48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 04:42 PM2017-10-16T16:42:41+5:302017-10-16T16:42:57+5:30
गोवा येथे होणा-या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये...
मुंबई दि. 16 - गोवा येथे होणा-या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सहा मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांमध्ये 'झाला बोभाटा', 'पिंपळ' , 'फिरकी', 'दशक्रीया', 'हृदयांतर' आणि 'बंदुक्या' या सहा चित्रपटांचा समावेश आहे.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन 2015 पासून एनएफडीसी च्या फिल्मबाजार मध्ये मराठी चित्रपट शासनातर्फे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक,समिक्षाकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहचण्यास मदत झाली.
या वर्षी 20नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत 48 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा येथे संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ६ मराठी चित्रपटासहित प्रतिनिधीत्व करण्याचे ठरले आहे. याकरीता मराठी चित्रपटांच्या सहभागासाठी वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिध्द करुन चित्रपट निर्मात्यांकडून प्रवेशिका मागविण्याची प्रक्रीया पार पाडण्यात आली. महोत्सवाकरीता चित्रपटांच्या परिक्षणासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.
सदर समितीच्या मार्फत महोत्सवाकरीता प्राप्त झालेल्या 20 चित्रपटांचे परिक्षण करण्यात आले. सदर समितीने 6 चित्रपटांची निवड गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केले आहे.