सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून; जनतेतून निवड रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:07 AM2020-01-30T05:07:58+5:302020-01-30T05:10:03+5:30
नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून निवडून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच घेतला आहे.
मुंबई : राज्यात यापुढे ग्राम पंचायत सदस्यांमधून सरपंचांची निवड केली जाईल. थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्याची देवेंद्र फडणवीस सरकारने आणलेली पद्धत महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून निवडून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच घेतला आहे. आज २७ हजार ग्राम पंचायतींबाबतही हाच निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपला मोठे यश मिळाले. त्यात नगरपालिका, ग्राम पंचायतींचाही समावेश होता आणि तिथे थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंचांची निवड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी नव्या सरकारने आजचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.