‘महाराष्ट्रीयन्स’ची निवड सोपी नव्हती!
By admin | Published: April 6, 2016 05:12 AM2016-04-06T05:12:37+5:302016-04-06T05:12:37+5:30
ज्या महनीय व्यक्तींनी देश आणि राज्य घडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले, अशा सर्व महाराष्ट्रीयन्सना शोधण्याचे कार्य ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’च्या माध्यमातून झाले असल्याने
मुंबई : ज्या महनीय व्यक्तींनी देश आणि राज्य घडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले, अशा सर्व महाराष्ट्रीयन्सना शोधण्याचे कार्य ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’च्या माध्यमातून झाले असल्याने, याचा आपल्याला मनापासून आनंद होत असल्याची भावना ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
मुंबईतील एनसीपीएच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’ सोहळ्याचे प्रास्ताविक खा. दर्डा यांनी केले. ‘लोकमत’ची सामाजिक बांधिलकी, पुरस्कारासाठी नामांकितांची निवड आणि पारदर्शी निवड प्रक्रियेची विस्तृत माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘ही निवड एवढी सहज सोपी नव्हती. या पुरस्कारांची ही तिसरी एडिशन आहे. पहिल्या एडिशनमध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला, ते आमीर खान इथे उपस्थित आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्यांना नॉमिनेशन्स मिळाले, ते सर्व आमच्यासाठी विजयी आहेत. आम्हाला या सर्वांच्या कार्याविषयी मनापासून आदर आहे, अभिमान आहे.’
‘जगभरातील लाखो वाचकांनी ईमेल्सच्या माध्यमातून, तसेच ज्युरी मेंबर्सनी अचूक, सखोल, विस्तृत चर्चा केल्यानंतर, या मानकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे हिरे, मोती, रत्न आणि प्रसिद्धीपासून दूर राहून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही सर्व मंडळी आदरणीय अशीच आहेत. गेल्या पुरस्काराच्या वेळी विदर्भाचे लाडके सुपुत्र देवेंद्रजी फडणवीस यांचे नॉमिनेशन झाले होते. पुढे ते मुख्यमंत्री झाले. यातून आमची निवड किती अचूक होती, हेच सिद्ध होते. यंदाचे नॉमिनी नितीन गडकरीजी हेसुद्धा आमच्या पुरस्कारांच्या पहिल्या एडिशनमध्ये नॉमिनी होते. आज ते केंद्र सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाच्या खात्यात कार्यरत आहेत.’
‘आपल्या कार्याने ते देशावर छाप उमटवत आहेत, पण एका गोष्टीची खंत वाटते. ती म्हणजे, आमचे एका वर्षीचे नॉमिनी जे पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, ते आर. आर. पाटील आज आमच्यात नाहीत, त्यांची आठवण आज प्रकर्षाने होत आहे,’ अशी भावना खा. दर्डा यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)