बाळासाहेबांची निवडक भाषणे - मी एकटा या देशामध्ये क्रांती घडवून दाखवू शकतो
By admin | Published: June 18, 2016 05:25 PM2016-06-18T17:25:22+5:302016-06-19T06:04:13+5:30
शिवसेना आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे यानिमित्ताने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काही निवडक भाषणे
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 19 - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…
वेळ झालेला आहे पण नाईलाज आहे. पण तो रणशिंग फुंकणाऱ्याची सुद्धा शेवटी हवा जाईपर्यंत थांबलं पाहिजे ना… कारण मध्ये त्याला सोडता येत नाही. चिक्कार अपेक्षा असतील आता तुमच्या माझ्याकडून… की आता असं होईल, तसं होईल, घणाघाती घाव घालतील, दोन-तीन तुकडे होतील, एक दिलके तुकडे हजार हुए, कोई यहां गिरा कोई वाहा गिरा असं काही नाही आहे. कारण ते उचलायचे कोणी? कृष्ण बोलले (नितीश भारद्वाज यांना उद्देशून)… कल्पना चांगली आहे. सगळ्या जातीतल्यांना आपण जवळ घेतलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. पण आपणच का जवळ केलं पाहिजे त्यांना! आपल्याला जवळ करता कामा नये का…? आम्हाला कोणी बोलवतच नाही. आज दसरा आहे रावण पेटला होता… नाही, म्हणजे जळाला. जाळण्यासारखं खूप आहे या देशामध्ये आणि दसऱ्यालाच सोनं लुटलं पाहिजे असं काही नाही. आमच्या देशात लुटालूटच चालू आहे. त्यासाठी दसरा कशाला पाहिजे! कृष्ण बोलला असं आहे, तसं आहे. पण सुदर्शन कुठे आहे? सुदर्शन नागपुरात, कृष्ण इकडे! हे जमणार कसं आणि करंगळी घेऊन लोकांपुढे कसं जायचं… लोकं काय म्हणतील. त्याच वेळेला करंगळी पाहिजे की ज्यात सुदर्शन असलं पाहिजे आणि त्याच वेळेला ते फेकलं गेलं पाहिजे. जेणेकरून शत्रूचं डोकं उडेल…(टाळ्या) मला अजूनही राष्ट्रीय मुसलमान लफडं काय ते माहीत नाही आहे. आणि राष्ट्रीय मुसलमान असू शकतो तर राष्ट्रीय ख्रिश्चन का नाही…? राष्ट्रीय ख्रिश्चन आहे, राष्ट्रीय हिंदू, राष्ट्रीय अमुक आहे… कसला राष्ट्रीय हो… हिंदू हिंदू, मुसलमान मुसलमान, ख्रिश्चन ख्रिश्चन. हे दळभद्री रोग आहेत. ते जातीवर करू नका, त्यांना राष्ट्रीय करून. सगळीकडे अध:पात चाललाय, घातपात चाललेले आहेत, आयएसआय धुमाकूळ घालतो आहे, हिजबूल पुढे सरकतो आहे. कारगिलची वाट लागण्याची पाळी आली होती आणि काय चाटायचे आहेत हे ‘राष्ट्रीय’ आम्हाला! एका तरी मुसलमानाचं कोणत्या तरी वृत्तपत्रांमध्ये खुद्द त्यांच्या वतनामध्ये असं कधी लिहून येतं की त्याने हमला केलेला आहे, पाकिस्तानवर केलेला आहे. या हिजबूलविरुद्ध काहीतरी बोललेला आहे. काही नाही… खूश… आता तरी पेढे वाटले होते त्यांनी… काहीतरी झालं होतं ना मध्ये. भेंडीबाजारात पेढे वाटले. कसले ते पेढे, कोणाला काय झालं? तुम्ही मुसलमानांना का जवळ घेता? पहिल्यांदा या देशामध्ये हिंदूंना जवळ घ्या मग इतरांचं बघा. जणू आम्हाला या देशामध्ये कोणी नाहीच… ‘हिंदू’ म्हणजे या देशामध्ये रस्त्यावरचा लूत लागलेला कुत्रा समजू नका. ती सुद्धा एक पेडीग्री आहे. पहिला आमचा मान मग तुमचा मान. आमची राखली शान तर… हे मी खरंच सहन करू शकत नाही, याचं कारण सगळं जे काही चाललं आहे ते त्यांच्या बाजूने… सवलती त्यांना, अमुक त्यांना, तमुक त्यांना मग आमच्याकडे कोण बघणार? हे नवं कोण आलंय ते… आघाडी सरकार… तेही त्यांच्या मागे… काय या सगळ्या लोकांची सुंथा केली काय हो! आणि म्हणून आम्हाला तुमच्या बंगारूंचं जे आवडलं नाही, त्या माणसाला मी पाहिलंही नाही. फक्त दूरदर्शनवर काही चेहरे दिसतात. जशा साबण लावलेल्या सुंदर पोरी दिसतात त्यामध्ये बंगारू एखादा… मला वाटलं ती साबणाची जाहिरात असेल, पण नाही… निराळा साबण होता तो. देश साफ करायला निघालेत की काय असं वाटतं त्यांच्या साबणाने… बंगारूबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे. पण तुम्ही एक जात जेव्हा जवळ घेता, तेव्हा आम्हाला धस्स होतं. की, अरे, इतका तुम्हाला भयानक अनुभव आला असताना आणि तुमचे पंतप्रधान बेचैन असताना तुम्ही त्यांना जवळ करून काही उपयोग होणार आहे देशाला? ५० वर्षांत जी माणसं तुमच्या जवळ येऊ शकली नाहीत, ५० वर्ष ज्या पाकिस्तानशी तुमची दोस्ती जमू शकली नाही, त्या लोकांना तुम्ही मिठ्या मारायला जाता आणि ज्या हिंदूंनी तुमचा पक्ष सत्तेवर आणलाय त्यांना तुम्ही लाथाडता… कोणती नीती ही? कारगिल कारगिल करताय… कारगिलमध्ये जे जवान लढताहेत त्यांची हालत काय आहे… आज त्यांच्या मागे त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर आणले जात आहेत, बुलडोझर फिरविले गेले मालाडमध्ये… नवरे बिच्चारे लढताहेत… आणखी एक ही महानगरपालिका… तो कोण एक तो बुलडोझर फिरवला… मला माहीत नाही… घड् घड् घड् घड्… काय रे काय करतो काय? कोणाला सपाट करतोय…? ते जर तिथे उभे राहिले नसते तर तुम्ही सपाट झाला असता इकडे सपाट… हिरवा बुलडोझर तुमच्या अंगावरून गेला असता… तो त्यांनी रोखलाय तिकडे… आणि तुम्ही त्यांच्या घरावरून बुलडोझर फिरवता…? त्या कुटुंबियांना मी उद्या किंवा परवा घरी बोलवलंय. घाबरू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत… या सगळ्या माय-भगिनी तुमच्याबरोबर आहेत, हे सगळे बांधव तुमच्याबरोबर आहेत… आणि ही जी निवृत्त जवान ट्रस्ट, शिवसेना ट्रस्ट स्थापन केलेली आहे त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना घर देत आहोत… आणि त्या जवानांना सांगणार आहोत घाबरू नका, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… (टाळ्या) कशाकरिता त्याने लढायचं, कोणासाठी लढायचं… दुसरा नुकताच एक जवान बिचारा गेला, वयानेही जवान… आणि त्याच्या पत्नीला प्यूनची नोकरी देताहेत… स्टुलावर बसायचं तिने? शरम वाटायला पाहिजे तुम्हाला की कोण आहे ती, पत्नी कोणाची आहे… तुमच्या बायकोचं ठीक आहे हो… वीरबाला… कोण आला, आल्या… अमूक आला, आल्या… क्लिंटन आला, त्याला भेटल्या. उपयोग काय त्याचा. पण ज्यांचा आज स्वत:चा पती तळहातावर शिर घेऊन त्या सरहद्दीवरती लढतो आहे, त्याची ही किंमत? त्याची ही हालत? लाज वाटायला पाहिजे या सरकारला लाज… त्या पत्नीलासुद्धा आमचा निवृत्त जवान शिवसेना ट्रस्ट मदत केल्याशिवाय राहणार नाही. तिचा मान शिवसेना राखेल… मी बोलल्यानंतर माझ्यावरती लगेच… वाट बघताहेत फक्त… कुठे सापडतोय हा… बोका टपून बसलाय… सापडणार नाही… अरे मला काय… मी तीन महिने गेलोच होतो… त्या सीमालढ्याच्या वेळेला मी, मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी येरवडा जेलमध्ये तीन महिने बसलो होतो. बाळासाहेब म्हणे अटकेला घाबरतात… आणि तुरुंगामध्ये जायला घाबरतात. गधड्या, तू होतास की माझ्याबरोबर त्या वेळेला. १९६९ साल, सीमालढ्याचं. दहा दिवस मुंबई जळत होती दहा दिवस… रात्री दीड वाजता मला निरोप आला, रात्री दीड वाजता… झोपलो होतो… दाराची खुडबूड सुरू झाली. म्हटलं दीड वाजता कोण माझं दार वाजवतंय. बघतो तर ते तिथले सुपरिंटेंडंट आले. म्हटलं, अरे काय सुटका की काय. नाही नाही म्हणे… तुम्हाला जरा भेटायला आलो. म्हटलं रात्री दीड वाजता? भेटायला? रात्री? हो म्हणे महत्त्वाचं काम आहे. तेव्हा एक मधू मेहता आणि मनू अमरसे, हिंद सायकलचे मला भेटायला आले तुरुंगात. म्हटलं काय हो… नाही म्हणे, वसंतराव नाईकांनी तुम्हाला निरोप पाठविला आहे की, कृपा करून तुम्ही सांगितल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जात नाही. मुंबई पेटली आहे ती विझणार नाही. तुम्ही आता रात्री निवेदन करा… कशाला झक मारायला माझ्याकडे आलात, वि-झवायला… म्हणजे ही पेटलेली मुंबई, आग. काय होतं जरा गडबड होते शब्दांची… राग आणि चीड आली की मग शब्द तुटतात इकडे तिकडे. म्हटलं मला नका बाहेर काढू त्या दोघांना पण आणा माझ्यासोबत. तिघे मिळून निर्णय घेऊ. नंतर माझ्याकडे जाधव आले म्हणजे डी.आय.जी. येरवडा जेल. म्हणाले, बाळासाहेब खरंच तुम्ही निवेदन केलं तर बरं होईल. मी तिथूनच आलोय, मुंबई राख होतेय राख… मग म्हटलं जाऊ द्या काढलं निवेदन. निवेदन काढलं आणि मग माझ्या शिवसैनिकांनी, माता-भगिनींनी रस्त्यावर पडलेल्या काचा, सगळे दगड-धोंडे साफ केले आणि मुंबई व्यवस्थित झाली सुरू… (टाळ्या) हे विसरलात तुम्ही, हा इतिहास आहे. अरे हिंमत असेल तर मला तू कसली अटक करतोय. हिंमत असेल तर अबू आझमीला अटक करून दाखव. अबू आझमी… काय त्याची भाषणं आहेत, कुठे गेलं ते, अबू आझमीची ती वाक्य (संदर्भ हातात घेऊन) ‘मला अटक करण्याची ताकद कोणाच्या बापात नाही, पहले मैं हात तोडने वालोंमेंसे था, आज हात जोडने वालोमें हूँ! ६ दिसंबर के दिन हमारे भाईयों को पुलिसवालोंने चुन चुन कर मारा था, तुम मुझे ताकद दो, तुमपे हाथ उठाने वाले सभी पुलिसवालों को मैं निचौडकर रख दूँगा।’ निजामउद्दीन चौकला… पुन्हा म्हणाला, ‘किसीके माँ के कोखने यह दूध नहीं पिलाया के अबू आझमी को गिरफ्तार कर सके… महाराष्ट्र में खुशहाली चाहते हो तो बालासाहेब ठाकरे की सिक्युरिटी वापस लो. उन्हे सिर्फ पाच पुलिस दो…’ हे सगळे उद्गार काढणारे… यांना काहीच करू शकत नाही तुम्ही. तुमचा बाप काढला, तुमची आई काढली, तुमचं सगळं काढलं… तुमचं दूध काढलं, लाजलज्जा असेल तर करा तुम्ही यांना अटक. माझं हिंदुत्व तुमच्या डोळ्यात सलतंय, पण मुसलमानांचं हे मुसळ तुम्हाला सलत नाही…? मी सगळ्यांना बरोबर धरतो अरे… मागच्या वेळेला मी त्या बनातवाल्याशीही चर्चा केली होती. पण सगळे हरामखोर… मी अनुभव घेऊन उभा राहिलेला माणूस आहे. मी सगळ्यांसाठी प्रयत्न केला अगदी खुद्द आपल्या नवबौद्ध बांधवांसाठी. पण नाही… तुम्ही म्हणता ना कृष्ण (नितीश भारद्वाजना उद्देशून) ते बरोबर आहे, प्रत्येक जण आपली जात सांभाळून आहे. जातीच्या तत्त्वावरती संपूर्ण सवलती घेतोय. सगळं काही मागतोय, देताहेत, मिळतंय.. आणि नपुंसक सरकार त्यांना मुक्तहस्ताने पाहिजे ते द्यायला तयार झालेत. हे सगळं बघत असताना मी स्वस्थ बसायचं. आम्ही सहनशील म्हणून आमची गांडूगिरी छापायची, लपवायची? नाही जमणार, नाही जमणार आम्हाला. मग कशाकरिता बसलाय इथे? का म्हणून आलायत सगळे सगळीकडून. स्वत:च्या खिशाला भोक पाडून तो इथे आलाय. ही नागपूरची सभा नाहीय शरद पवाराची… गावा-गावात गाड्या सोडल्या, लोकं भरले. जसे देवनारला गाड्यात बोकडं भरतात तशी… ही सगळी आपणहून आलेली माणसं आहेत. प्रेमानं, विचारानं. एका संतापानं, चिडून… राख