अपात्र व्यक्तीची लाभार्थी म्हणून निवड
By admin | Published: June 5, 2017 01:03 AM2017-06-05T01:03:07+5:302017-06-05T01:03:07+5:30
अपंग लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने यशवंत निवारा ही योजना सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अपंग लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने यशवंत निवारा ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील अपंगांना व्हावा हा हेतू आहे. परंतु, जेजुरी नगरपालिका हद्दीतील अपंग व्यक्तीची घरकुलासाठी निवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी अर्जांच्या छाननीकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.
आई-वडिलांच्या मागे अपंगांचा सांभाळ केला जात नाही. अनेकदा त्यांना घरातून बाहेर काढण्यात येते. त्यामुळे त्यांचे जगणे अवघड होते. रस्त्याच्या कडेला, मंदिरामध्ये, अनाथालयांमध्ये त्यांना आसरा घ्यावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने अपंग व्यक्तीचे सक्षमीकरण व्हावे, बेघरांना निवारा मिळावा यासाठी यशवंत निवारा योजनेंतर्गत बेघर अपंगांना घरकुल देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेने योजनेसाठी २०१६-१७ साठी ४ कोटी २४ लाखांची तरतूद केली आहे. अपंगांना घरकुलासाठी १ लाख रुपये उपलब्ध करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून १ हजार ३१६ प्रस्ताव आले होते. छाननी करून ४२३ लाभार्थ्यांची निवड केली असून, लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील निधी जिल्हा परिषदेने दिला आहे.
लाभार्थ्यांच्या यादीची तपासणी केल्यानंतर जेजुरी नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या एका अपंग व्यक्तीचा यादीमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे. या अपंग व्यक्तीने जेजुरी नगरपालिकेकडून सहा हजारांचा लाभ घेतला आहे. पुंरदर तालुक्यातून घरकुलासाठी याच व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नाही अशा व्यक्तीची या योजनेमध्ये निवड कशी झाली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अपंग घरकुल योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने घोटाळा केला आहे. अपात्र अपंगांना घरकुल योजनेतून लाभ दिला आहे. यामुळे खरा अपंग घरकुल लाभापासून वंचित राहिला आहे. प्रहार अपंग क्रांतीने या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी तपासली. यामुळे हा घोटाळा समोर आला आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीची पुन्हा तपासणी करून कारवाई करण्यात यावी.
- सुरेखा ढवळे,
प्रहार अपंग क्रांती संघटना
अपंग घरकुल योजनेसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांची यादी आली आहे. जेजुरीमधील एका अपात्र लाभार्थ्याची घरकुल योजनेसाठी निवड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तपासणी केली जाईल. अपात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी दिला जाणार नाही. तसेच या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. सर्व लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करणार आहे.
- प्रवीण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद