबा शोधतोय. अरे लावण्या कसले बघताय. भात शेती, पाऊस आहे नाही आहे, गहू सडून सडून खलास होतोय त्याच्यासाठी काही सोय केली. कुठे कालव्याची चर खणली? कुठे कसली सोय केली काही नाही. एकेक नमुने आहेत ते. सध्या मी भुजबळांबद्दल काही बोलणार नाही. अचानक प्रेमात आलाय माणूस. बरं.. एखादा माणूस आपल्यावर प्रेम करत असेल तर त्याला दुखवा कशाला. पण यांना आता अक्कला सुचल्या. त्या वेळी सरकार पडलं ९२ साली. १८ आमदार फोडले पण एवढे निवडून येणारे आमदार तरी बघा कसे कसे डांबीस आहेत. अरे गधड्यांनो, तुम्हाला निवडणुकीचे तिकीट शिवसेनेनं दिलं. शिवसेनेच्या नावामुळे त्या टिळ्यामुळे तुम्ही निवडून आलात. काय काय बनवलं तुम्हाला! कोणती पदं दिली, जरा विचार करा? हा नाऱ्या मी त्याला संत नारोबा म्हणतो संत नारोबा! देव माणूस अगदी देव माणूस बरं… मी काय दिलं नाही हो नारोबाला. हा कुठूनचा काय करत होता आणि आज काय झाला. त्याला कोणी केलं हे! एकदा घरी बसला होता मातोश्रीत त्याला मी विचारलं काय रे नारायण तू कधी काळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होशील असं तुला वाटलं तरी होतं का? म्हटलं तुझं आयुष्य शिवसेनेने बदललं की नाही. तर म्हणतो, हो. जर शिवसेना नसती तर माझा ‘एन्काऊंटर’ झाला असता ‘एन्काऊंटर’. हे संत नारोबाचे उद्गार आहेत. संत नारोबा माझ्या घरी आला सांगायला म्हणजे बघा काय थराची माणसं होती ही. काय धंदे होते त्यांचे! ‘एन्काऊंटर’ कोणाचा करतात हे पोलिसांना सांगायला नको. पण त्यांचंही बूच मारलंय. त्या आबाला काही कळतच नाही. तो इशारेच देतोय इशारे, ते केलं तर हे सहन केलं जाणार नाही. आणि हे केलं तर ते सहन केलं जाणार नाही. फक्त इशारे पुढे काहीच नाही.
बारबाला! अरे का रे बाबा नाचतात… काय तरी त्या कमावताहेत पोटाची त्या खळगी भरताहेत. हा पण त्या कोणी बांगलादेशच्या बाया असतील तर मात्र त्यांना हाकलून लावा. त्यांना दूर केलंच पाहिजे. बांगलादेशचे मुसलमान या देशात कधीच राहता कामा नये. त्यांना कधीच हाकलून दिलं पाहिजे होतं. आणि आमच्या इकडचे जे मुसलमान आहेत, असतील शिवसेनेत देखील थोडेफार आहेत. राष्ट्रवादी कोण? राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारची पार्टी नव्हे आणि देशद्रोही कोण कोणी ठरवायचं? फार विचित्र चाललाय सगळा कारभार. संशयाने बघायचं एकमेकांकडे? कशाला संशय पाहिजे? आता काय काय सुधारणा होताहेत. एकोपा होतोय हळूहळू, बरं… पोलिसांची अशी पंचायत करून ठेवलीय की कारवाई केली तरी निलंबन आणि नाही केली तरी निलंबित. अरे मग काय हातात काय नुसता दांडा धरत बसायचं पहाऱ्याचा ..