करणारा राग… काही त्यांना मी देत नाही. आणि ही गरज, ही जाणीव जर त्यांना झाली असेल तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही. बरं मी जर डरपोक माणूस आहे तर केवढी फौज बोलवली होती हो मला पकडायला. मला असं वाटलं होतं की वीरप्पन मातोश्रीमध्ये राहतोय की काय? पण मीच राहतोय तिथे.. मी राहत होतो. केवढ्या फौजा, सरकारकडे, केंद्र सरकारकडे… अमुक तुकड्या पाठवा, तमुक तुकड्या पाठवा, नंतर पोलीस बंदोबस्त. हेच पोलीस आज तिकडे आहेत उद्या आमच्याकडे येतील आणि यावं लागणार. म्हणूनच राणेंना म्हटलं की आता बस्स झालं… ना रा य ण, ना रा य ण, हा जप नका करू. आणा लवकर आणा. पण काही असतात, काही खलनायक, काही ठिकाणी त्यांना ते बघवत नाही. आणि शेवटी कुठेतरी काहीतरी करत बसायचं. तुला नाही मला नाही आणि शेवटी घाल कुत्र्याला. म्हणून तिकडे आघाडी सरकार बसलंय. आता त्याचंही फाटत चाललंय. तो पच् पच् पाचपुते आणि तो आदिक त्यांची लागली. बरं वाटतं आज इथे धर्मांतराच्या बाबतीतसुद्धा जो विचार आहे तो काय आहे विचार. धर्मांतर आपणहून कोणी करणार असेल की, बाबा कंटाळलो, मी या हिंदू धर्माला, कंटाळलो इस्लाम धर्माला, सगळ्या धर्मांना, कुठल्याही. सगळे जण हिंदूला कंटाळतात आणि इस्लामकडे जातात, ख्रिश्चनकडे जातात म्हणून शंकराचार्य ज्या वेळेला माझ्या घरी आले तेव्हा मी त्यांना विचारलं, निदान तुमची पीठं किती आहेत हे तरी सांगा. नक्की तुमचं पीठ कुठलं, हे की ते! ९९ शंकराचार्य तयार झाले आहेत या देशात. नक्की कोण येऊन गेलं ते कळत नाही. म्हणून त्यांना सांगितलं की, तुम्ही अधिकाराने सांगा की, या पाच पीठांवरील शंकराचार्य आणि त्यावरती सहावा नाही आणि शेवटी त्यांना सांगितलं, गरिबी हे आमचं कारण आहे. या गरिबीचे फायदे घेतात, विशेष करून ख्रिश्चन घेतात. आणि हे फायदे त्यांनी घेतल्यानंतर त्यांना धर्मांतर म्हणून जो प्रकार जो त्यांना माहीत नसतो. फक्त पोटाची खळगी भरल्याचं एक समाधान असतं. ज्या ज्या लोकांनी आमचा हिंदू धर्म सोडला, ख्रिश्चन धर्माकडे गेले, इस्लाम धर्माकडे गेले त्या सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तिकडे जाऊन जर तुमची गरिबी हटली असेल, पोट भरलं असेल, सुखी झाला असाल तर हिंदू धर्मात परत कधी येऊ नका, बिलकूल येऊ नका. पण तिथे जाऊनसुद्धा जर गरीब राहणार असाल आणि तिथेच मरणार असाल गरीब म्हणून तर मात्र हिंदू धर्मात या आणि या धर्मामध्येच गरीब म्हणून मरा, त्या जातीचा बट्टा लावून घेऊ नका, बिलकूल लावून घेऊ नका. शंकराचार्यांना मी सांगितलं की, अहो, म्हटलं केवढी देवळं, तो तिथला पलीकडचा सिद्धिविनायक, तो तिथे मारुती. ३२ लाख रुपये त्या वेळेला देऊन ज्ञानेश्वर मंदिर बांधलं, गरिबांचं काय मग? देव आपलीच सेवा करून घेत आहेत. माझ्या पाया पड, माझ्यापुढे नारळ फोड, मला हे कर, मला ते कर. पण बाबा आम्हाला पण थोडं मिळू दे की, पण कसं मिळेल. पैशाच्या लाचारीमुळे हिंदू धर्म सोडणाऱ्या तुमच्यावर देव तरी कशी दया दाखवेल. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, ज्या हिंदू धर्मात जन्म मिळालाय तो उभा जन्म फक्त आणि फक्त हिंदू म्हणूनच अभिमानाने जगा. आणि पैशाच्या लाचारी खातीर इतर धर्माकडे ढुंकूनही बघू नका. तुमचं धर्मांतर चालू आहे हे कसं सहन करता तुम्ही. सोनिया गांधी सेक्युलर, कुठे तरी दरड कोसळली, खाली झोपड्या बांधणाऱ्यांना काही आगापिच्छा नसतो, जागा दिसली की घुस, जागा दिसली की बांध चार बांबू घातले आणि वरती एक छप्पर टाकलं की झालं राहण्याचं घर. असतात गरीब असतात. गरिबीबद्दल मला काही बोलायचं नाही. पण त्या झोपडीवरती दरड कोसळल्यानंतर काही माणसं मेली. कोण होते ते. माणसं होती. माणसं म्हणून बघा ना. पण मुसलमान होते, बाई दिल्लीहून आली. एअरपोर्टवर उतरली. बरोबर घाटकोपरला उतरली. ती दरड कोसळली आहे ते तिथे जाऊन बघितलं, ये कैसे हुआ. बाई ये दरड कोसळ्या ना तो हम नीचे सापडके मर गये, ओ आय सी, ओ आय सी म्हटलं ओ आयसी का? दगडाशी काय बोलते. पण ज्या वेळेला अंबरनाथ यात्रेमध्ये १०० हिंदू मारले गेले तिथे फिरकली नाही बाई! बिहारमध्ये रोज मुडदे पडतात, तिथे फिरकली नाही ही बाई! आणि एक ख्रिश्चन मारला गेला कुठेतरी ओरिसाच्या बाजूला लगेच तिथला मुख्यमंत्री उडाला. उडाला उडाला म्हणजे उडाला. मुख्यमंत्री उडवला. हे जर तुमचं सेक्युलॅरिझम असेल ना तर दोन फुल्यात गेलं ते असे समजा. फुल्या तुमच्या. ज्या मारायच्या असतील तर मारा.. कसा तुमच्या अंगाचा तिळपापड होत नाही. का पेटून उठत नाही तुम्ही अन्यायाविरुद्ध. कृष्णाला सांगायचे आहे की, (नितीश भारद्वाजला उद्देशून) ठकाशी ठक, हातामध्ये तो जो घ्यायचे ना, आधार. एक कमंडलू हातामध्ये आणि दुसरी काठी असायची. बावळट हिंदूंना मला सांगायचं अहे की अरे बावळटांनो ती काठी नव्हती आतमध्ये गुप्ती होती. प्रसंग आलाच तर क्षमा नाही. अबू आझमी जर त्या मुसलमानांना सांगाणार असेल हातामध्ये धोंडे घ्या आणि आमचे, आमच्या हातांना काही अर्धांगवायू झालाय हिंदूंच्या? ही मनगटंसुद्धा मजबूत आहेत. धोंडे कशाला धोंड्यांच्या पलीकडेही जे असेल ते घेऊन झेपू तुमच्या अंगावर..(टाळ्या) त्यांचा भाषणाचा अभ्यास चाललाय. अबू आझमी असं असं बोलला.. हा तो जे काही बोलला ते.. आमचा त्याच्यावरती अभ्यास सुरू आहे. मग.. ते..आम्ही.. पोलिसांकडे दिले. पोलीस अभ्यास करताहेत… मग त्यांचं काय उत्तर येईल त्यावर आम्ही कारवाई करू. आणि बाळासाहेब ठाकरेला लगेच आतमध्ये घाला! कोणत्या तऱ्हेचा कायदा आहे हा? आमचा जरा अभ्यास करू द्या ना, मग त्या पोलिसांना आमचंही चरित्र कळेल. की हा एक असा येडझवा होता. त्यांनाही कळेल आमच्या चारित्र्याबद्दल. त्याचा अभ्यास अजून चालू आहे. पोलीस एवढे डफर असू शकतात? इतका वेळ लागतो त्यांच्या अभ्यासाला. अमिताभ बच्चनचा ‘कौन बनेगा करोडपती’ माझ्या नातवांचं तोंडपाठ झालंय अॅक्शनसहीत. दोन दिवसांत आणि यांना एवढा वेळ लागतो अभ्यास करायला? अबू आझमीला कुठे अटक करायची? करायची की नाही? मग करायची असेल तर कशी करायची? मग कलमं? हे प्रेम मला पसंत नाही. कृष्णाला मला सांगायचं की बाबा रे बंगारू बंगारू ठीक, पण आम्हाला त्यांचा हा शेरा मान्य नाही. मुसलमानांना जवळ करायचं असेल तर ख्रिश्चनांना जवळ करा. जी शीख रेजीमेंट आमच्या सैन्यात आहे, देशाचं रक्षणकर्ते आहे, त्यांना जवळ करा. अहो सगळ्यांनाच तुम्हाला भारतीय म्हणून जवळ करायचं आहे ना मग एकाच जातीचा उल्लेख का म्हणून करता? आणि हे म्हणणार नाही. आम्ही ते करणार नाही आणि हे करणार नाही, कोण तुम्ही? या देशाचे कायदे कानून तुम्हाला मान्य करावेच लागतील. पर्सनल लॉ मध्ये आम्हा हिंदूंना एक बायको, त्यांना पाहिजे तेवढ्या बायका! का तर त्यांचा तो पर्सनल! त्यांचा आहे तो. आमच्याकडे पर्सनल काही नाही. शरद पवार म्हणताहेत या देशामध्ये २० कोटी मुसलमान राहतात त्यांना विसरून चालणार नाही. आम्ही