शाळा बुडवण्यासाठी स्वत:चेच अपहरण
By Admin | Published: October 6, 2014 04:52 AM2014-10-06T04:52:44+5:302014-10-06T04:52:44+5:30
शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने एका बारा वर्षीय मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणला आहे
ठाणे : शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने एका बारा वर्षीय मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणला आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे दुकानात केलेल्या चोरीची माहिती पालकांना मिळेल, या भीतीने आठ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला होता.
कळव्यात चौथीत शिकणाऱ्या या मुलाला शाळेत जाण्याचा कंटाळा येत होता. त्यामुळे त्याने २४ सप्टेंबरला घरातून पळ काढला. याप्रकरणी २६ सप्टेंबरला कळवा पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास सुरू केला. याचदरम्यान तो गावी असल्याचा फोन त्याच्या पालकांना आला. ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटद्वारे त्याचे समुपदेशन केले असता त्याला शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने त्याने हा अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला.
‘२४ सप्टेंबरला मला चौघांनी पळवून नेले. तेथे २०-२५ मुले होती. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी सोडले,’ असे त्याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला. पण, ते काही सापडले नाहीत. त्याने एकट्याने उत्तर प्रदेश गाठले. याचदरम्यान, त्याने रेल्वेत भीक मागून पोट भरले़ नंतर गाव गाठल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख, पोलीस नाईक अजय फराते यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)