(हशा) पहाऱ्याचा बोललो मी. काय उपयोग आहे त्या दांड्याचा. मारहाण करता येत नाही. काही करता येत नाही. नुसतं आपलं दांडकं अडकलंय. हा कारभार नव्हे. एक स्कॉड होतं आपल्याकडे पूर्वी ‘एन्काऊंटर स्कॉड’. बापरे काय सुंदर चांगली माणसं होती हो. वाट लावली वाट.. ते कोण तुमचे भिकारचोट तुमचे सुनामी रॉय सुनामी नाही अनामी…! पण मी त्यांना सुनामी म्हणतो! आणखी एक ती बाई येते ती दोघांनी मिळून गुर्टगू करून हे सगळं एन्काऊंटर स्कॉड मोडून टाकलं तोडून टाकलं. आज किती खून, किती बलात्कार हे काय चालू आहे. हे कोणी तोडून टाकायचं मोडून टाकायचं. आबांना मी सांगतो. की बारबालाचं एक स्कॉड काढा ना आणि तुम्ही त्यांचे प्रमुख व्हा. आणि त्या बाईने एन्काऊंटर करणारे जे गुंड आहेत त्यांना डोळा मागे करून आबांच्या पुढे उभे करून की हेच ते एन्काऊटर करण्याच्या लायकीचे आहेत. मारा गोळी साल्यांना बारबालांचा तसाही वापर करीत नाही. म्हणजे स्वत:ही वापर करत नाही. आणि दुसऱ्यांनाही वापर करू देत नाही. विक्षिप्तपणे वागताहेत सगळे.
गुलछबू. केसांचा कोंबडा सांभाळायचा बरं. (विलासरावांना उद्देशून) कधीतरी विलासरावांनी गंभीरपणे विचार केलाय का? मी सरकार जे आता चालवलं ते चालवत असताना प्रगती महाराष्ट्राची काय झाली? किती झाली? इतर मंत्री काय करताहेत का? त्यांच्या खात्यामध्ये कामं कशी चाललीत? काही नाही. नारोबा एक दिवशी उठायचा आणि अगदी पत्रकारांना बोलवून भाव खायचा आणि गप्प बसायचा. हे सगळं पत्रकारांना ठाऊक आहे. पण नारोबा काय चढवताहेत ते काय चढवताहेत. पैसा व्यवहार दणदणीत आहे. एकदम दणदणीत विचारू नका. दिल्लीमध्येसुद्धा त्याने खूप चारलं. त्या दोन मेणाच्या बाहुल्या ती अल्वा.. आणि दुसरा हलवा. आणि दुसरी ती प्रभा राव. काय एकंदर यांची माहिती काय? पण ती तिथे बाई बसलेली आहे. नाती त्यांची जोडलेली असतात. अल्वा ख्रिश्चन बाई ख्रिश्चन! म्हणून जमलं. असे एकास एक ख्रिश्चन किती भरलेत तिने! आता नवा कोण तो फर्नांडिस आलाय. ऑस्कर फर्नांडिस. ते आता काम करताहेत. लोकंसुद्धा आमची काय आहेत. तो गाडीतनं उतरला, मजूर काम करतो तिथे उतरला. मजूर एकदम खूश झाला. अरे दिल्लीतला बाप्या आणि आम्हाला नमस्कार करतो किती नम्र आहे, गुण चांगले आहे. मग उपयोग करून घ्या ना त्यांचा. तुम्हाला ऑस्कर अॅवॉर्ड मिळेल! पण ख्रिश्चन अनेक ठिकाणी भरलेत. ती प्रियांका त्या पोरीचं लग्नसुद्धा ख्रिश्चनाशी केलं. त्याचं नाव विसरलो मी, वडा पान ना.. नाही नाही वडेरा.. तुम्ही धंदा सुरू केलात गल्लीगल्लीच्या तोंडावर वडेरा पाव वडेरा पाव जोरात चालेल पैसे कमवाल! ख्रिश्चन पोरांशी लग्न केलं. या आम्हा हिंदूंना लाज कशी वाटत नाही. दीड हजार वर्ष कमी नाही. दीड हजार वर्ष मोगलांनी राजवट केली या हिंदुस्थानावर. दीड हजार वर्ष म्हणजे काही कल्पना येणार नाही, कारण नुसते आपण गांडुळासारखे मोगलाईच्या चिखलात वळवळत होतो. मोगल गेले ब्रिटिश आले. त्यांनी दीडशे वर्ष या हिंदुस्थानावर राज्य केलं. म्हणजे आम्हाला स्वत:चा असा राज्यकर्ता पचतच नाही. नेहमी इंम्पोर्टेड लागतो इम्पोर्टेड आणि आता ही बाई आली आहे, भले तुमची काही नाती असतील त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. कारण तुमचं आणि राजीव गांधींचं हे व्यक्तिगत लफडं होतं. देश काय करणार त्याला, देश काय करणार? त्यांच्याशी कशाला नातं लावताय तुम्ही. देशाशी कशाला नातं लावताय? पण ती गांधींची रांग लागली, गांधींची रांग काय लावताय? कुठे महात्मा गांधी आणि ही कुठे गांधी. तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल इंदिरा गांधी … फिरोज गांधी हे खासदार होते. आणि ते वावरायचे ते फिरोज गांधी म्हणूनच वावरायचे. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींचं जमलं. हे जमल्यावर इंदिरा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर विषय काढला. म्हणाली लग्न करायचंय. ते म्हणाले, उगीच काय या भरीस पडू नकोस. मला काही आवडत नाही आणि तुला काही त्याच्याशी लग्न करता येणार नाही. पोरगी फार लाडली होती. त्यांची प्रियदर्शनी.. काही केल्या इंदिरा गांधी ऐके ना मग म्हणाले एक कर, तुला लग्न करायचं असेल तर पहिलं आडनाव बदल! त्याचं आडनाव होतं फिरोज दारूवाला! हे पंडित जवाहरलाल नेहरूंना आडनाव काही आवडायचं नाही. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचं बारसं केलं तिथून पुन्हा गांधी सुरू झाला. ही गांधी कथा आहे. आणि आमचे लोकही तसंच लवकरच पागल होणारे. या पागलपणामुळे सुद्धा आपली महाराष्ट्रावरची पकड हळूहळू कमी होत चालली आहे. ती आम्ही होऊ देणार नाही आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. (टाळ्या) बिलकुल तोडू देणार नाही. जे तोडण्याचा प्रकार करतील, तर हा मराठा त्यांचे हात तोडल्याशिवाय राहणार नाही. तोडून टाकू, छाटून टाकून. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मी जवळून पाहिली, मी व्यंगचित्र काढत होतो. माझ्या एका व्यंगचित्रावरून मोरारजी देसाई इतका तापला, वैतागला कोण आहे हा माणूस, त्याला अटक करा. आणि अटक वॉरंट काढलं, भूमिगत झालो. भूमिगत म्हणजे काय इकडे आम्ही राहत होतो आणि तिकडे आमची बहीण राहत होती तिथे जात होतो. भूमिगत.. पूर्वी काय भूमिगत व्हायची लोकं जंगलातनं फिरायची. खाण्या-पिण्याचा काही प्रश्न नाही. तर ते व्यंगचित्र असं होतं की, १०५ हुतात्मे मारले या मोरारजी देसाईनं आणि त्या ज्या कवट्या आहेत त्या ढिगावर हा बसलाय नरमांसभक्षक. ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर भयंकर तापला माणूस. मग ऑर्डर निघाली यांना अटक करा. पोलीस तरी काय हो त्यांना दिसतंय हेच ते हेच पाहिजे. आणि त्याचंही कुठेतरी प्रेम असतं ना. जसं आता माझं आहे भुजबळशी, नारोबाशी. तसं प्रेम असतं! आणि अशा तऱ्हेने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मी पाहिलेली आहे. ते सत्याग्रह मी पाहिलेले आहेत. असे अनेक त्या संयुक्त महाराष्ट्राचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत. पण काय उपयोग आता. रक्त सांडून शेवटी मिळाली ती मुंबई, मुंबईसाठी रक्त सांडलं गेलं. गिरणी कामगार उद्ध्वस्त होऊन बसला. उद्ध्वस्त करून घेतलं त्याने स्वत:ला ते दत्ता सामंतमुळे. त्याच्या नादी लागले. सांगितलं मी, असा संप करू नका. कारण हा संप तुम्हाला परवडणार नाही. मालक म्हणतील तुम्ही कोण आम्ही तुम्हाला ओळखत नाही. आमचे करार-मदार झालेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाबरोबर त्यांच्याबरोबरच आम्ही बोलणी करू. मग कुठे आहात