जबाबदार आहोत ते वीस कोटी झाले त्याला? त्यांचं त्यांनी निस्तरावं, का त्यांना एवढं कसं काय? का? देशावर उपकार करता तुम्ही संख्या वाढवून? बांगला मुसलमान आलेत ते निराळेच. ते दोन कोटीच्या जवळ गेलेत. माझ्या हातामध्ये सैन्य द्या, या देशाचं सैन्य पहिल्यांदा मी दोन कोटी बांगलादेशी मुसलमानांना त्यांच्या ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढेन. आणि या मुसलमानांना सांगेन या देशाचे कायदे कानून पाळूनच तुम्हाला या देशामध्ये देशाचे नागरिक म्हणून राहावं लागेल. तुम्ही तुमचा धर्म पाळा, मशिदीत जा, बांग मारा, पण एका अटीवर गणपती उत्सवाच्या वेळेला सांताक्रूझला जो प्रकार झाला, अत्यंत कृतघ्नपणाची सीमा गाठली. मशीद आली, पोलिसांनी अडवलं, पोलीस तसे आमचे कर्तव्यदक्ष त्याबद्दल वादच नाही. कोणाला कधी अडवतील सांगता येत नाही. बरं तर बरं पोलीस कमिशनरलाच अडवता? नाही आत जायचं सभा चालली आहे. ए साल्या तुझा बाप आहे मी. तिथे अडवलं तर अडवलं ते म्हणाले, तुम्ही असं कसं करता? त्यांच्या वेळेला आम्ही बंद करतो, त्यांनी आमच्या वेळेला पुढे ढकलली तर काय आहे, तोपर्यंत आम्ही मिरवणूक घेऊन जातो पुढे नाही नाही नाही म्हणजे? काय करावे? काय कारभार चाललाय? मग ते पण भडकले. त्यांनी लॉरी वगैरे तशीच ठेवली, गणपती तिथेच ठेवला. पोलिसांनी जाऊन त्यांना अटक केली, सहा लोकांना घरी जाऊन. आणि आता नीचपणे वागताहेत की ते बेस्टमधले कामगार त्यांच्या ऑफिसला जाऊन कळवलं. म्हणाले या गुन्ह्यामध्ये सापडले आहेत. त्यांच्या नोकऱ्या काढा. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एखाद्याच्या पोटावरती लाथ मारायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे पोलिसांचं काम नव्हे. तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे चला, तुम्ही करू शकत नाही शिक्षा, शिक्षा कोर्ट करेल. तुम्ही फक्त गुन्हा काय केला तेवढंच सांगा. पण पोटावरती लाथ मारलेली आम्ही सहन करणार नाही. बिलकूल बिलकूल सहन करणार नाही. नंतर मग झालं, त्याचं काय झालं पत्ता नाहा. कालसुद्धा असाच एक प्रकार झाला. इथे ती लोकं आली, तिथे बँकेची तक्रार होती, सारस्वत बँक. कोणीतरी कुचाळकी केली, त्या दोघांना पकडलं आणि पोलिसांनी नालबंदी केली नालबंदी, पाय फोडून काढले त्यांचे. त्या पोरांनी पाय दाखवले. फोडून काढले पाय त्यांचे. केवळ फेरीवाले म्हणून बसले असताना त्या बँकेच्या फुटपाथसमोर तुम्ही त्यांना पकडून नालबंदी केली त्यांच्यावर. मग ही शिक्षा जर हॉकर्सना असेल, फेरीवाल्यांना असेल तर मग पकडा सगळे मुंबईचे फेरीवाले आणि द्या सगळ्यांना नालबंद्या. आम्ही तयार आहोत. पण या मराठ्यांच्या राजधानीमध्ये, मुंबईमध्ये मराठ्यांच्याच पायावर जर फटके पडणार असतील तर एक दिवस हा शिवसैनिक तुम्हाला फटके दिल्याशिवाय राहणार नाही..(टाळ्या) अहो सहनशीलतेला सुद्धा मर्यादा कुठपर्यंत? आम्ही सहन करायचं? काय काय सहन करायचं? आणि किती सहन करायचं. हे विदर्भाचं एक लफडं निघालंय स्वतंत्र विदर्भ का म्हणून. आज स्वतंत्र विदर्भ उद्या स्वतंत्र मुंबई! डोमकावळे टपलेत. मुंबई मराठ्यांपासून दूर करू देणार नाही. तुम्ही आवाज द्या कोणीतरी की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू. दुसऱ्या दिवशी चिरल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच दिवशी चिरून काढू. ही लंगोटी पाहा. (एक यादी दाखवत) ही एवढी माणसं महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये राज्य करून गेली. महाराष्ट्रामध्ये ३५ वर्षे. विदर्भीयांचं राज्य होतं. सुरुवात करायचं तर फक्त कन्नमवार आणि वसंतराव नाईक, सुधाकर नाईक हे तीन फक्त महाराष्ट्रीय झाले. आणि हे तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. त्या दिवशी मी त्यांना टीव्हीवर पाहिलं बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालं. म्हटलं कोण बाई बोलतेय पाहतो तर तिरपुडे! या विदर्भाच्या बाबतीत जे चालू आहे ते आम्ही काही मान्य करणार नाही कारण आम्ही याच्या… स्वतंत्र विदर्भ घेतल्याशिवाय.. (म्हातारा आवाजात नक्कल करीत) अरे या आवाजात तुला स्वतंत्र विदर्भ कसा मिळणार? काय साला आवाज आणि काय सालं मागतंय. एवढं साल्यांनो तुमच्या हातात सत्ता असताना विदर्भाचं वाटोळं का झालं? याचं उत्तर आहे तुमच्याकडे? बारकी बारकी बारकी. ठीक आहे ना राज्य करा त्यांना मोठ्या राज्यामध्ये सत्ता मिळू शकत नाही ती बारकी मागताहेत. गोवा तर ४० आमदारांचा गोवा! २१ माणसं निवडून आली की राज्य येतं! मग तिकडे का नाही जात. कारण तिकडे ख्रिश्चनांचा वरचष्मा आहे. आणि आम्ही कोकणी आणि मराठी, मराठी आणि कोकणी म्हणून भांडतोय. कोकणी राज्यभाषा की मराठी राज्यभाषा म्हणून भांडतोय. बा.भ. बोरकर, आमच्याच मराठी कवितेमुळे बा.भ. बोरकर वरती आले, कोकणीमुळे नाही. इतिहास विसरता तुम्ही? बा.भ. बोरकरला मराठीने मोठा केला कोकणीने नाही. पण कोकणी आमची मावशी आहे. पण स्वतंत्र विदर्भ जर उद्या झालाच तर त्या दर्डाची दोन कार्टी आहेत ना, त्यातला एखादा मुख्यमंत्री होईल! जांबुवंतराव नाही होणार. तिरपुडे तर नाहीच नाही. कुठे ते वसंत साठे. इंदिरा गांधींच्या त्या कॅबिनेटमध्ये किचन कॅबिनेटमध्ये केवढा मान. इंदिरा गांधींना सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा वशाच्या हातचा चहा पाहिजे. वसू कुठे गेला? साल्यांनो किचन कॅबिनेटमधील माणसं आणि तुम्हाला विदर्भाचं भलं करता आलं नाही? त्या मानाने पश्चिम महाराष्ट्र बरा. सगळी टगी माणसं आहेत. बरोबर स्वत:चं भलं करून घेतलं तुम्ही? का केलं नाही. अरे गंगा वाहते आहे, येतंय आली आहे टमरेलं भरताहेत, अरे ती पिण्याच्या पाण्यासाठी आली आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही टमरेलं भरून घेतली. त्याला गंगा तरी काय करणार. पण ज्या वेळेला शिवसेनेच्या हातात, भारतीय जनता पक्षाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यानंतर मात्र फक्त साडेचार वर्ष आमच्या हातात सत्ता होती. त्यातलं दीड वर्ष गेलं आचारसंहितेमध्ये. सहा महिने मिळाले या राणेंना मिळाले बाकी आमचे मनोहर जोशी. साडेचारमधले दीड गेले राहिले तीन या तीन वर्षात जी आम्ही सुधारणा केली आहे, विदर्भामध्ये ती जाऊन बघा. योजना आखल्या गेल्या. भगवी पत्रिका काढली. त्यातही सुधारणा होणार होत्या. पण सत्ता गेली. गेली म्हणजे काढली. पडलं नाही आमचं सरकार, सरकार पडलं नाही. नियमाप्रमाणे, आचारसंहितेप्रमाणे आम्हाला जावं लागलं. आणि आलं होतं ना. १३९ पर्यंत आलो होतो. सहा माणसं कमी पडली. पण ते कोणाच्या डोक्यात किडे कसे वळवळतील ते सांगता येत नाही. एकाने सांगितलं अल्पसंख्य असल्यानंतर सरकार कसं काय आपण आणायचं? बरं दिसत नाही. म्हटलं नाही तर नाही. मग काय करूया आपण याबाबतीत. म्हणे नाही आपल्याला पुढे गेले पाहिजे. म्हटलं नाही गेले की सगळे