तुम्ही. सत्यानाश करून घेतलात स्वत:चा. आंदोलन करायचं शिवसैनिकांनी झगडायचं. आता आमच्या महिला झगडताहेत. चांगलं काम चालू आहे महिलांचं. रणरागिणी आहेत. पण पुरुषही चांगलं काम करताहेत. पुरुष चांगलं काम करताहेत हे म्हटल्यावर एकाही पुरुषांनी टाळी वाजवली नाही आणि महिला उसळल्या आहेत. किती फरक पडलाय महिला आणि पुरुषांमध्ये. पण जे एक उसळणं असतं उसळणं.. ही अपेक्षा आहे. एक शेतकरी सुशिक्षित, ग्रॅज्युएट, ‘इंग्रजांचे राज्य बरे होते’ असं लिहून आत्महत्या केली. भूममधला आहे तो ग्रॅज्युएट होता. खूप प्रयत्न केले. बाहेर पडण्याचे. पण काही जमलं नाही. हे राहिलं ते राहिलं आणि त्याने स्वत:ला फासाला लटकवून घेतलं. तो म्हणतोय काय की, इंग्रजांचे राज्य बरे होते. हे एक माणूस स्वत:ला गळफास लावून म्हणतोय. हे शाप आहेत सरकारला काँग्रेसच्या.. शाप.. पण आता आम्ही इतका कंठशोष केला आता मात्र मी थकत चाललोय… पण शारीरिकरीत्या मी थकत असलो तरी विचार मात्र माझा थकत नाही. (टाळ्या) आणि तो कधीच नाही थकणार, कधीच नाही, कधीच थकणार नाही. जोपर्यंत तुमचं टॉनिक मला मिळतंय तोपर्यंत. तुमचं टॉनिक… केवळ तुमच्या टॉनिकच्या जोरावर मी उभा आहे आणि इथे येण्याचं धाडस तुमच्याच टॉनिकच्या जोरावर मी केलंय. जो उठतोय त्याला मंत्रीपद पाहिजे. अरे संत नारोबाला काय कमी दिलं काय. नगरसेवक होते, आमदार झाले. अगदी मुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेता होता. विरोधी पक्षनेता म्हणजे काय ते यांना विचारा. (मनोहर जोशींकडे बोट दाखवत) मुख्यमंत्री नसतो, पण मुख्यमंत्र्यांइतका मान असतो आणि फौजफाटा सगळं काही सगळं काही. मोटारी, फौजफाटा, कूक काही कमी नसतं. म्हणजे डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं तरी चालेल. आता बसलाय मिळेल मिळेल मिळेल करत. लांडग्याला द्राक्ष आंबट म्हणतात. म्हणजे मी कोल्हाच्याऐवजी आता लांडगा घेतलाय. या लांडग्याला … उड्या मारतोय मारतोय.. मुख्यमंत्रीपदाची द्राक्ष लांबत बसली आहेत. आणि मग एकेक फुसकुल्या स्वत:च सोडायच्या स्वत:च सोडतो तो. पत्रकारांना माहीत आहे पण ते बोलायचे नाहीत. त्यांची तोंडं का दाबली गेली आहेत ते मला माहीत नाही. तर या अशा पद्धतीने सर्व काही चाललं आहे. शिवसेना सोडली! सोडली म्हणजे त्याने नाही सोडली. मी ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढलंय त्याला. (टाळ्या) आजपासून मी त्याची मी हकालपट्टी करीत आहे इथे या रंगशारदेमध्ये. आता एका शेवटच्या प्रकरणावर मी बोलतो आणि मग मी निघतो. त्या अमेरिकेबद्दल यांना काय प्रेम आहे, साटंलोट आहे हे मला कळत नाही. अमेरिका आपल्याला गुलाम बनवू इच्छितो. पण पाठिंबा दिला होता. पण एकंदर चाळे पाहिल्यानंतर यांच्या हाती हे टिकायचं नाही. आणि अमेरिका हातात घेईल. आता आपला देश तसा स्वतंत्र आहे का? २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला आपण तिरंगा फडकवला म्हणजे आपलं काम झालं. आपण कृत कृत्य झालो. इकडे पाकिस्तानने या देशाची फाळणी घडवून आणलीच आहे. त्यानंतर काश्मीर