येतात. जसे त्यांच्याकडे गेले नाही तर आमच्याकडे आले असते सगळे अपक्ष. नाही नाही नाही, राज्यपालांकडे यायला तयार नाही. सरकार गेलं त्यांच्या हातामध्ये. जर आम्हाला सहा माणसं कमी असताना अल्पसंख्य म्हणून आम्ही सरकार आणू शकलो नाही, तर बिहारमध्ये कोण तो कुमार, नितीशकुमार एवढी काय मोठी माणसं नाहीयेत. नितीशकुमारला त्यांचा राज्यपाल आहे त्यांनी ऑर्डर काढून टाकली की यू फॉर्म द गव्हर्नमेंट. तुम्ही सरकार स्थापन करा. मेजॉरिटी दाखवायला पाहिजे होती, नाही दाखवली.. ऐनवेळी बघू.. ज्या वेळी दाखवण्याची पाळी आली आणि त्याच वेळी हा नितीशकुमार पळाला अणि राजीनामा दिला गव्हर्नरकडे. तिथे किती तरी कमी होते तरी पण त्याने धाडस केलं. आणि इथे फक्त सहाच कमी होते तर तुम्ही अल्पसंख्य म्हणून सरकार काढलं. अल्पसंख्य… सरकार स्थापन करणं बरं दिसत नाही. लोकशाहीचा पुळका आला. इतकी अधर्माने चाललेली माणसं आहेत केवढी नीती. सगळीकडे अनीतीच. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर आता थंड बसणं कठीण आहे. या देशामध्ये क्रांती होण्याची पाळी आली आहे. मी वाजपेयींना जरूर पाठिंबा देतो. माझा पाठिंबा वाजपेयींना जाऊन विचारा. टेलिफोनवर सांगितलं आहे, प्रत्यक्ष भेटलो राजभवनात तेव्हा सांगितलं आहे. आम्हाला मंत्रीपदाची खाती असो किंवा नसो काढून घेतली तरी चालतील, पण देशाच्या भल्यासाठी, हिंदुस्थानच्या भल्यासाठी पाकिस्तानचं जे हिरवं सावट येतंय त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्याबरोबरच राहू. कधी आम्हाला असा ममताचा झटका नाही आला. ”हे हे हे म्हणे. दे हॅव टेकन अस् फॉर ग्रॅण्टेड पण तसं नाही आहे. केंद्रामध्ये असलेलं सरकार गडगडवण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि चंद्राबाबूमध्ये आहे. (टाळ्या) पण ते आम्हाला करायचं नाहीये. कारण आज वाजपेयींचं सरकार जर दूर झालं तर देशामध्ये मध्यावधी निवडणुका येतील. पण त्या होणार नाहीत. हा इशारा पुन्हा मी देतोय. मध्यावधी निवडणुका येणार नाहीत. रक्तपात, यादवी युद्ध होणार आणि यादवी युद्धामध्ये रक्तपात सुरुवात होईल. तेव्हा ते रक्त कोणा-कोणाचं असेल याची कल्पना करा तुम्ही. केवळ याच आणि याच गोष्टीसाठी मी गप्प बसलोय आणि संयम पाळतोय. वाजपेयींच्या पाठीशी मी उभा आहे. मजबूत उभा आहे आणि उभा राहणार. आम्हाला काय तमाशा करता येत नाही? आम्हीही करू शकतो. नाही आम्हाला हेच खातं पाहिजे नाही तर आम्ही चाललो. आम्ही तेच खातं पाहिजे नाही तर आम्ही चाललो. हे आम्हालाही करता आलं असतं पण नाही करत. देशहितासाठी आम्ही मजबुतीनं पाठिंबा दिला आहे. आणि देत राहू. आणि तो तसाच कायम राहील. फक्त मी एवढंच सांगतो की भाषण लवकर आटपावं लागेल. कारण हे पत्रकार म्हणताहेत की सोयीचं जाईल पण छापा, नीट लिहा. अगदी घाईघाईमध्यें नीट लिहा जसं आहे तसं लिहा यावरती आणि बघा किती मोठी सभा आहे ती. नेहमीप्रमाणे नको मी तुमच्यावर कधीच टीका केली नाही, करणार नाही. पण तुम्हीसुद्धा आता शिवसेनेचं जे हे ध्येय आहे महाराष्ट्र विकासाचं आणि देशहिताचं हे कधीही आम्ही आजन्म सोडणार नाही. एवढं मी निक्षून सांगू इच्छितो! आणि जर पाळी आलीच तर मीच तुम्हाला या देशामध्ये क्रांती करून दाखविल्याशिवाय राहणार नाही एवढा मी एका जबरदस्त आत्मविश्वासाने सांगून तूर्त आपली रजा घेतोय.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
(सौजन्य - http://shivsena.org/m/)