गिळलेला आहे. तिथे आसाम, मिझोराम येथे नक्षलवाद्यांनी आणि ख्रिश्चनांनी खास करून जोर मारलाय. तुम्ही गेलात कधी त्या बाजूला तर सगळे ख्रिश्चन दिसतील. नेपाळ तर गेलंच आहे आपलं, हिंदू राष्ट्र तिथं नक्सलाइट्सने डोकं वर काढलं आहे. माओवादी धुमाकूळ घालताहेत. माओवाद्यांचा तर समावेश झालेला आहे मंत्रिमंडळात, नेपाळच्या आणि ती स्वाभिमानी माणसं आहेत. त्यांनी राजीनामे दिले मंत्रिपदाचे. ही सगळी माणसं, आज श्रीलंका गेलेली आहे. तमिळ वाघ जरी असले तरी तिथेसुद्धा नक्सलिस्ट आहेत. अशी सगळी माणसं सभोवार पसरली आहेत. हिंदुस्थानच्या.. कुठे आम्ही स्वतंत्र.. एकाला तरी हटवायचा प्रयत्न केलाय काय, आर्मीचा काही उपयोग केलाय का. काही कारवाई करायला जायचं आर्मीने की यांचं… बंद. आर्मीने सांगितलं की, तुम्ही थांबवू नका. आमची कारवाई सुरू झालीये हे काश्मीर आम्ही घेतलंय ‘ऑक्युपॉइड’ म्हणतात ज्याला. जिंकलंय आठवड्याच्या आत आम्ही हा भाग सोडवून देतो. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणे नाही इथेच थांबा. आणि तिथे थांबल्यामुळेच घोळ झाला. सीज फायर.. पाकिस्तान ऑक्युपॉइड टेरीटरी! काहीच नाही. म्हणून नुसतं खाजवायचं म्हणून रामसेतू काढला. आणि रामसेतू कशाकरिता काढताय तुम्ही, कोणाला पाहिजे रामसेतू. काही नाही जहाजं जायला रस्ता पाहिजे. अमेरिकेची जहाजं. कसली जहाजं काय म्हणून नेणार. आणि आपल्यावरती उलटून त्यांनी हल्ला केला तर कळतंय का या लोकांना आपण काय करतोय ते. देशहिताच्या मुळावर हे किती येऊ शकतं. याचा अंदाज कोणाला घेता येत नाही? ही भयंकर परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडतोय. कोणी सांगितलं त्या चिदंबरमला की, तुम्ही चेन्नईवरून ती जहाजं का नाही घेत. नाही म्हणजे दॅटस् डिफरन्ट मॅटर.. स्वत:ची लुंगी टाइट ठेवायची आणि दुसऱ्याची सोडायची! काय धंदे चाललेत. आणि या चिदंबरमने देशाची वाट लावली आहे कर.. कर.. कर आणि कर. म्हणजे ही कर लागली आहे. या देशाला प्रत्येक गोष्टीवरती कर. त्या वेळेला जी माणसं रिटायर्ड व्हायची पेन्शन घ्यायची. त्या पेन्शनीवरती सुद्धा आता टॅक्स! इन्कम टॅक्सवर कर. अरे पगारातून कापून घेतलंत ना. अशा प्रकारे निरनिराळ्या गोष्टी तपासतो. टॅक्स कुठे लावता येईल. कर कुठे लावता येईल. अशा प्रकारे या चिदंबरमने हे कर तुमच्या मागे लावलेले आहेत. बघा काय करायचं आहे ते. परत कपाळावर हात मारून घ्यायचा असेल तर पुन्हा काँग्रेसला निवडून द्या. आणि अभिमानाने आणि स्वाभिमानाने जर करणार असाल तर काँग्रेसचा पराभव येत्या निवडणुकीत तुम्हाला करावाच लागेल. मला सांगा जयजयकार करून की, आम्ही महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार येऊ देणार नाही. शपथ.. येणार नाही शपथ… आणि जगदंबा तुम्हाला सुबुद्धी देवो आणि महाराष्ट्रातून काँग्रेसचं कायमचं उच्चाटन होवो आणि शिवसेनेची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येवो अशी जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
(सौजन्य - http://shivsena.org/m/)